राजकारण

“चमचेगिरी करणाऱ्यांना स्वाभिमान, सन्मान आणि निष्ठेची अजिबात गरज नसते. त्यांना फक्त एवढंच हवं असतं की ताट बदललं तरी चालेल, पण तुकडा बंद पडता कामा नये!”

मालक कोणताही असो, मलाई महत्त्वाची! जिल्हा परिषद-नगरपंचायतीच्या तोंडावर निष्ठावंतांना लाथ, संधिसाधूंना पायघड्या

केज (प्रतिनिधी):”चमचेगिरी करणाऱ्यांना स्वाभिमान, सन्मान आणि निष्ठेची अजिबात गरज नसते. त्यांना फक्त एवढंच हवं असतं की ताट बदललं तरी चालेल, पण तुकडा बंद पडता कामा नये!”— सध्या केज तालुक्याच्या व शहराच्या राजकीय कट्ट्यांवर हेच वाक्य चपखल बसताना दिसत आहे. आगामी २०२७ च्या बीड जिल्हा परिषद व केज नगरपंचायत निवडणुकीचे वेध लागताच स्थानिक राजकारणात निष्ठा आणि विचारधारेला कायमची तिलांजली देऊन केवळ ‘तुकड्यासाठी’ झोळ्या पसरणाऱ्या संधिसाधू नेत्यांची नवी फौज सक्रिय झाली आहे.
गेल्या निवडणुकीत ज्या पक्षाच्या नावाने घोषणा देत घसा कोरडा केला, ज्या विचारधारेवर जनतेकडे मते मागितली, त्या सगळ्याला लाथ मारून केवळ सत्तेची मलाई चाखण्यासाठी पक्ष बदलणाऱ्या स्थानिक नेत्यांची बीड जिल्ह्यात व केजमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. कालपर्यंत एका मंचावर बसून दुसऱ्या पक्षाच्या नावाने शिमगा करणारे अनेक जनाधार गमावलेले नेते आज त्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या चरणी लीन होताना दिसत आहेत. कारण उघड आहे— सत्तेचे ताट बदलले तरी चालेल, पण पुढची पाच वर्षे आपली सोय लावणारा तुकडा कायम मिळायला हवा.
निष्ठा आणि स्वाभिमान वाऱ्यावर बीड जिल्हा परिषद व केज नगरपंचायतीच्या आगामी रणधुमाळीत अनेक प्रभागांत अशा राजकीय नेत्यांची चलती पाहायला मिळत आहे. सामान्य कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून आणि जनतेच्या विश्वासाचा सौदा करून केवळ स्वतःच्या वैयक्तिक लाभासाठी इकडून तिकडे उड्या मारणाऱ्या या नेत्यांना आता कसलीही चाड उरलेली नाही. स्वतःला ‘जनसेवक’ म्हणवून घेणाऱ्या या नेत्यांचा स्वाभिमान आणि सन्मान नेमका कुठे गहाण पडला आहे, असा थेट सवाल आता केजमधील सजग नागरिक विचारत आहेत.
जनता दाखवणार का जागा?
कोणत्याही पक्षाचा झेंडा खांद्यावर असो, सत्तेच्या जवळ राहून फक्त स्वतःची पोळी भाजून घेणे, हाच या पक्षांतर बहाद्दर नेत्यांचा एकमेव अजेंडा उरला आहे. मात्र,बीड जिल्ह्यातील व केजमधील मतदार आता या राजकीय कोलांटउड्यांवर बारीक नजर ठेवून आहेत. सत्तेच्या तुकड्यासाठी वारंवार निष्ठा विकणाऱ्या या नेत्यांना २०२७ च्या निवडणुकीत जनता मतदानातून योग्य तो धडा शिकवणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button