सामाजिक
प्रशासनाची वाट न पाहता पुढे आला देवदूत; महादेव जाधवर यांच्या स्वखर्चातून काशिदवाडी–कदमवस्ती मार्गाची दुरुस्ती
सामाजिक बांधिलकीचे मूर्तिमंत उदाहरण: महादेव जाधवर यांनी स्वखर्चातून घडविला काशिदवाडी–कदमवस्ती रस्ता; ग्रामस्थांची वळशाच्या त्रासातून कायमची सुटका
काशिदवाडी परिसराचा ऊर भरून आला; जाधवर यांच्या दातृत्वाचे सर्वत्र कौतुक
काशिदवाडी:-“प्रशासनाच्या मदतीची वाट पाहत हात जोडून बसण्यापेक्षा, समाजासाठी हात पुढे करणे अधिक महत्त्वाचे असते,” हेच आपल्या कृतीतून दाखवून देत सामाजिक कार्यकर्ते महादेव जाधवर यांनी काशिदवाडी आणि कदमवस्ती परिसरासमोर एक नवा आदर्श उभा केला आहे. पावसाळ्यात चिखलमय व दलदलीत हरवलेला काशिदवाडी–कदमवस्ती रस्ता त्यांनी स्वतःच्या खिशातून खर्च करत पूर्ववत सुरू करून दिला असून, त्यांच्या या संवेदनशील आणि प्रेरणादायी कार्यामुळे संपूर्ण परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
वळशाचा फेरा आणि ग्रामस्थांचे हाल
काशिदवाडीहून कदमवस्तीकडे जाणारा मार्ग परिसरातील शेतकरी, शालेय विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मात्र, दरवर्षी पावसाळा सुरू झाला की या रस्त्यावर पाय ठेवणेही अशक्य व्हायचे. गुडघाभर चिखल, साचलेले पाणी आणि निसरडी माती यामुळे दुचाकी सोडाच, साधे चालणेही मुश्किलीचे झाले होते. नाईलाजास्तव ग्रामस्थांना थेट लव्हरी चौफुला–येवता मार्गे अनेक किलोमीटरचा लांबचा वळसा घालून ये-जा करावी लागत होती. यामुळे लोकांचा वेळ, पैसा आणि श्रम वाया जात होतेच, शिवाय रात्री-अपरात्री किंवा वैद्यकीय आणीबाणीच्या वेळी नागरिकांचे प्रचंड हाल होत होते.
जाधवर धावून आले मदतीला
ग्रामस्थांचे, वृद्ध माता-भगिनींचे आणि चिमुकल्या विद्यार्थ्यांचे हे हाल महादेव जाधवर यांच्या डोळ्यांना बघवले नाहीत. कोणतीही शासकीय मदत अथवा अनुदानाची प्रतीक्षा न करता, त्यांनी तात्काळ स्वखर्चातून रस्ता दुरुस्तीचा विडा उचलला. जाधवर यांनी स्वतः पुढाकार घेत रस्त्यावरील खड्डे व दलदल मुजवण्यासाठी दगड आणि दर्जेदार मुरूम आणून टाकला. त्यानंतर खडी टाकून रस्त्याचे योग्य सपाटीकरण करण्यात आले. अवघ्या काही दिवसांत हा चिखलमय मार्ग सुस्थितीत आणि वाहतूकयोग्य बनवण्यात आला.
परिसरातून कृतज्ञतेची भावना
रस्त्याची कामे व्यवस्थित झाल्यामुळे आता कदमवस्ती व काशिदवाडीकरांचा प्रवास अत्यंत सुखकर झाला असून, लव्हरी चौफुला मार्गे पडणारा फेरा कायमचा मिटला आहे. गावातील एका सुपुत्राने स्वार्थाचा विचार न करता थेट समाजाच्या कल्याणासाठी हात पुढे केल्याने काशिदवाडी, कदमवस्ती, येवता आणि लव्हरी परिसरातील नागरिकांची मान अभिमानाने उंचावली आहे.
“अनेक दिवस चिखलातून वाट काढताना जीवाचा घोर असायचा. अशा बिकट प्रसंगी महादेव जाधवर यांनी गावाची समस्या आपली मानून स्वखर्चाने रस्त्याचे रूप पालटले. अशा समाजहितैषी व्यक्तीचा संपूर्ण गावाला मनस्वी सार्थ अभिमान आहे,” अशा शब्दांत स्थानिक ग्रामस्थांनी व ज्येष्ठांनी कृतज्ञता व्यक्त केली.



