क्राईम
प्रकाश भांडवलकर मृत्यू प्रकरण: मोठ्या कटाचा संशय, संशयित महिला व साथीदार पोलिसांच्या ताब्यात!

लातूर वृत्तसेवा:-केज व माजलगाव परिसरात परिचित असलेले हॉटेल व्यावसायिक प्रकाश नानासाहेब भांडवलकर (पप्पू), रा. सोनिजवळा (ह.मु. केज/माजलगाव) यांचा लातूर येथील एका फ्लॅटवर संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला असून, हा घातपात (खून) आहे की आत्महत्या, याबाबत परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहेत.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मूळचे सोनिजवळा येथील रहिवासी असलेले प्रकाश भांडवलकर (पप्पू) हे व्यवसाय आणि नोकरीच्या निमित्ताने केज शहरात वास्तव्यास होते. त्यांनी काही वर्षे हॉटेल व्यवसायात मॅनेजर म्हणून काम केले होते. त्यानंतर त्यांच्या पत्नीच्या नोकरीनिमित्त ते माजलगाव येथे राहू लागले.
काही दिवसांपूर्वी लातूर येथील एका महिलेशी त्यांचा संपर्क आला होता, ज्यामुळे त्यांचे लातूर येथे येणे-जाणे वाढले होते. काल ते लातूर येथील संबंधित महिलेच्या फ्लॅटवर गेले होते. मात्र, त्यानंतर याच फ्लॅटमध्ये प्रकाश भांडवलकर यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अत्यंत संशयास्पद अवस्थेत आढळून आला.
पोलिसांची तत्परता: संशयित ताब्यात
घटना घडल्यानंतर संबंधित महिला आणि तिच्यासोबत असलेले काही लोक घटनास्थळावरून फरार होण्याच्या तयारीत होते. मात्र, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अत्यंत तत्परता दाखवत फरार होण्याच्या मार्गावर असलेल्या संशयितांना तात्काळ ताब्यात घेतले आहे.
मोठा कट असण्याची शक्यता; पोलिसांचा सखोल तपास
या धक्कादायक प्रकरणाला आता वेगळे वळण मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संपूर्ण प्रकरणात केवळ ताब्यात घेतलेले संशयितच सामील आहेत की यामागे आणखी कोणी पडद्यामागून सूत्रे हलवून मोठा कट (कॉन्स्पिरसी) रचला आहे? आणि या घटनेला अंतिम स्वरूप दिले आहे का? या दिशेने देखील पोलिसांनी आपला तपास चक्राकार फिरवला आहे. या प्रकरणाचा मुख्य मास्टरमाईंड कोण आहे, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.
खून की आत्महत्या? गूढ कायम
प्रकाश भांडवलकर यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा प्रकार आत्महत्या आहे की घातपात, याबाबत पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.
पोलीस तपास सुरू:
“मृतदेहाचे शवविच्छेदन (पोस्टमार्टम) करण्यात येणार असून, वैद्यकीय अहवाल (PM Report) आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले असून, या गुन्ह्यात इतर कोणाचा कट किंवा सहभाग आहे का, याचा सखोल तपास सुरू आहे,” अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.



