कल्याण–लातूर एक्सप्रेसवेमुळे केज मुंबईशी ४ तासांत जोडणार; मुख्यमंत्री फडणवीसांची मंजुरी, सुरक्षेसाठी दुचाकी-ट्रॅक्टरसारख्या संथ वाहनांना बंदी
केजच्या विकासाची गाडी धावणार; जनकल्याण महामार्गावर ताशी १२० किमीचा वेग, सुरक्षिततेसाठी संथ गतीच्या वाहनांवर बंदी!

केज:-मराठवाड्याच्या विकासाला नवी गती देणारा आणि बहुप्रतिक्षित ठरलेला ‘कल्याण–लातूर जनकल्याण द्रुतगती महामार्ग’ आता अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने व मंजुरीने साकारत असलेल्या या महामार्गामुळे केज शहरासह संपूर्ण तालुक्याच्या आर्थिक व व्यापारी विकासाला मोठी कलाटणी मिळणार आहे. कल्याण ते लातूर दरम्यान प्रस्तावित असलेल्या या ४४२ किलोमीटर लांबीच्या ६ पदरी महामार्गावर केज हा अत्यंत महत्त्वाचा मध्यवर्ती केंद्रबिंदू ठरणार आहे.
हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर ठाणे-मुंबई प्रवासासाठी लागणारा १० ते ११ तासांचा वेळ थेट ४ ते ५ तासांवर येणार असल्याने केज तालुका थेट देशाच्या आर्थिक राजधानीशी सुपरफास्ट जोडला जाईल.
असा असेल प्रस्तावित मार्ग:
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) संरेखनानुसार हा महामार्ग खालीलप्रमाणे जाणार आहे:
कल्याण – मुरबाड – माळशेज घाट (८ किमीचा अत्याधुनिक बोगदा) – अहिल्यानगर – पाथर्डी – बीड – मांजरसुंभा – नेकनूर – केज – अंबाजोगाई ते लातूर.
हा पूर्णपणे नवा, नियंत्रित प्रवेश असलेला ग्रीनफिल्ड कॉरिडॉर असून तो विरार-अलिबाग मल्टिमॉडेल कॉरिडॉर आणि शक्तिपीठ एक्सप्रेसवेशीही जोडला जाणार आहे.
‘समृद्धी’च्या धर्तीवर महामार्ग; दुचाकी, रिक्षा व ट्रॅक्टरना मुख्य मार्गावर बंदी
हा महामार्ग नागपूर-मुंबई ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गा’च्या धर्तीवर पूर्णपणे प्रवेश-नियंत्रित असणार आहे.
वेगमर्यादा व सुरक्षा: मुख्य मार्गावर वाहनांचा वेग ताशी १०० ते १२० किमी प्रस्तावित असल्याने अपघात टाळण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी दुचाकी (मोटारसायकल/स्कूटर), तीन चाकी वाहने (ऑटो रिक्षा), कृषी ट्रॅक्टर, संथ वाहने आणि जनावरांच्या गाड्यांना मुख्य कॅरेजवेवर प्रवेशास पूर्ण बंदी असेल.
इंटरचेंजवरूनच प्रवेश: केवळ चार चाकी, बस, ट्रक व व्यावसायिक अवजड वाहनांना ठरावीक इंटरचेंज (टोल नाक्यां)वरूनच प्रवेश आणि बाहेर पडण्याची परवानगी राहील.
शेतकरी व स्थानिकांसाठी सर्व्हिस रोड: मुख्य महामार्गावर संथ वाहनांना बंदी असली, तरी स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांची गैरसोय होऊ नये म्हणून महामार्गाच्या दोन्ही बाजूंना सर्व्हिस रोड आणि भुयारी मार्ग उपलब्ध करून दिले जाणार आहेत. तसेच सध्याचा जुना राष्ट्रीय महामार्ग (NH-61) नियमित स्थानिक वाहतुकीसाठी सुरूच राहणार आहे.
केज तालुक्यासाठी महामार्ग ठरणार ‘गेमचेंजर’:
१. व्यापार, उद्योग आणि रिअल इस्टेटला भरारी:
लातूर, अंबाजोगाई आणि बीडच्या मध्यभागी असलेल्या केज शहराला या महामार्गामुळे थेट मुंबईची कनेक्टिव्हिटी मिळेल. परिणामी केज व परिसरात वेअरहाऊसिंग (गोदामे), लॉजिस्टिक हब, कृषी प्रक्रिया केंद्रे आणि रिअल इस्टेट क्षेत्राला मोठी तेजी येईल.
२. शेतमालाला मुंबईची थेट बाजारपेठ:
तालुक्यातील शेतमाल, भाजीपाला, फळे आणि दूध आता अवघ्या ४ तासांत नवी मुंबईच्या वाशी मार्केटमध्ये पोहोचू शकेल. प्रवासाचा वेळ वाचल्याने वाहतूक खर्च कमी होऊन शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळणे सुलभ होईल.
३. सुरक्षित आणि वेगवान प्रवास:
उच्च शिक्षण, नोकरी व अत्याधुनिक वैद्यकीय उपचारांसाठी मुंबई-ठाणे परिसरात जाणाऱ्या केज परिसरातील नागरिकांचा प्रवास गतिमान आणि सुरक्षित होईल.
प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये:
प्रकल्प: कल्याण–लातूर जनकल्याण द्रुतगती महामार्ग
एकूण लांबी: सुमारे ४४२ किलोमीटर (६ पदरी ग्रीनफिल्ड)
अपेक्षित खर्च: अंदाजे ३५ हजार कोटी रुपये
प्रवासाचा वेळ: १०-११ तासांवरून थेट ४-५ तासांवर
विशेष रचना: माळशेज घाटात ८ किमी लांबीचा बोगदा आणि सुरक्षित वाहतुकीसाठी स्वतंत्र सर्व्हिस लेन नेटवर्क.



