नवी दिल्ली:
बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष केंद्रीय विकास पॅकेज मंजूर करावे, प्रलंबित पीकविमा भरपाई मिळावी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यासह देशातील थोर महापुरुषांना सर्वोच्च ‘भारतरत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात यावा, या प्रमुख मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार) ८ खासदारांच्या शिष्टमंडळाने आज नवी दिल्ली येथील संसद भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वात आणि खासदार बजरंग सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही महत्त्वपूर्ण भेट पार पडली.
या भेटीदरम्यान बीड जिल्ह्यातील शेती, पाणी, आरोग्य, शिक्षण आणि रोजगाराशी संबंधित अत्यंत ज्वलंत प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बीडकरांच्या अनेक वर्षांपासूनच्या प्रलंबित मागण्या आणि अपेक्षा खासदार बजरंग सोनवणे यांनी थेट पंतप्रधानांच्या निदर्शनास आणून दिल्या.
पंतप्रधानांकडे सादर केलेल्या प्रमुख मागण्या:
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना ‘भारतरत्न’:
देशाच्या उभारणीत आणि सामाजिक क्रांतीमध्ये अमूल्य योगदान देणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ देऊन गौरविण्यात यावे, अशी आग्रही मागणी पक्षाच्या ८ खासदारांच्या वतीने करण्यात आली.
बीडसाठी विशेष ‘वॉटर ग्रिड’ व केंद्रीय निधी:
बीड जिल्ह्याचा कायमस्वरूपी दुष्काळ हटवण्यासाठी उजनी धरणातून मांजरा धरण व संपूर्ण जिल्ह्याला पाणी उपलब्ध करून देणाऱ्या जल हस्तांतरण प्रकल्पास केंद्र सरकारने विशेष आर्थिक मदत द्यावी.
पीकविमा व शेतकऱ्यांचे प्रश्न:
‘प्रधानमंत्री फसल बीमा योजने’अंतर्गत वर्ष २०२५–२६ चे प्रलंबित पीकविमा दावे तात्काळ निकाली काढून शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करावी. तसेच २०२६–२७ या वर्षापासून पीकविम्यातील पूर्ववत लागू करावे.
ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी शाळा व स्थानिक रोजगार:
जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांच्या मुलांचे शिक्षण खंडित होऊ नये यासाठी मौसमी आणि मोबाईल शाळांची व्यवस्था उभारण्यात यावी, तसेच ऊसतोड कामगारांना स्थानिक पातळीवरच शाश्वत रोजगाराच्या संधी निर्माण करून द्याव्यात.
आरोग्य व वैद्यकीय सुविधांचा विस्तार:
बीड जिल्ह्यासाठी नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सुपर स्पेशालिटी रुग्णालय मंजूर करावे. यासोबतच अंबाजोगाई येथे ५० बेडचे क्रिटिकल केअर ब्लॉक तात्काळ सुरू करावे.
मदतीची मर्यादा ५ लाखांपर्यंत वाढवा:
गंभीर आजारांवरील उपचारांसाठी ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधी’ अंतर्गत खासदारांना दिला जाणारा वार्षिक कोटा वाढवण्यात यावा. तसेच सध्या मिळणारी कमाल ₹३ लाखांची मदत मर्यादा वाढवून ती ₹५ लाख करण्यात यावी.
रेल्वे मार्ग, महामार्ग व उद्योग विकास:
धाराशिव–बीड–छत्रपती संभाजीनगर या महत्त्वपूर्ण रेल्वे मार्गाच्या कामाला गती देऊन आवश्यक तो निधी त्वरित वर्ग करावा. बीडमध्ये कृषी प्रक्रिया उद्योग एमएसएमई व कौशल्य विकासाला चालना देऊन स्थानिक तरुणांसाठी रोजगाराचे मार्ग खुले करावेत.
या भेटीदरम्यान जिल्ह्यातील धार्मिक, ऐतिहासिक व पर्यटनस्थळांचा विकास केंद्रीय योजनांच्या माध्यमातून करण्याची मागणीही करण्यात आली. खासदार बजरंग सोनवणे आणि शिष्टमंडळाने मांडलेल्या या सर्व मागण्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकारात्मक चर्चा केल्याचे समजते.
क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल
आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा
जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका
जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल