“केज शहरातील वाहतुकीस अडथळा ठरणारा चौक कोणत्याही जातीचा असो, त्याचा आकार कमी झालाच पाहिजे; जातीयवादी टोळक्यांना पोसणाऱ्या नेत्यांनाही धडा शिकवा!”
बीड / केज (प्रतिनिधी): बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते मंडळींना मनापासून नमस्कार!
आज बीड जिल्ह्यातील सामाजिक चित्र पाहिले तर नेते मंडळी, तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण करताना दिसत आहेत. समाजा-समाजात जातीय तेढ निर्माण करण्यात आणि माणसाला माणसापासून दूर करण्यात तुम्हाला अमर्याद यश आलेले दिसत आहे. आज बीड जिल्ह्याला जातीयवादाची जी कीड लागली आहे, त्याला बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते मंडळी १००% जबाबदार आहेत, हा थेट आणि स्पष्ट आरोप आता सुजाण नागरिक करू लागले आहेत.
केज शहरातील भवानी चौकाचा आकार कमी झालाच पाहिजे!
केज शहरातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर भवानी चौकात वाहतुकीला प्रचंड अडथळा निर्माण होत आहे. हा चौक मग कोणत्याही जातीचा असो किंवा धर्माचा असो, रस्ता आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी अन् लोकांचे प्राण वाचवण्यासाठी चौकाचा आकारमान कमी केलेच पाहिजे! काही ५-७ दिवसांपूर्वी याच चौकात एक अत्यंत भीषण अपघात घडला. एका निष्पाप व्यक्तीच्या पोटावरून गाडी गेल्याने त्याचा दोन्ही पायांचा चेंदामेंदा झाला आणि अत्यंत दुर्दैवी अवस्थेत त्याचा जीव गेला. या चौकात आत्तापर्यंत ५ ते ७ निरपराध माणसांनी आपले प्राण गमावले आहेत. तरीही काही बेजबाबदार टोळके चौकाचा धोकादायक भाग हटवण्यास विरोध करत आहेत. रस्त्यावरील चौकापेक्षा किंवा सिमेंट-मातीच्या आकारापेक्षा माणसाचा जीव महत्त्वाचा आहे, हे या बिनडोक लोकांना कधी कळणार?
जातीयवादी टोळक्यांना पोसणारे नेते कोण? अशा नेत्यांनाही धडा शिकवा!
चौका-चौकात आणि सोशल मीडियावर जातीयतेचे विष कालवणारी ही बेजबाबदार टोळकी स्वतःच्या हिमतीवर उरमाटलेली नाहीत. या विषारी टोळक्यांच्या पाठीशी कोणते नेते उभे आहेत? यांना रसद पुरवणारे, राजकीय संरक्षण देणारे आणि स्वतःच्या स्वार्थासाठी पोसणारे नेते कोण आहेत? हे आता संपूर्ण केज व बीड जिल्ह्याला चांगलेच ठाऊक झाले आहे.
आपल्या राजकीय पोळ्या भाजण्यासाठी अशा गुंड प्रवृत्तीच्या व जातीयवादी टोळक्यांना हाताशी धरणाऱ्या नेत्यांना आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे. जोपर्यंत सामान्य जनता अशा स्वार्थी नेत्यांना आणि त्यांच्या पाळलेल्या चमच्यांना मतपेटीतून व सामाजिक बहिष्काराने धडा शिकवत नाही, तोपर्यंत हे गलिच्छ राजकारण थांबणार नाही!
अपघातात मेलेल्याची जात शोधणे ही माणुसकीची हार!
संतापजनक आणि चीड आणणारी गोष्ट म्हणजे—आज अपघातात दुर्दैवी बळी पडलेल्या माणसाची जात शोधली जाते, जात विचारली जाते! ही या जिल्ह्याच्या पुरोगामी परंपरेची आणि माणुसकीची प्रचंड मोठी हार आहे.
ज्या १८ ते ३० वयोगटातील तरुण पिढीने हातात पुस्तके घेऊन, शिक्षण घेऊन स्वतःचे आणि देशाचे भवितव्य घडवायला हवे होते, ते तरुण आज अंधश्रद्धा, जातीयवाद, पुतळे आणि चौकांच्या राजकारणाने पछाडले गेले आहेत. नेत्यांच्या स्वार्थासाठी हा तरुण वर्ग स्वतःचे आयुष्य उद्ध्वस्त करून घेत आहे.
हिंदू-मुस्लिम आणि जातीपातीचे ‘नाटकी राजकारण’ बंद करा!
मुंबईत गेले की “मराठा आणि ओबीसी धोक्यात,” बीड जिल्ह्यात आले की “मराठा, वंजारी, माळी, साळी आणि १८ पगड जाती धोक्यात!”… शेवटी हे चाललंय तरी काय? हिंदू-मुस्लिम किंवा जातीपातीचा खेळ खेळणारे हे सर्व नेते आणि कार्यकर्ते अत्यंत नाटकी लोक आहेत.
जर नेत्यांना आणि त्यांच्या चेल्यांना खरच लढायचे असेल, तर त्यांनी स्वतः एकट्याने समोर येऊन लढावे. आपल्या राजकीय भाकरी भाजण्यासाठी गोरगरिबांच्या, शेतकऱ्यांच्या पोरांना बळीचा कातडा करू नये!
केज आणि बीड जिल्ह्याला आज गरज आहे ती ‘माणुसकीच्या धर्माची’. नेते मंडळींनो… सत्ता आणि मतांसाठी समाजाचा बळी देणे थांबवा आणि समाजात पुन्हा एकदा माणुसकीची पेरणी करा!
– बीड / केज जिल्ह्यातील एका जागृत नागरिक व पत्रकाराचे अनावृत्त पत्र.
क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल
आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा
जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका
जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल