लाचलुचपत विभागाचा केजमध्ये महिन्यातील दुसरा दणका; २० हजारांची लाच घेताना विस्तार अधिकारी दत्तात्रय चाटे व शिक्षक जयगुरु गिरी पकडले
चौकशी अहवाल दडपण्यासाठी २० हजारांची लाच;

चौकशी अहवाल रोखण्यासाठी २० हजारांची लाच घेताना केजमधील विस्तार अधिकारी व शिक्षक रंगेहाथ जाळ्यात; जालना एसीबीची धडक कारवाई
केज:
चौकशी अहवाल व्यवस्थित तयार करून तो वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवू नये, यासाठी तक्रारदाराकडे २० हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारताना केज येथील कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी आणि एका जिल्हा परिषद शिक्षकाला जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने बुधवारी (दि. १४) दुपारी रंगेहाथ पकडले. या धडक कारवाईमुळे शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
दत्तात्रय मुरलीधर चाटे (वय ५६, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, पंचायत समिती केज) आणि जयगुरु शिवाजी गिरी (जिल्हा परिषद शिक्षक, तांदळे वस्ती) अशी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकलेल्या संशयितांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या चौकशी अहवालासंदर्भातील कार्यवाही शिक्षण विभागात सुरू होती. हा अहवाल व्यवस्थित तयार करून वरिष्ठ कार्यालयाकडे सादर न करण्याच्या मोबदल्यात संबंधितांनी २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार दाखल केली.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर जालना एसीबीच्या पथकाने बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास केज येथील शिक्षण विभागाच्या गट साधन केंद्रात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून २० हजार रुपयांची लाच स्वीकारताच पथकाने दोघांनाही रंगेहाथ ताब्यात घेतले.
या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तक्रार प्राप्त होताच तातडीने सूत्रे हलवून यशस्वी सापळा रचल्याबद्दल जालना एसीबीच्या पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.



