Uncategorized

केजमध्ये ड्रग्ज पुरवणारा रेवण सोपान नखाते केजमधूनच गजाआड; कळंब पोलिसांची धडक कारवाई!

गुन्हेगारीच्या विळख्यात क्रांती नगर: केजमधील परिसर ठरतोय गुन्हेगारांचे सुरक्षित माहेरघर; पोलिसांचा धाक संपलाय का?

कळंब ड्रग्ज रॅकेटचे धागेदोरे केजपर्यंत; आठवा आरोपी रेवण सोपान नखाते रा. क्रांतीनंतर  जेरबंद, केजमध्ये कोणाला ड्रग्ज पुरवले? तपासात बड्या नावांचा पर्दाफाश होण्याची शक्यता!

 केज शहरात प्रचंड खळबळ; स्थानिक ड्रग्ज पेडलर्स आणि खरेदीदारांचे धाबे दणाणले

 नगरसेवक मोहसीन मिर्झासह इतर आरोपी आधीच गजाआड; आंतरजिल्हा सिंडिकेटच्या मुसक्या आवळल्या

केज / कळंब:

कळंब शहरातील बहुचर्चित एमडी (MD) ड्रग्ज तस्करी प्रकरणात पोलिसांच्या हाती मोठे यश आले असून, या रॅकेटचे थेट केज कनेक्शन समोर आले आहे. या आंतरजिल्हा सिंडिकेटमधील आठवा संशयित आरोपी रेवण सोपान नखाते (रा. केज) याला कळंब पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. रेवण नखाते याच्या अटकेमुळे केज शहरात आणि परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून, त्याचे पेडलर्स केजमध्ये नेमके कोणाकोणाला ड्रग्ज पुरवत होते, याचा उलगडा आता पोलीस तपासात होणार असल्याने अनेक पांढरपेशांचे धाबे दणाणले आहेत.

केजमध्ये कोणाकोणाला ड्रग्जचा पुरवठा?

कळंब शहराला विळखा घालणाऱ्या एमडी ड्रग्जच्या अवैध व्यापाराची पाळेमुळे बीड, केज, परभणी आणि थेट पुण्यापर्यंत पसरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. केजमधून रेवण नखाते याला अटक झाल्यानंतर आता स्थानिक पातळीवर ड्रग्जचे वितरण करणाऱ्यांची साखळी उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नखाते आणि त्याचे पेडलर्स केज शहरातील कोणत्या तरूणांना अथवा बड्या व्यक्तींना हा नशा पुरवत होते, या सिंडिकेटला कोणाचे आर्थिक व राजकीय पाठबळ होते, याचा शोध पोलीस घेत आहेत. कॉल डिटेल्स (CDR) आणि संशयास्पद बँक खात्यांच्या तपासणीतून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.

आठ आरोपी गजाआड; नगरसेवकाचा जामीन फेटाळला

या गुन्ह्यात यापूर्वी निखिल युवराज जाधव, अरविंद दादाराव कांबळे, लखन गायकवाड, अक्षय रिटे, नगरसेवक मोहसीन सलीम मिर्झा, सुशांत सुतार आणि सागर किसन गराडे (रा. मावळ, पुणे) अशा सात जणांना अटक करण्यात आली होती. आता केजच्या रेवण नखाते याच्या अटकेने ही संख्या आठवर पोहोचली आहे. या प्रकरणातील आरोपी नगरसेवक मोहसीन सलीम मिर्झा व लखन गायकवाड यांचा नियमित जामीन अर्ज कळंब अतिरिक्त सत्र न्यायालयाने नुकताच फेटाळून लावला आहे. गुन्ह्यात नाव येताच नगरसेवकाची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असून, परभणी येथील गुन्ह्यातही सहभाग आढळल्याने तो परभणी कारागृहात बंदिस्त आहे.

मुळासकट कारवाईचे आदेश; पोलिसांचा ससेमिरा सुरू

धाराशिवच्या पालकमंत्र्यांनी ड्रग्ज सिंडिकेट मुळासकट उखडण्याचे सक्त आदेश दिले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोखर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शकील शेख या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेने ऑगस्ट महिन्यात ११.२१ ग्रॅम एमडी ड्रग्जच्या २९ पुड्यांसह मुद्देमाल जप्त करून या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. आता केजच्या रेवण नखातेच्या अटकेमुळे पोलीस तपासाची दिशा केज शहराकडे वळली असून, नखातेच्या चौकशीतून केजमधील इतर पेडलर्स आणि ग्राहकांची नावे निष्पन्न होऊन आणखी मोठी कारवाई होण्याची दाट शक्यता आहे.

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button