राजकारण
गद्दार, भ्रष्ट,नेत्यांना धडा शिकवण्यासाठी विधानसभेची निवडणुक जनतेच्या हाती
अनेक उमेदवार झोपवले जाणार

लोकसभेची निवडणूक ज्याप्रकारे लोकांनी हातामध्ये घेतली होती अगदी तशीच विधानसभेची देखील निवडणूक या महाराष्ट्राच्या जनतेने हातात घेतल्यासारखे चित्र सगळीकडे दिसत आहे.
हि निवडणूक साधी नाही. ही निवडणूक महाराष्ट्राला नाही तर देशाला दिशा देणारी ठरणार आहे. यासाठी मतदान करताना एकदा कोरोना काळ आठवा. ज्या काळात उत्तरेकडील राज्यात सुविधांची वाहनवाह होती त्यावेळी हा महाराष्ट्र चांगल्या पद्धतीने कोणी सावरला ? हा प्रश्न स्वतःला विचारा. आणि त्या महाराष्ट्र सावरणाऱ्या ‘कुटुंब प्रमुखाला’ कशा पद्धतीने एका रात्री गद्दारांमुळे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. ती काळी रात्र आठवा. ती काळी रात्र हा महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. त्याचा वचपा काढण्याची ही निवडणूक आहे.
त्यानंतर आलेल्या सरकारने जो विरोधात जातो त्याच्यावर ईडीची कारवाई, जेलची वारी करायला लावलेल्या गोष्टी देखील लक्षात ठेवा. आणि जो सोबत येतो त्यांचे ७० हजार कोटींचे घोटाळे देखील माफ केले गेले हे देखील या महाराष्ट्राने पाहिलेच की. हे सर्व हा महाराष्ट्र शांत पध्दतीने पाहत होता. तसा महाराष्ट्र खूप संयमी…
एवढंच काय तर या महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची कित्येकदा झालेली विटंबना, अवमान देखील हा महाराष्ट्र विसरला नाही. क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेली विधाने देखील हा महाराष्ट्र विसरला नाही. सर्वात वाईट गोष्ट काय माहिती आहे का ? आपल्या बापाचा पुतळा या महाराष्ट्रात पडतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात या महाराष्ट्रात भ्रष्टाचार होतो. ही गोष्ट महाराष्ट्रासाठी निश्चितच भूषणावह नाही. आणि या सर्व गोष्टींवरून लक्ष हटवण्यासाठी महाराष्ट्रात धार्मिक ध्रुवीकरणाचे अस्त्र वापरले जाते. पैगंबर साहेबांचा अवमान करून वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न केला जातो. ज्या पैगंबर साहेबांवर क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी स्तुतीसुमने उधळली त्यांच्याच महाराष्ट्रात हे सर्व घडले. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी १८ पगड जाती आणि सर्व धर्मियांना जोडले त्यांच्या महाराष्ट्रात हे सर्व घडले. ज्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिले त्या महामानवाच्या महाराष्ट्रात हे घडले. आता तुम्हाला आपण कुठल्या राज्यात राहतोय आणि त्या राज्याचे महत्व काय हे समजले असेलच. मग या महाराष्ट्राचे किती सांस्कृतिक नुकसान झाले याचा अंदाज तुमचा तुम्हीच लावा.
आणि या सर्व गोष्टी १५०० रुपये महिन्याला देऊन भरून काढू असे यांना वाटत आहे. खरच हे सर्व भरून निघणार आहे का ? ते १५०० रुपये देऊन या महाराष्ट्रात महागाईचा स्तोम देखील यांनी माजवला तो वेगळाच. दिले पंधराशेच पण लोकांच्या खिशातून चौपट रक्कम महागाईच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेकडून यांनी वसूल केली. घरातील कुठली वस्तू तुम्हाला स्वस्त मिळते ते सांगा. मुद्दा एवढाच नाही. तर महाराष्ट्रातील कित्येक उद्योग गुजरातला नेले गेले. महाराष्ट्रातील तरुणांच्या नोकऱ्या पळवल्या गेल्या. या माध्यमातून महाराष्ट्राचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न देखील नेटाने सुरू राहिला.
हे सर्व महाराष्ट्र पाहत होता. आणि तो यावर घाव घालण्यासाठी ज्या दिवसाची वाट पाहत होता तो हा दिवस आहे. हा दिवस आणि ही संधी घालवू नका. हा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र दिल्लीचे तख्त हादरवण्याची क्षमता बाळगतो हे आपण लोकसभेत दाखवलेच आहे. आता ‘गुजरात पुढे हा महाराष्ट्र झुकणार नाही’ हे दाखवण्याची ही वेळ. पण हे सर्व घरात बसून होणार आहे का ?
बदल हा घरात बसून घडत नसतो. त्यासाठी रस्त्यावर यावे लागते. बूथ वर थांबावे लागते. आपल्या परिसरात आपल्या परिचितांना निर्णय काय घ्यावा ? हे सांगावे लागते. त्यावेळी खऱ्या अर्थाने बदल घडत असतो. आपण सर्वजण ‘आपल्या महाराष्ट्रासाठी’ ही जबाबदारी पार पाडाल हा विश्वास मला आहे. हे करताना आपल्या पेक्षा वेगळ्या विचारांची लोक पण आपल्याला भेटतील. पण तीही आपली भावंडेच आहेत. त्यांचा विचार फक्त वेगळा आहे. तोही बदलण्याचा आपण प्रयत्न करूच. पण तूर्तास ही लोकशाहीची अंतिम लढाई पूर्ण ताकतीने लढू, जिंकू आणि महाराष्ट्र द्रोहींना कात्रजचा घाट दाखवू…
राम कृष्ण हरी, गाडुया गद्दारी, आपला हात भारी…
जय महाराष्ट्र



