सामाजिक

निसर्गाचा महाप्रकोप! पावसाच्या खंडाने हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट भरपाई द्या: आ. नमिता मुंदडा

निसर्गाने मारले, पावसाने फिरवली पाठ! केज, अंबाजोगाईत पिके जळून खाक; बळीराजाची आर्थिक कोंडी

मुंबई/केज:-बीड जिल्ह्यातील केज विधानसभा मतदारसंघातील केज, अंबाजोगाई व बीड तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात पावसाअभावी निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर खरीप पिकांचे तातडीने पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत, सरसकट पीकविमा लाभ, पिण्याचे पाणी आणि जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्याची मागणी केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता अक्षय मुंदडा यांनी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

आमदार मुंदडा यांनी निवेदनात नमूद केले आहे की, खरीप हंगामाच्या सुरुवातीला समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन, मूग, उडीद, तूर या पिकांची मोठ्या प्रमाणावर पेरणी केली होती. पिकांची वाढही चांगली झाली होती; मात्र गेल्या महिना-दीड महिन्यापासून पावसाने संपूर्ण पाठ फिरवली आहे. नेमके सोयाबीन शेंगा भरण्याच्या आणि कपाशी पाते व बोंड धरण्याच्या अत्यंत संवेदनशील टप्प्यावर असताना पावसाचा खंड पडल्याने पिके पूर्णपणे करपून गेली आहेत. हलक्या व डोंगरपट्ट्यातील जमिनीत भेगा पडल्याने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून शेतकरी पूर्णपणे हतबल झाला आहे.

पाणी व चाऱ्याचे भीषण संकट

पावसाअभावी मोठे प्रकल्प, साठवण तलाव व जलस्रोत कोरडे पडले आहेत. सिंचनासाठी पाणी उपलब्ध नसल्याने खरीप पिकांसोबतच ऊस पिकाचेही अतोनात नुकसान होत आहे. येत्या काळात ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असून जनावरांच्या हिरव्या चाऱ्याची टंचाई जाणवू लागली आहे.

प्रमुख मागण्या:

 दुष्काळग्रस्त भागातील खरीप पिकांचे तात्काळ प्रत्यक्ष पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक भरपाई व सरसकट पीकविमा योजनेचा लाभ द्यावा.

 ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे झालेले नुकसान लक्षात घेऊन त्यांनाही आर्थिक सहाय्य करावे.

 टंचाईग्रस्त गावांमध्ये मागणीनुसार टँकरद्वारे पिण्याचा पुरवठा सुरू करावा व जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था करावी.

निसर्गाच्या लहरीपणामुळे संकटात सापडलेल्या बळीराजाला सावरण्यासाठी शासनाने तातडीने ठोस निर्णय घेऊन शेतकरी व ग्रामीण जनतेच्या पाठीशी उभे राहावे, अशी आग्रही मागणी आमदार नमिता मुंदडा यांनी केली आहे

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button