सामाजिक

अधिकाऱ्यांची निर्लज्ज चमचेगिरी! केजमध्ये गतिरोधक मागितला अन् ठोकला चक्क ‘चढरोधक’; अपघाताला थेट निमंत्रण!

केज (प्रतिनिधी):-रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने आदेश दिल्यानंतर, संबंधित यंत्रणेने मात्र डोके बाजूला ठेवून निव्वळ ‘चमचेगिरी’ करत अजब पराक्रम केल्याचा प्रकार केज शहरात समोर आला आहे. धारूर रोडवर तीव्र उताराच्या बाजूला गतिरोधक बसवण्याची खरी गरज असताना, हायवे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी थेट चढावरच गतिरोधक बसवून नवीन ‘चढरोधक’ निर्माण केला आहे. अधिकाऱ्यांच्या या अजब कारभारावर केजकर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

अपघात रोखण्यासाठी होता खासदारांचा पुढाकार

केज शहरात सातत्याने होणारे अपघात लक्षात घेऊन खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांनी पुढाकार घेतला होता. रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष या नात्याने खासदार सोनवणे आणि सचिव तथा जिल्हाधिकारी यांच्या विद्यमाने अपघातप्रवण ठिकाणी तात्काळ गतिरोधक बसवण्याचे आदेश पारित करण्यात आले होते. या आदेशाची अंमलबजावणी हायवेच्या संबंधित कंपनीमार्फत सुरू करण्यात आली.

गरज उतारावर, ठोकला चढावर!

धारूरकडून केजकडे येणाऱ्या रस्त्यावर तीव्र उतार असल्याने वाहनांचा वेग अनियंत्रित होतो. त्यामुळे डाव्या बाजूला गतिरोधक बसवणे अत्यंत गरजेचे आणि तांत्रिकदृष्ट्या क्रमप्राप्त होते. मात्र, संबंधित कंपनीच्या अतिउत्साही अधिकाऱ्यांनी नियमांना आणि सुरक्षेला हरताळ फासला. भवानी चौकातून धारूरकडे जाणाऱ्या चढावर, थेट खासदारांच्या घरासमोरच मागणी नसताना हा गतिरोधक ठोकण्यात आला.

अपघाताला उघड निमंत्रण: ‘चमचेगिरी चढरोधक योजना’

चढावर गतिरोधक बसवल्यामुळे जड अवजड वाहनांचा चढण्याचा वेग अचानक मंदावणार आहे. अशा स्थितीत चढावर एखादे मोठे वाहन बंद पडले किंवा त्याचा ब्रेक फेल झाला, तर ते वेगाने पाठीमागे घसरत येऊन पाठीमागील वाहनांना चिरडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मूळ अपघात स्थळावर गतिरोधक बसवण्याऐवजी, केवळ वरिष्ठांना खूश करण्यासाठी चढावरच हा धोकादायक अडथळा निर्माण केला गेला आहे.

अधिकाऱ्यांच्या या विवेकशून्य आणि हास्यास्पद प्रयोगावर संतप्त नागरिकांनी सडकून टीका केली आहे. “या चमचेगीर अधिकाऱ्यांचा आदर्श घेऊन हा अजब प्रयोग देशभर राबवावा आणि त्या योजनेला ‘चमचेगिरी चढरोधक योजना’ असे नाव द्यावे,” असा जळजळीत टोला केजमधील संतप्त जनतेने लगावला आहे. आता तरी प्रशासन डोळे उघडून हा चुकीच्या ठिकाणी बसवलेला गतिरोधक हटवून योग्य त्या अपघातप्रवण उतारावर गती नियंत्रक बसवणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button