शैक्षणिक

“केज: शिक्षण क्षेत्रातील कर्तृत्ववान गुरुजनांचा सन्मान; आश्रुबा सोनवणे, सुरेश शिनगारे यांच्यासह पाच जण ठरले पुरस्काराचे मानकरी”

"केवळ पुस्तकी ज्ञानाने संवेदनशील माणूस घडत नाही; संस्कारक्षम शिक्षणाची आज गरज: प्रा. डॉ. शांतिनाथ बनसोडे"

 जीवन विकास शिक्षण मंडळ, केज आयोजित स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा संपन्न

 शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पाच शिक्षकांचा सन्मान

केज :-“आजच्या आधुनिक आणि स्पर्धेच्या युगात केवळ पुस्तकी ज्ञान किंवा तांत्रिक कौशल्ये मिळवून माणूस हुशार बनू शकतो; मात्र चांगला व संवेदनशील नागरिक घडवण्यासाठी मूल्याधिष्ठित संस्कारांची नितांत गरज आहे. संस्कारक्षम शिक्षणच तरुण पिढीतील असंवेदनशीलतेला व गैरप्रवृत्तींना आळा घालू शकते,” असे परखड प्रतिपादन अंबाजोगाई येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे सेवानिवृत्त वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. डॉ. शांतिनाथ बनसोडे यांनी केले.

येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर (माध्यमिक विभाग) शाळेत ५ सप्टेंबर रोजी जीवन विकास शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित ‘स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार’ वितरण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव जी. बी. गदळे होते.

या सोहळ्यात शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या पाच शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. यामध्ये आश्रुबा अर्जुनराव सोनवणे (से.नि. मुख्याध्यापक, जि.प.कें.प्रा.शा. केज), सुरेश भैरुनाथ शिनगारे (सहशिक्षक, श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, आडस), बाबुराव लिंबाजी पाळवदे (सहशिक्षक, जि.प.प्रा.शा. सारुळ-बरडफाटा), सौ. दिपा चंद्रकांत मोटे (जि.प.प्रा.शा. सारणी आ.) आणि सुनिल रावसाहेब राऊत (बाबुरावजी आडसकर महाविद्यालय, केज) यांचा समावेश आहे.

सत्काराला उत्तर देताना आश्रुबा सोनवणे यांनी गुरुजींच्या साधेपणाची व समाजऋण फेडण्याच्या भूमिकेची आठवण काढली. सुरेश शिनगारे यांनी शिक्षकाने सामाजिक बांधिलकी जपत व्यसनमुक्तीचे धडे दिले पाहिजेत असे मत मांडले, तर सौ. दिपा मोटे यांनी मोबाईल हे केवळ साधन असून ते साध्य नाही, याचे भान विद्यार्थी व पालकांनी ठेवणे गरजेचे असल्याचे सांगितले.

अध्यक्षीय भाषणात जी. बी. गदळे म्हणाले, “शिक्षण, आरोग्य व शिस्त ही नाळवंडीकर गुरुजींची जीवनमूल्ये होती. संस्थेचा आधारस्तंभ असलेल्या अशा थोर शिक्षकाचा आदर्श पुढच्या पिढीने घेतला पाहिजे.”

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सहशिक्षक प्रबोधकांत समुद्रे व विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले. प्रास्ताविक अजय देशपांडे यांनी करत पुरस्कारामागची पार्श्वभूमी स्पष्ट केली. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अंकुशराव इंगळे, नारायण अंधारे, इंजि. दिनकरराव नाळवंडीकर, विजयकुमार शिनगारे, शिवाजीराव समुद्रे, मुख्याध्यापिका शिवनंदा मुळे, प्राचार्य शंकर भैरट, अविनाश कराड आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रबोधकांत समुद्रे यांनी केले, तर दत्ता सत्वधर यांनी आभार मानले.

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button