Uncategorized

केज आगाराच्या मोक्याच्या जागेचा होणार कायापालट; ई-बस चार्जिंग स्टेशनसोबत उभारणार व्यापारी गाळे!

केज आगार जागेवर व्यापारी गाळ्यांचा समावेश करा; आ. नमिता मुंदडांचे परिवहन मंत्र्यांना साकडे

केजच्या विकासाला नवी दिशा: बस आगाराच्या जागेवर ई-बस चार्जिंग स्टेशनसह व्यापारी संकुल; आमदार नमिता मुंदडा यांची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

केज:-केज शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी गती देण्यासाठी आमदार नमिता अक्षय मुंदडा यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. केज येथील राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) जागेवर प्रस्तावित असलेल्या इलेक्ट्रिक बस चार्जिंग स्टेशनच्या आराखड्यात मुख्य रस्त्यालगत व्यापारी गाळ्यांचा (शॉप्स) समावेश करावा, अशी आग्रही मागणी आमदार नमिता मुंदडा यांनी राज्याचे परिवहन मंत्री ना. प्रतापजी सरनाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निर्णयामुळे महामंडळाला नियमित उत्पन्न मिळण्यासोबतच केजमधील स्थानिक व्यापाऱ्यांना सुसज्ज जागा उपलब्ध होणार असून शहराच्या वैभवात भर पडणार आहे.

मोक्याच्या जागेचा होणार सुवर्णमध्य साधणारा विकास

केज येथे माजी मंत्री स्व. डॉ. विमलताई मुंदडा यांच्या प्रयत्नांतून एसटी आगारासाठी ८.८३ हेक्टर आर जमीन उपलब्ध झालेली आहे. सध्या या जागेवर महामंडळाच्या वतीने अत्याधुनिक इलेक्ट्रिक बस चार्जिंग स्टेशन उभारणीची प्रक्रिया सुरू असून, त्यासाठीचा विद्युत व स्थापत्य कामांचा आराखडा मंजुरीच्या टप्प्यात आहे.

सदर जागा राष्ट्रीय महामार्गालगत अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असल्याने, तिचा केवळ चार्जिंग स्टेशनपुरता वापर मर्यादित न ठेवता नियोजित व्यापारी संकुलाच्या माध्यमातून बहुउद्देशीय वापर व्हावा, असा दूरगामी दृष्टिकोन आमदार मुंदडा यांनी मांडला आहे.

एसटीला महसूल, तर स्थानिक तरुणांना रोजगाराची संधी

मुख्य रस्त्यालगत व्यापारी गाळे उभारल्यास राज्य परिवहन महामंडळाला भाड्याच्या माध्यमातून कायमस्वरूपी व मोठा महसूल प्राप्त होईल. त्याचबरोबर केज शहरातील स्थानिक व्यापारी आणि सुशिक्षित बेरोजगार तरुणांना महामार्गालगत हक्काची व्यावसायिक जागा मिळेल, ज्यामुळे शहरात नवे उद्योग-व्यवसाय बहरतील.

शासकीय जागेचे संरक्षण आणि सुनियोजित रूप

या संपूर्ण जागेचा एकात्मिक विकास केल्यास महामंडळाच्या बहुमूल्य जमिनीवर होणारे संभाव्य अतिक्रमण आणि अनधिकृत वापर रोखण्यास मोठी मदत होईल. अत्याधुनिक ई-बस चार्जिंग स्टेशन आणि समोर देखणे व्यापारी गाळे अशा एकत्रित रचनेमुळे केज शहराच्या प्रवेशद्वाराचे रूप अधिक आधुनिक आणि शिस्तबद्ध दिसेल.

या बाबींचा सकारात्मक विचार करून ई-बस चार्जिंग स्टेशनच्या मूळ आराखड्यात व्यापारी गाळ्यांचा समावेश करण्यास तत्त्वतः मान्यता द्यावी आणि सुधारित अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेश संबंधित विभागाला द्यावेत, अशी विनंती आमदार नमिता मुंदडा यांनी पत्रात केली आहे. आमदार मुंदडा यांच्या या विकासोन्मुख भूमिकेचे केज शहर आणि परिसरातील व्यापारी वर्गाकडून जोरदार स्वागत होत आहे.

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button