दहा रुपयांचा हार अन् सोशल मीडियाचा दिखावा पुरे झाला; १० वर्षे सत्ता भोगणाऱ्यांनो, आधी तुंबलेल्या गटारी आणि खड्ड्यांचे उत्तर द्या!
एका प्रभागात लूटमार, दुसऱ्या प्रभागात लाचारी! केजच्या आयात उमेदवारांना मतदारांचा थेट सवाल: "कामावर बोला, जातीवर नाही!"

विशेष वृत्त: केज नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२७
विकासाचा बोजवारा, सत्तेत छुपी युती; निवडणुकीच्या तोंडावर केजमध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचा डाव उघड!
दोन दशकांपासून आलटून-पालटून मलिदा लाटणाऱ्या जुन्याच चेहऱ्यांवर नागरिकांचा संताप; “प्रभाग बदलून जनतेला गृहीत धरणे बंद करा, नाहीतर भ्रष्टाचाराची कुंडली मांडू!” — मतदारांचा सज्जड इशारा
केज (विशेष प्रतिनिधी):
केज नगरपंचायतीच्या आगामी सार्वत्रिक निवडणूक २०२७ चे वेध लागताच शहरात राजकीय मोर्चेबांधणीला वेग आला आहे. मात्र, नेहमीप्रमाणे विकासाचे रिपोर्ट कार्ड घेऊन जनतेसमोर जाण्याऐवजी पुन्हा एकदा धार्मिक व जातीय ध्रुवीकरणाचे विष कालवून सत्तेचा मार्ग सुकर करण्याचे प्रयत्न सुरू झाल्याने शहरातील सुजाण नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. गेल्या वीस वर्षांत नगरसेवक, उपनगराध्यक्ष आणि नगराध्यक्ष पदांवर आलटून-पालटून बसलेल्या प्रस्थापित पुढार्यांनी शहर विकासाच्या बाबतीत खड्ड्यात घातले असून, आता पराभव समोर दिसू लागताच धार्मिक-जातीय समीकरणांचा आधार घेतला जात असल्याचा थेट आरोप स्थानिक मतदारांमधून होत आहे.
वर्गणी घेताना जात चालते, मग मतांसाठीच तेढ का?
शहरातील नागरिकांनी या दुटप्पी राजकीय संस्कृतीवर अत्यंत परखड सवाल उपस्थित केले आहेत.
सत्तेत ‘सहमती’, जनतेत ‘जातीयवाद’: गेल्या कित्येक वर्षांपासून महापालिका/नगरपंचायत पातळीवर वेगवेगळ्या पक्षांचे झेंडे खांद्यावर घेणारे पुढारी बंद दाराआड गळ्यात गळे घालून टेंडर आणि मलिद्याची वाटणी बिनबोभाट करत आले आहेत.
उत्सवांत सर्व समाजाचा पैसा मान्य: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, शिवजयंती, गणेशोत्सव, महात्मा जोतिराव फुले जयंती, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती असो वा मुस्लिम बांधवांचे सण—उत्सव साजरे करताना अथवा निधी गोळा करताना मराठा, वंजारी, मुस्लिम, दलित अशा सर्व समाजाचा पैसा पवित्र मानला जातो. तिथे कुणीही जात किंवा धर्माचा भेद करत नाही. मग प्रत्यक्षात निवडणुकीत मतदानाची वेळ येताच अचानक समाजा-समाजात तेढ का निर्माण केली जाते? असा रोकडा सवाल शहरवासीय विचारत आहेत.
१७ प्रभागांत मूलभूत समस्यांचे साम्राज्य; विकास फक्त कागदावर!
केज नगरपंचायतीच्या १७ प्रभागांमधील सद्यस्थिती पाहिली तर विकासाचा मोठा फुगा फुटल्याचे चित्र स्पष्ट दिसते:
1. रस्ते व गटारींची दुर्दशा: कोट्यवधी रुपयांचा निधी खर्ची पडल्याचे दाखवले जात असले, तरी मुख्य बाजारपेठ, वस्त्या आणि अंतर्गत रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांची योग्य सोय नसल्याने साथीचे आजार बळावत आहेत.
2. लाईट व पिण्याच्या पाण्याचा बोजवारा: स्ट्रीट लाईट्सचा अभाव आणि पिण्याच्या पाण्याचे असमान वितरण यामुळे सामान्य नागरिक त्रस्त आहेत.
3. सत्कार, हार-शाल अन् सोशल मीडियाचे नाटक: “दहा रुपयांचा हार, तीस रुपयांची शाल आणि नारळ” देऊन रोज कुणाचा तरी सत्कार करायचा आणि चार-दोन व्हॉट्सॲप वा फेसबुक ग्रुपवर पोस्ट टाकून आपणच विकासपुरुष असल्याचा आव आणायचा, एवढ्यापुरतेच बहुतांश लोकप्रतिनिधींचे काम उरले आहे.
‘प्रभाग बदल’चा नवा राजकीय पॅटर्न; जनतेचा भडका!
एका प्रभागातून निवडून आल्यानंतर पाच वर्षे त्या भागातील जनतेला वाऱ्यावर सोडायचे, तिथे नाराजी वाढली की आगामी निवडणुकीत दुसऱ्या सुरक्षित वाटणाऱ्या प्रभागात उडी मारायची आणि तिथल्या भोळ्याभाबड्या मतदारांना भुलवायचे, हा नवा पॅटर्न या पुढार्यांनी सुरू केला आहे. पाच वर्षे जनतेला तोंड न दाखवणारे हे नेते निवडणूक तोंडावर येताच पुन्हा ‘समाज आणि जात’ पुढे करून मतांची भीक मागायला निघतात.
“चाटूगिरी करणाऱ्यांना जनता समजू नका; भ्रष्टाचाराचे पुरावे चव्हाट्यावर आणू”
शहरातील तरुणांनी आणि सुजाण मतदारांनी अशा राजकीय नाटकबाजांना जाहीर इशारा दिला आहे:
“दोन-चार लाळघोटे आणि चाटूगिरी करणारे कार्यकर्ते सोबत फिरतात म्हणजे संपूर्ण प्रभाग किंवा संपूर्ण समाज तुमच्या पाठीशी आहे, या भ्रमात राहू नका. आजचा मतदार सुशिक्षित आणि सजग झाला आहे.”



