
केज:- अक्षय ऊर्जा क्षेत्रातील ‘आवादा’ नामक कंपनीने तालुक्यात पवनचक्क्या उभारणीचे काम हाती घेतले आहे. प्रशासनाला हाताशी धरून कंपनीने मनमाणीपणाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. कंपनीने प्रकल्पस्थळाच्या परिसरात रस्ते बांधणीचे काम करण्यासाठी गौण खनिजापोटी किती रॉयल्टी भरली याबाबत माहिती देण्यास केज तहसील प्रशासनाने चुप्पी साधली आहे.
‘आवादा’ कंपनीने तालुक्यातील विडा परिसरात अनेक ठिकाणी पवनचक्क्या उभारणीचे काम हाती घेतले आहे. असे करताना कंपनीने ना ग्रामसभेची मंजुरी घेतली ना ग्रामपंचायतीची नाहरकत घेतली. स्थानिक गावपुढारी आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांना हाताशी धरून कंपनीने परिसरात दंडेलशाही सुरू केली आहे. प्रकल्पस्थळाच्या परिसरात अवजड वाहतुकीसाठी रस्ते तयार करताना उभी पिके नष्ट करून शेतकऱ्यांच्या परवानगी विना त्यांची जमीन ओरबाडण्यात आली. कंपनीने शेत खोदून त्यात दगड व मुरूम टाकून रस्ते तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. असे करताना कंपनीच्या यंत्रणेने परिसरातील अनेक ठिकाणी उत्खनन करून बेसुमार गौण खनिजाचा उपसा सुरू केला आहे. शिवाय रॉयल्टी चुकवण्यासाठी काही शेतकऱ्यांच्या हातावर जुजबी रक्कम टेकवून विहिरीवरचा भराव देखील उचलला आहे. प्रकल्प परिसरात अनेक किलोमीटरचे रस्ते तयार केले जात आहेत. या कामासाठी कंपनीने किती ब्रास गौण खनिज उत्खननाची परवानगी घेतली असा सवाल केज तहसीलच्या गौण खनिज विभागाला विचारला असता तेथील कर्मचाऱ्याने चुप्पी साधली. सतत विचारणा केल्यानंतर त्या कर्मचाऱ्याने तहसीलदाराकडे बोट दाखवले. माहिती दडवून तहसील प्रशासन नेमके काय साधण्याचा प्रयत्न करत आहे याबत गूढ निर्माण झाले आहे. तालुक्यांमध्ये इतर ठिकाणी देखील गौण खनिजाचे अवैध उत्खनन सुरू असल्याने शासनाच्या लाखो रूपयांच्या रॉयल्टी वसुलीवर मोठा परिणाम होत असल्याचे चित्र आहे.
सामान्य नागरिकाने परवानगी न घेता गौण खनिजाचे उत्खनन अथवा वाहतूक केल्यास लाखावर दंड करणारे तहसिल प्रशासन आवादा कंपनीच्या बाबतीत मूग गिळून गप्प का बसत आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.



