Uncategorized
केजच्या भवानी चौकात हास्य क्लबचा सर्जिकल स्ट्राइक; जेसीबी लावून उडवला धोकादायक भाग!
'आता अजून किती बळी घेणार?' केजमधील नितीन चाटे यांच्या भीषण अंतानंतर संताप; प्रशासनाला दणका देत भवानी चौकातील अडथळा हटवला!

- केज :-शहर व परिसरात अपघातांचे प्रमाण अत्यंत गंभीररीत्या वाढले असून रस्ते आणि चौकांमधील अडथळ्यांमुळे अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. काल नितीन चाटे यांचा भवानी चौकात झालेल्या भीषण अपघातात विदारक अंत झाला. या दुःखद घटनेनंतर संतप्त झालेल्या आणि प्रशासनाच्या कारभाराला कंटाळलेल्या ‘हास्य क्लब (संसद मार्ग, केज)’ च्या सदस्यांनी स्वतः पुढाकार घेत आज भवानी चौकातील अपघातास कारणीभूत ठरणारा विस्तारित भाग जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त केला.
राजकीय डोळेझाक आणि प्रशासकीय दुर्लक्ष
भवानी चौकातील या धोकादायक रचनेमुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. स्थानिक नागरिकांनी व वाहनधारकांनी याबाबत प्रशासन आणि राजकीय लोकप्रतिनिधींकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या. मात्र, आगामी निवडणुका आणि मतदानाचे राजकारण डोळ्यासमोर ठेवून जबाबदारांनी या गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केली, असा थेट आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
हास्य क्लबचा धडक निर्णय
प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याचे पाहून आणि आणखी कोणाचा बळी जाऊ नये या उद्देशाने, ‘हास्य क्लब’च्या सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली. आज सायंकाळी ५ वाजता सदस्यांनी स्वतः जेसीबी (JCB) मागवून चौकातील विस्तारित आणि धोकादायक भाग हटवला.
वाहनचालक व नागरिकांमधून समाधान
हास्य क्लबने दाखवलेल्या या धाडसाचे आणि सामाजिक भान जपत घेतलेल्या निर्णयाचे केज शहरातील वाहनचालक व नागरिकांमधून जोरदार स्वागत होत आहे. दररोजच्या अपघाताच्या भीतीतून काही अंशी दिलासा मिळाल्याची भावना वाहनधारकांनी व्यक्त केली आहे.



