पुणे/केज/परळी:-पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवाल याच्या लोहगड किल्ल्यावरील निर्घृण हत्या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत बीड कनेक्शन उघड केले आहे. या हत्याकांडाच्या कटात सहभाग असल्याच्या आणि आरोपींना मदत केल्याच्या संशयावरून मूळचा केज तालुक्यातील रहिवासी असलेला तरुण रितेश हांगे याला पोलिसांनी अटक केली आहे. या अटकेमुळे बीड व परळी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
लोहगडावर रचला होता थरार
केतन अग्रवाल आणि मुख्य संशयित तरुणी सिया गोयल यांचा विवाह ठरला होता. मात्र, सियाचे चेतन चौधरी या तरुणाशी प्रेमसंबंध होते. यातूनच केतनचा काटा काढण्यासाठी पूर्वनियोजित कट रचण्यात आला. फिरायला नेण्याच्या बहाण्याने केतनला लोहगड किल्ल्यावर नेऊन तिथून थेट दरीत ढकलून देत त्याचा खून करण्यात आला होता. सुरुवातीला अपघाताचा भास निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, मात्र पोलिसांच्या सखोल तपासात हा पूर्वनियोजित खून असल्याचे निष्पन्न झाले.
कोण आहे रितेश हांगे?
तपासात निष्पन्न झालेल्या माहितीनुसार, रितेश हांगे हा मूळचा बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील हांगेवाडी येथील असून, त्याचे कुटुंब परळी वैजनाथ येथे स्थायिक झालेले आहे. रितेश पुण्यात बालेवाडी परिसरात एका खासगी आयटी कंपनीत नोकरी करत होता. तो मुख्य आरोपी चेतन चौधरी आणि सिया गोयल यांचा कॉलेजमधील वर्गमित्र असल्याची माहिती समोर आली आहे.
कटाची पूर्वकल्पना आणि पोलिसांचा फास
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, केतन अग्रवालच्या हत्येच्या संपूर्ण कटाची रितेश हांगेला आधीपासूनच माहिती होती. गुन्हा घडल्यानंतरही मुख्य आरोपी सातत्याने त्याच्या संपर्कात होते. कॉल डिटेल्स रेकॉर्ड (CDR) आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी संशयाची सुई वळवत रितेशला ताब्यात घेतले आणि कसून चौकशीनंतर त्याला बेड्या ठोकल्या.
राजकीय अफवांना पूर्णविराम
बीड जिल्ह्यातील तरुण या गुन्ह्यात अडकल्याने स्थानिक पातळीवर आणि राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले होते. बीडमधील एका राजकीय नेत्यांच्या गुन्हेगारी आश्रयावरून सोशल मीडियावर विविध चर्चा रंगू लागल्या होत्या. मात्र, पोलिसांनी या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत. हा गुन्हा पूर्णपणे वैयक्तिक प्रेमसंबंध, त्रिकोणी प्रेम आणि त्यातून निर्माण झालेल्या वादातूनच घडलेला असून, यात कुठलीही राजकीय सुपारी, टोळीयुद्ध किंवा राजकीय नेत्याचा कसलाही संबंध नसल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
सध्या रितेश हांगेची पोलीस कोठडीत कसून चौकशी सुरू असून, या हत्याकांडात त्याने प्रत्यक्ष काय रसद पुरवली होती, याचा सखोल तपास पुणे ग्रामीण पोलीस करत आहेत.
क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल
आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा
जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका
जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल