सामाजिक

महाराष्ट्रात २.०७ कोटी मतदार ‘अपात्र’; मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे प्रसिद्धीपत्रक जारी

मतदार यादीतील दुरुस्तीसाठी १ महिन्याची मुदत

मुंबई:महाराष्ट्र राज्यातील विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत घरोघरी जाऊन गणना प्रपत्र भरून घेण्याची मोहीम नुकतीच पार पडली. ३० जून २०२६ ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत राबवण्यात आलेल्या या मोहिमेनंतर मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने अधिकृत आकडेवारी जाहीर केली आहे.
राज्यातील एकूण ९.७८ कोटी मतदारांपैकी ७.७१ कोटी (७८.८५%) मतदारांनी स्वाक्षरीसह गणना प्रपत्र भरून दिले आहेत. मात्र, उर्वरित २.०७ कोटी (२१.१५%) मतदार प्रत्यक्ष वस्तुस्थितीनुसार प्रारूप मतदार यादीत समाविष्ट करण्यास अपात्र आढळल्याने त्यांना (असंग्रहित गणना प्रपत्र) या गटात टाकण्यात आले आहे.
अपात्र ठरलेल्या २.०७ कोटी मतदारांची वर्गवारी:
आढळून न आलेले / गैरहजर : ७५.५२ लाख (७.७२%)
कायमस्वरूपी स्थलांतरित : ७६.८० लाख (७.८५%)
मृत : ३४.८१ लाख (३.५६%)
अन्यत्र नोंदणी केलेले / दुबार : १७.६३ लाख (१.८०%)
इतर : २.२३ लाख (०.२३%)
दावे व हरकतींसाठी १ महिन्याची मुदत
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, प्रारूप मतदार यादी लवकरच प्रसिद्ध केली जाणार असून ती मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना सॉफ्ट व हार्ड कॉपी स्वरूपात दिली जाईल.
प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर पुढील एक महिन्याच्या कालावधीत नागरिकांना दावे व हरकती नोंदवता येतील:
नवीन नाव नोंदणी: १ ऑक्टोबर २०२६ पूर्वी वयाची १८ वर्षे पूर्ण करणारे नवमतदार किंवा यादीत नाव नसलेले नागरिक नमूना ६ भरून अर्ज करू शकतात.
नावात दुरुस्ती: नोंदीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी नमूना ८ भरावा लागेल.
नाव वगळणे: यादीतील चुकीच्या नोंदीवर हरकत घेण्यासाठी नमूना ७ वापरावा.
खोटी माहिती दिल्यास १ वर्षाच्या शिक्षेची तरतूद
मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी किंवा बदलासाठी अर्ज करताना कोणतीही चुकीची माहिती अथवा विधान केल्यास ‘लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, १९५०’ च्या कलम ३१ नुसार १ वर्षांपर्यंतची शिक्षा, दंड किंवा दोन्ही सह शिक्षा होऊ शकते.
दरम्यान, सर्व दावे व हरकतींची पडताळणी पूर्ण करून २७ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button