आपला जिल्हा

दुष्काळात ‘साहेब’ गायब! आमदार नमिताताई मुंदडांनी दाखवली जागा; जिल्हाधिकाऱ्यांच्या धडक कारवाईने कामचुकार अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले

दुष्काळाच्या बैठकीला गैरहजेरी भोवली; केज तहसीलदारांची उचलबांगडी!


जिल्हाधिकाऱ्यांची धडक कारवाई: नायब तहसीलदार अशोक भंडारे यांच्याकडे केज तहसीलदार पदाचा अतिरिक्त पदभार

केज (प्रतिनिधी):-तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती गंभीर बनलेली असताना दुष्काळ निवारणाच्या कामात हलगर्जीपणा दाखवणे व आढावा बैठकीला गैरहजर राहणे केजचे तहसीलदार भरत गंगावणे यांना चांगलेच भोवले आहे. केज मतदारसंघाच्या आमदार सौ. नमिताताई मुंदडा यांनी या प्रकरणी घेतलेली आक्रमक भूमिका आणि केलेल्या मागणीची गंभीर दखल घेत बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार गंगावणे यांचा पदभार काढून घेतला असून, हा पदभार नायब तहसीलदार अशोक भंडारे यांच्याकडे तात्काळ सोपवण्याचे आदेश जारी केले आहेत.  

काय आहे संपूर्ण प्रकरण?

सध्या बीड जिल्ह्यासह तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून शेतकरी व नागरिक मोठ्या संकटात आहेत. अशा बिकट परिस्थितीत दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करणे, पिण्याचे पाणी, चारा छावण्या व इतर आवश्यक उपाययोजनांचा सतत आढावा घेणे हे महसूल यंत्रणेचे प्रमुख कर्तव्य आहे.  

याच पार्श्वभूमीवर आमदार सौ. नमिताताई मुंदडा यांनी मतदारसंघातील दुष्काळ परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली होती. मात्र, तालुक्यातील प्रमुख जबाबदार अधिकारी असलेले तहसीलदार भरत गंगावणे हे या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीस गैरहजर राहिले. एका जबाबदार लोकप्रतिनिधीने दुष्काळाच्या प्रश्नावर आयोजित केलेल्या बैठकीलाच तहसीलदारांनी दांडी मारल्याने आमदार मुंदडा यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. त्यांनी २४ सप्टेंबर २०२६ रोजी थेट जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन संबंधित तहसीलदारांच्या गैरहजेरीची व कारभाराची तक्रार करत कारवाईची मागणी केली होती.  

जिल्हाधिकाऱ्यांच्या दौऱ्यातही गैरहजर!

केवळ लोकप्रतिनिधींच्या बैठकीलाच नव्हे, तर २६ सप्टेंबर २०२६ रोजी खुद्द जिल्हाधिकारी यांनी केज तालुक्यातील दुष्काळ परिस्थितीच्या पाहणीसाठी व दौऱ्यासाठी तहसील कार्यालयाला भेट दिली असता, त्यावेळीही तहसीलदार भरत गंगावणे कार्यालयात उपस्थित नसल्याचे उघडकीस आले.  

तालुकास्तरावर दुष्काळ निवारण उपाययोजनांचे समन्वय व अंमलबजावणी करणे ही तहसीलदारांची मुख्य जबाबदारी असताना, जिल्हाधिकाऱ्यांचा दौरा व आमदारांची आढावा बैठक या दोन्ही महत्त्वाच्या प्रसंगी ते अनुपस्थित राहिल्याने त्यांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.  

जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश

दुष्काळ निवारणाच्या अत्यावश्यक कामात कोणतीही प्रशासकीय अडचण येऊ नये आणि कारभारात गतीशीलता राहावी यासाठी जिल्हाधिकारी, बीड यांनी मोठा निर्णय घेतला. विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांच्या मान्यतेच्या अधीन राहून, तहसीलदार भरत गंगावणे यांच्याकडील पदभार तात्काळ काढून घेण्यात आला आहे. हा पदभार तहसील कार्यालय केज येथील नायब तहसीलदार (महसूल-२) श्री. अशोक भंडारे यांच्याकडे पुढील आदेशापर्यंत अतिरिक्त स्वरूपात सोपवण्यात आला आहे.  

दुष्काळात जनतेच्या मदतीसाठी धावून जाण्याऐवजी कार्यालयातून गायब राहणाऱ्या अधिकाऱ्यावर झालेली ही कारवाई अत्यंत योग्य असून, आमदार सौ. नमिताताई मुंदडा यांनी घेतलेल्या भूमिकेचे व जिल्हा प्रशासनाच्या या धडक निर्णयाचे तालुकाभरातून स्वागत होत आहे.

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button