Uncategorized

तलवारीने केक कापणारा आरोपी अजय तांदळे जेरबंद; शस्त्रे लपवून ठेवणारा साथीदार सदाशिव आंधळेही बेड्यांमध्ये!

 

 

इन्स्टावर रील बनवून भाईगिरी दाखवणारे अजय तांदळे व सदाशिव आंधळे गजाआड; तलवारीसह दोन खंजीर जप्त!

केज:

सोशल मीडियावर दहशत पसरवून ‘भाई’ बनू पाहणाऱ्या दोन आरोपींना केज पोलिसांनी चांगलाच धडा शिकवत गजाआड केले आहे. तलवारीने वाढदिवसाचा केक कापून व्हिडिओ व्हायरल करणारा अजय अशोक तांदळे (वय २६, रा. कोरेगाव, ता. केज) आणि घरात शस्त्रे लपवून ठेवणारा त्याचा साथीदार सदाशिव नामदेव आंधळे (वय ३५, रा. नामेवाडी, ता. केज) अशी अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची नावे आहेत.  

इन्स्टाग्रामवरील रील बेतली अंगाशी

आरोपी अजय तांदळे याने वाढदिवसाच्या नावाखाली हातात धारदार तलवार घेऊन केक कापला आणि परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने ती रील ‘krishpanchal302’ या इन्स्टाग्राम आयडीवरून सोशल मीडियावर व्हायरल केली होती. मात्र, ही भाईगिरी जास्त वेळ टिकली नाही. ६ ऑक्टोबर रोजी ही रील पोलिसांच्या निदर्शनास येताच केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांनी या विकृतीची गंभीर दखल घेत आरोपींवर कारवाईचे आदेश दिले.  

आरोपीच्या घरातून ४० इंची तलवार आणि खंजीर जप्त

गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, केक कापण्यासाठी वापरलेली तलवार नामेवाडी येथील आरोपी सदाशिव नामदेव आंधळे याच्या घरी लपवून ठेवल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी ९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी नामेवाडी येथे छापा टाकत आरोपी सदाशिव आंधळे याच्या घरातून ४० इंच लांबीची घातक तलवार, १० इंच लांबीचा खंजीर आणि ८ इंच लांबीचा आणखी एक खंजीर असा धारदार शस्त्रांचा साठा हस्तगत केला.  

शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल

दहशत माजवून कायदा हातात घेणाऱ्या या दोन्ही आरोपींविरोधात केज पोलीस ठाण्यात गु.रं.नं. ६४१/२०२६ नुसार भारतीय शस्त्र अधिनियम कलम २५(४) सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ अन्वये गुन्हा नोंदवून त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.  

सदर कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ, सपोनि महेश क्षीरसागर, सपोनि लक्ष्मण उंबरे, ग्रेड पोउपनि अमीरोद्दीन इनामदार, डी.बी. पथकाचे अंमलदार बाळासाहेब अहंकारे, संतोष गीते, शिवाजी कागदे, नितीन वारे, राहुल तरकसे, दादाराव देवगुडे आणि मपोहे/कविता गायकवाड यांनी पार पाडली.

“शहरात किंवा ग्रामीण भागात तलवारीने केक कापून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकांची गय केली जाणार नाही; अशांवर थेट गुन्हे दाखल करून गजाआड केले जाईल.”

— राहुल सूर्यतळ (पोलीस निरीक्षक, केज पोलीस ठाणे)

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button