१ लाखांची मागणी, ४० हजारांत तडजोड अन् २० हजारांचा हप्ता घेताना दोघांवर गुन्हा; केजमधील शिक्षण विभागातील संपूर्ण घटनाक्रम

केज:
२.० शालार्थ वेतन प्रणाली देयकातील अनियमिततेच्या चौकशी प्रकरणात अनुकूल अहवाल देण्यासाठी शिक्षण विस्तार अधिकाऱ्याने सुरुवातीला चक्क १ लाख रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीत हा सौदा ४० हजार रुपयांवर आला आणि पहिला हप्ता म्हणून २० हजार रुपये स्वीकारताच शिक्षण विस्तार अधिकारी व शिक्षकावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला. या संपूर्ण प्रकरणाचा एफ.आय.आर.नुसार उलगडलेला घटनाक्रम खालीलप्रमाणे आहे:
घटनाक्रम १ : नोटीस आणि चौकशी अधिकाऱ्याची नेमणूक
ऑगस्ट २०२६ : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुंबेफळ (ता. केज) येथील मुख्याध्यापक राजाभाऊ दत्तात्रय कदम यांना २.० शालार्थ वेतन प्रणाली ऑनलाईन देयकातील अनियमिततेबाबत तत्कालीन गटशिक्षणाधिकारी सुनील केंद्रे यांनी नोटीस बजावली होती.
या नोटीसचा खुलासा तीन दिवसांत सादर करण्याचे आदेश देऊन, या प्रकरणाच्या चौकशीसाठी केज गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील शिक्षण विस्तार अधिकारी दत्तात्रय मुरलीधर चाटे यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली.
२७ ऑगस्ट २०२६ : मुख्याध्यापकांनी लेखी खुलासा दिल्यानंतर विस्तार अधिकारी चाटे यांनी कुंबेफळ येथील शाळेत जाऊन प्रत्यक्ष चौकशी केली.
घटनाक्रम २ : थेट १ लाखांची लाच मागितली; तडजोडीत ४० हजार ठरले
०९ ऑक्टोबर २०२६ : चौकशीच्या अहवालाबाबत विचारणा करण्यासाठी मुख्याध्यापक कदम हे विस्तार अधिकारी चाटे यांना भेटले. यावेळी चाटे यांनी चौकशीचा अहवाल मुख्याध्यापकांच्या बाजूने अनुकूल देण्यासाठी थेट १,००,०००/- (एक लाख) रुपयांच्या लाचेची मागणी केली.
मुख्याध्यापकांनी असमर्थता दर्शवल्यानंतर झालेल्या तडजोडीअंती ही रक्कम ४०,०००/- रुपयांवर निश्चित झाली.
घटनाक्रम ३ : तक्रार आणि मागणीची अधिकृत पडताळणी
१३ ऑक्टोबर २०२६ : लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने मुख्याध्यापकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (जालना) चे उपअधीक्षक बाळू संपती जाधवर यांच्याशी संपर्क साधून रीतसर तक्रार दिली.
१४ ऑक्टोबर २०२६ (सकाळ) : एसीबी पथक केज येथे दाखल झाले. शासकीय पंचांसमक्ष तक्रारदाराच्या शर्टच्या खिशात व्हॉईस रेकॉर्डर लावून त्यांना विस्तार अधिकारी चाटे यांच्याकडे पाठवण्यात आले. संभाषणाच्या पडताळणीत चाटे यांनी ४० हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
घटनाक्रम ४ : कार्यालयातील हालचाली आणि लाचेचा पहिला हप्ता
१४ ऑक्टोबर २०२६ (दुपारी १५:३८ वा.) : पहिला हप्ता म्हणून ५०० रुपयांच्या ४० नोटा (२०,०००/- रुपये) घेऊन तक्रारदार व पंच गटशिक्षणाधिकारी कार्यालयात चाटे यांच्याकडे गेले.
कार्यालयात पांढऱ्या रंगाचा शर्ट घातलेले चाटे हजर होते. तक्रारदाराने पैसे काढताच चाटे यांनी हाताने जवळच थांबलेल्या इसमाकडे बोट दाखवून “सध्या माझ्याकडे वीस हेतं असे म्हणाले” व पैसे त्याच्याकडे देण्यास सांगितले.
चाटे यांच्या सांगण्यानुसार त्या इसमाने तक्रारदाराकडून उजव्या हाताने २० हजार रुपयांची रक्कम घेतली आणि स्वतःच्या पँटच्या डाव्या खिशात ठेवून तेथून निघून गेला. तो इसम तांदळे वस्ती शाळेचा सहायक शिक्षक जयगुरु गिरी असल्याचे समोर आले.
घटनाक्रम ५ : घरातून ताब्यात, पंचनामा आणि रासायनिक पुरावे
तक्रारदाराच्या पूर्वतयारीनुसार ठरलेल्या इशाऱ्यानंतर पथकाने तात्काळ शोध घेऊन जयगुरु गिरी यांना त्यांच्या घरातून ताब्यात घेतले व कार्यालयात आणले.
पंचांसमक्ष झडती घेतली असता गिरी यांच्या पँटच्या डाव्या खिशातून ५०० रुपयांच्या ४० नोटा (२०,०००/- रुपये) हस्तगत करण्यात आल्या.
अल्ट्राव्हायोलेट दिव्याच्या प्रकाशात तपासणी केली असता, शिक्षक जयगुरु गिरी यांच्या उजव्या हातावर, लाचेच्या नोटांवर आणि पँटच्या डाव्या खिशावर रासायनिक पावडरची हिरवट चकाकी आढळून आली.
घटनाक्रम ६ : रात्री उशिरा गुन्हा दाखल
१४ ऑक्टोबर २०२६ (रात्री २३:१५ वा.) : या संपूर्ण प्रकारानंतर पोलीस उपअधीक्षक बाळू संपती जाधवर यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपी :
१. दत्तात्रय मुरलीधर चाटे (वय ५७, शिक्षण विस्तार अधिकारी, रा. तांबवा, ता. केज)
२. जयगुरु शिवाजी गिरी (वय ५०, सहायक शिक्षक, रा. गणेश नगर, केज)
गुन्हा नोंद : प्रथम खबर क्र. ०६५४/२०२६ अन्वये भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७ आणि १२ नुसार गुन्हा नोंदवला असून, पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ हे पुढील तपास करत आहेत.



