कृषी

वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास ७ जुलैला महावितरण कार्यालयावर बेमुदत धरणे आंदोलन; सोनीजवळा येथील शेतकऱ्यांचा इशारा

केज (क्रांतीसूर्य न्यूज):मागील १५ दिवसांपासून शेतकऱ्यांची वीज कापून तुम्ही त्यांचे काय भिजवणार आहात?” असा संतप्त सवाल करत केज तालुक्यातील सोनीजवळा येथील समस्त शेतकऱ्यांनी महावितरण प्रशासनाला तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. दिवसाला केवळ ३ तास वीज द्यायची आणि त्यातही १० वेळा ट्रिपिंग मारून शेतकऱ्यांच्या मोटारी आणि ट्रान्सफॉर्मर जाळायचे, हा महावितरणचा गलथान कारभार आता शेतकऱ्यांच्या सहनशीलतेच्या पलीकडे गेला आहे. आज ३ जुलै रोजी शेतकऱ्यांनी थेट केज उपविभागीय कार्यालयात धडक देऊन प्रशासनाचे डोळे उघडणारे निवेदन सादर केले.
महावितरणचा सुलतानी कारभार; पिके जळण्याच्या मार्गावर!
पावसाच्या लहरीपणामुळे शेतकरी आधीच अडचणीत असताना, आता महावितरणच्या सुलतानी कारभारामुळे सोनीजवळा परिसरातील उभ्या पिकांचा घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाली आहे. पूर्वीप्रमाणे नियमित ८ तास वीज पुरवठा करणे सोडून प्रशासनाने गेल्या दोन आठवड्यांपासून विजेचा खेळखंडोबा मांडला आहे. २४ तासांतून अवघे ३ तास वीज मिळते, आणि त्या ३ तासांत तब्बल १० वेळा वीज गुल होते. या सततच्या ट्रिपिंगमुळे पाणी तर सुटत नाहीच, उलट शेतकऱ्यांचे महागडे स्टार्टर, केबल आणि ऑईल पॅनल जळून खाक होत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे पार मोडले आहे.
…तर ७ जुलैला महावितरण कार्यालयाला घेराव घालून ठिय्या!
स्थानिक वीज कर्मचाऱ्यांना वारंवार सांगूनही ढिम्म प्रशासन हलत नसल्याने, अखेर सोनीजवळा येथील समस्त शेतकऱ्यांनी लेखी निवेदनाद्वारे प्रशासनाला शेवटचा अल्टिमेटम दिला आहे. जर येत्या सोमवार, ६ जुलै २०२६ पर्यंत सोनीजवळा येथील वीज पुरवठा सुरळीत करून रोज ८ तास वीज दिली नाही, तर मंगळवार, ७ जुलै २०२६ रोजी महावितरणच्या केज कार्यालयासमोर शेतकरी बेमुदत धरणे आंदोलन व उपोषण सुरू करतील, असा आक्रमक इशारा देण्यात आला आहे.
या निवेदनावर गावचे प्रमुख शेतकरी गोविंद दत्तात्रय ससाणे, पटेल मिनाज यूसूफ,ओव्हाळ नारायण बाबूराव, ससाणे मनोज दिगंबर, ससाणे धीरज शिवदास, स्वप्नील चंद्रकांत ससाणे, चंद्रकांत रामराव ससाणे, यांच्यासह सोनीजवळा परिसरातील अनेक त्रस्त शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
आता या थेट इशाऱ्यानंतर तरी महावितरणचे सुस्त अधिकारी जागे होऊन शेतकऱ्यांना न्याय देणार, की शेतकऱ्यांच्या रोषाला बळी पडणार? हे येत्या दोन दिवसांत स्पष्ट होईल.

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button