आमदार नमिता मुंदडांची बदनामी केल्याप्रकरणी माजी नगरसेवक मोहन कुलकर्णींवर केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
मुंदडांविरोधात वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या मोहन कुलकर्णींवर भाजप तालुकाध्यक्षांच्या तक्रारीवरून केज पोलिसांत कारवाई

केज/अंबाजोगाई (विशेष प्रतिनिधी):
केज विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार नमिता मुंदडा आणि मुंदडा परिवारावर भाजपचेच जुने नेते तथा माजी नगरसेवक मोहन कुलकर्णी यांनी फेसबुक पोस्टद्वारे घणाघाती आरोप करत थेट ‘गद्दार’ अशी शेलकी विशेषणे लावली आहेत. या वादग्रस्त पोस्टनंतर मतदारसंघातील राजकीय वातावरण प्रचंड तापले असून, भाजप केज तालुकाध्यक्ष भगवान केदार यांच्या तक्रारीवरून मोहन कुलकर्णी यांच्याविरोधात केज पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा (NCR No. 0907/2026) दाखल करण्यात आला आहे.
मोहन कुलकर्णींच्या फेसबुक पोस्टमधील स्फोटक आरोप
माजी नगरसेवक मोहन कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर ‘भाजपची अब्रू घालणारे गद्दार मुंदडा’ या शीर्षकाखाली सविस्तर लेख लिहीत मुंदडा घराण्याच्या राजकीय वाटचालीची लक्तरे वेशीवर टांगली. त्यांच्या पोस्टमधील प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे:
वापरून फेकून देण्याचा विक्रम: मुंदडांनी सत्तेसाठी केवळ भाजपचा वापर केला आणि नंतर पक्षाला फेकून दिले. ज्या भाजपने मोठे केले त्यांच्याशी गद्दारी केली, नंतर राष्ट्रवादीत जाऊन मलाई खाल्ली आणि पवारांशीही गद्दारी केली, असा आरोप कुलकर्णी यांनी केला.
ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा अपमान: नगर परिषद निवडणुकीत पक्षासाठी अहोरात्र राबलेले भाजपचे ज्येष्ठ नेते अनिल सिंह बायस व निवडणुकीत वापर करून घेतलेल्या शेख रहीम या दोघांनाही डावलून स्वीकृत सदस्यपदी नवा ‘बळीचा बकरा’ बसवला. बायस यांचा नगराध्यक्षपदाच्या खुर्चीत बसतानाच जाहीर अपमान करण्यात आला.
फंड भाजपचा, मलिदा विरोधकांना: राज्यात भाजपचे सरकार आणि मुख्यमंत्री असताना अंबाजोगाईला आलेला कोट्यवधी रुपयांचा निधी मुंदडांच्या कळपातील भाजप विरोधकांनी गिळला. राष्ट्रपुरुषांना शिव्या देणारे आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवर चिखलफेक करणारे आज मुंदडांसोबत असून, तिकीट, मतदान आणि फंड भाजपचा; पण मुंदडा भाजपविरोधी लोकांनाच पोसत आहेत.
गुन्हेगारीचे ९०% कनेक्शन मुंदडांशी: अंबाजोगाई शहरातील सर्व काळ्या धंद्यांमध्ये मुंदडांचा वाटा असून, वाढत्या गुन्हेगारीतील ९० टक्के धागेदोरे मुंदडांशी जोडलेले आहेत. माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्यासोबत मुंबईत जाऊन शेख रहीम यांनी मुंदडांची लक्तरे वेशीवर टांगली होती, ते आरोप १०० टक्के खरे आहेत, असा गंभीर दावा करत ही केवळ पहिली ठिणगी असून पोलखोल मालिका पुढेही सुरू राहील, असा थेट इशारा कुलकर्णी यांनी दिला.
भाजप पदाधिकारी आक्रमक; केज पोलिसांत धाव घेत गुन्हा नोंदवला
या पोस्टनंतर भाजपच्या स्थानिक गोटात प्रचंड खळबळ उडाली. आमदार नमिता मुंदडा यांची जाणीवपूर्वक बदनामी करून सामाजिक व राजकीय प्रतिमा मलीन केल्याचा आरोप करत भाजप केज तालुकाध्यक्ष भगवान ज्ञानोबा केदार (वय ४८, रा. सांगवी सा.) यांनी केज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
या फिर्यादीवरून केज पोलिसांनी मोहन कुलकर्णी (रा. अंबाजोगाई) यांच्याविरुद्ध NCR No. 0907/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३५६(३) (बदनामी) अंतर्गत अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार पोना १८७७ सोपने यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
भाजप शिष्टमंडळाचे पोलीस निरीक्षकांना पत्र
गुन्हा दाखल करण्यासोबतच भाजप केज तालुक्याच्या वतीने पोलीस निरीक्षकांना अधिकृत पत्र सादर करण्यात आले. लोकशाहीत मत मांडण्याचा अधिकार असला तरी महिला लोकप्रतिनिधीची प्रतिष्ठा व सन्मान राखला गेला पाहिजे. कुलकर्णी यांनी केलेले आरोप पूर्णपणे खोटे व समाजात तेढ निर्माण करणारे आहेत. त्यामुळे ही पोस्ट सोशल मीडियावरून तातडीने हटवून त्यांनी लेखी दिलगिरी व्यक्त करावी, अन्यथा पुढील कठोर कायदेशीर पावले उचलावीत, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. या पत्रावर तालुकाध्यक्ष भगवान केदार महादेव सूर्यांयवंशी, डॉ. वासुदेव नेहरकर, लिबराज फरके,राहूल गदळे, सुनील कोकणे, रोहिदास डांगे, प्रशांत कुंभार, डॉ. बालाजी पवार यांच्या सह अनेकांच्या सह्या आहेत.
एकीकडे पक्षातील जुन्या निष्ठावंतांची उफाळून आलेली अस्वस्थता आणि दुसरीकडे सत्ताधारी आमदारांच्या समर्थकांकडून सुरू असलेली कायदेशीर कारवाई, यामुळे केज-अंबाजोगाईतील भाजपमधील अंतर्गत गटबाजी आता चव्हाट्यावर आली आहे.



