विकासकामांच्या मुद्द्यावरून केज तालुक्यात शिंदे गटात उभी दरी; तालुकाप्रमुख व पदाधिकारी एकीकडे, तर ज्येष्ठ अन् कट्टर शिवसैनिक जनतेसाठी मैदानात!
तहसील कार्यालयातील निवेदनावरून पक्षातील दोन तट समोरासमोर; तालुकाध्यक्षांना साधे निमंत्रणही न दिल्याने अंतर्गत कलह चव्हाट्यावर

केजमध्ये शिंदे गटातील गटबाजीचा भडका! विकासकामांवरून पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर; तहसीलदारांना निवेदन देताना तालुकाप्रमुख आणि विधानसभा अध्यक्षांनाच डावलले!
केज:
केज तालुक्यातील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील अंतर्गत धूसफूस आता उफाळून आली असून पक्षातील तीव्र गटबाजी उघडपणे चव्हाट्यावर आली आहे. विकासकामांचे वाटप, श्रेयवाद आणि अंतर्गत वर्चस्वावरून सुरू असलेल्या सुप्त संघर्षाने आता गंभीर वळण घेतले आहे. शेतकऱ्यांच्या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांवर तहसीलदार कार्यालयात निवेदन देण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात पडलेली उभी फूट लपून राहिलेली नाही. एका बाजूला शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ. प्रतिभाताई अशोकराव थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी आक्रमक भूमिका घेत असताना, दुसरीकडे मात्र या महत्त्वपूर्ण निवेदनासाठी शिवसेना तालुकाप्रमुख आणि विधानसभा अध्यक्ष यांसारख्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनाच मुद्दामहून बोलावले गेले नाही, अशी धक्कादायक माहिती समोर आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
विकासकामांच्या श्रेयवादातून प्रमुख पदाधिकाऱ्यांनाच डावलले
मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, केज तालुक्यात मंजूर झालेली आणि प्रस्तावित असलेली विविध विकासकामे, त्यांचे नियोजन आणि श्रेय लाटण्याच्या मुद्द्यावरून शिंदे गटात गेल्या काही काळापासून अंतर्गत शीतयुद्ध सुरू होते. तालुका पातळीवरील वर्चस्वाच्या लढाईतून पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उघडपणे दोन गटांत विभागले गेले आहेत. याच अंतर्गत कुरघोडीतून तालुकाप्रमुख आणि विधानसभा अध्यक्षांना कोणतीही पूर्वकल्पना न देता किंवा निवेदनासाठी न बोलावताच परस्पर डावलण्यात आल्याचे समोर आले असून, विकासकामांवरून सुरू असलेली ही गटबाजी आता थेट चव्हाट्यावर आली आहे.
शेतकऱ्यांच्या गंभीर प्रश्नांवरून अंतर्गत राजकारण!
शेतकऱ्यांना कर्जमाफी असूनही बँकांकडून सिबिलच्या नावाखाली होणारी अडवणूक, ऊसाला ५००० रुपये हमीभाव, दुष्काळात दावणीला चारा-पाणी, दुष्काळी अनुदान व पीकविमा तात्काळ जमा करणे यांसारख्या अत्यंत संवेदनशील आणि शेतकऱ्यांच्या जगण्या-मरण्याच्या प्रश्नांवर शिवसेना उपनेत्या माजी आमदार संगीताताई ठोंबरे यांच्या सूचनेनुसार आणि शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ. प्रतिभाताई अशोकराव थोरात यांच्या थेट मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आले. मात्र, इतक्या ज्वलंत विषयावर आंदोलन करताना संघटनेच्या तालुका स्तरावरील अध्यक्षांनाच विश्वासात न घेणे आणि त्यांना बाजूला ठेवणे, यावरून पक्षातील गटबाजी किती विकोपाला गेली आहे हे स्पष्टपणे सिद्ध झाले आहे.
तहसील कार्यालयात एकाच गटाची उपस्थिती
तहसील कार्यालयात निवेदन देण्यासाठी तालुका सचिव विकास कारभारी काशीद यांच्या नेतृत्वाखालील पदाधिकारी हजर होते. यावेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख महेंद्र चाटे, शहरप्रमुख बाळासाहेब पवार, राज्य सामाजिक न्याय विभागाचे उपाध्यक्ष लक्ष्मणभाऊ वाघमारे, माजी तालुकाप्रमुख पंजाब राजे देशमुख, माजी तालुकाप्रमुख राजेभाऊ जाधव, माजी पं. स. सदस्य विलास आप्पा चोपणे, माजी सरपंच किशोर तात्या थोरात, मुलेगावचे सरपंच बाळासाहेब लाड, तरनळीचे सरपंच शिवाजी मोहिते, शिवसेना शहर संघटक सुरेश पल्लमवार, ज्येष्ठ शिवसैनिक बन्सी आप्पा जाधव, अभिमान बापू पटाईत, संतोष बुडुक तसेच देविकांत सोनवणे, संदीप ठोंबरे, गणेश ठोंबरे, शहाजी बहिर, विकास सूर्यवंशी, अशोक धुमक, अशोक जोगदंड, महादेव अण्णा धोंडे, हनुमंत वेताळ, रमेश सूर्यवंशी, नारायण नेरकर, प्रशांत ठोंबरे, चंद्रकांत ठोंबरे आणि बंडू बप्पा ठोंबरे आदी उपस्थित होते.
वरिष्ठ नेतृत्व काय भूमिका घेणार?
एकीकडे शेतकरी संकटात सापडलेला असताना जनतेच्या प्रश्नांवर सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन लढण्याऐवजी, विकासकामांच्या वादातून थेट तालुकाप्रमुख व विधानसभा अध्यक्षांनाच निवेदनासाठी न बोलावल्याने निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. शिंदे गटात चव्हाट्यावर आलेली ही उभी फूट रोखण्यासाठी आणि जबाबदार पदाधिकाऱ्यांमधील वाढती दरी मिटवण्यासाठी पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व काय भूमिका घेणार, याकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.



