क्राईम

तुकाराम मुंढेंच्या धडक मोहिमेचा दणका: आष्टीमधे दूध भेसळ रॅकेटचा पर्दाफाश; १८०० किलो व्हे पावडरसह सूत्रधार दिलीप हंबर्डे गजाआड!

आष्टी (प्रतिनिधी):राज्याचे अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात भेसळखोरांविरुद्ध सुरू केलेल्या आक्रमक मोहिमेचा मोठा दणका आता बीड जिल्ह्यातही बसला आहे. नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्या अन्न भेसळखोरांवर कठोर कारवाई करण्याचे थेट आदेश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले असून, त्यानुसार अन्न व औषध प्रशासन आणि आष्टी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत आष्टीतील मोठ्या दूध भेसळ रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तब्बल १,८०० किलो व्हे पावडर जप्त करण्यात आली असून, रॅकेटचा मुख्य सूत्रधार दिलीप जानदेव हंबर्डे (वय ५५, रा. आष्टी) याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

तुकाराम मुंढेंच्या आदेशानंतर यंत्रणा सतर्क

अन्न व औषध प्रशासनाची सूत्रे हाती घेतल्यापासून आयुक्त तुकाराम मुंढे यांनी संपूर्ण राज्यात दूध, खाद्यपदार्थ आणि औषधांमधील भेसळीविरोधात धडक तपासणी मोहीम राबवली आहे. “सामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या एकाही भेसळखोराची गय केली जाणार नाही,” असा स्पष्ट इशारा मुंढे यांनी दिला होता. त्यांच्या याच कडक भूमिकेमुळे बीड जिल्ह्यातील अन्न सुरक्षा विभागही पूर्णपणे सक्रिय झाला आहे.

अशी झाली धडक कारवाई

आष्टी-जामगाव रस्त्यावरील नक्षत्र लॉन्ससमोर एका बोलेरो पिकअप वाहनातून दुधात भेसळ करण्यासाठी लागणाऱ्या घातक ‘व्हे पावडर’ची चोरटी वाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती पथकाला मिळाली. पोलिसांनी सापळा रचून पिकअप वाहन (क्रमांक एमएच-१३ सीयु-४१४१) अडवले. तपासणीत वाहनातून २५ किलो वजनाच्या ४७ गोण्या सापडल्या. वाहनचालक सुशांत ऊर्फ बाबू गोपाळघरे याच्याकडे कसून चौकशी केली असता, त्याने आष्टीतील एका पत्र्याच्या शेडमध्ये आधीच २५ गोण्या उतरवून ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी दोन्ही ठिकाणांहून एकूण ७२ गोण्या (१,८०० किलो व्हे पावडर) आणि वाहन असा सुमारे २ लाख ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

सूत्रधार हंबर्डेला अटक; धागेदोरे तपासण्याचे काम सुरू

बीडचे अन्न सुरक्षा अधिकारी अजय गाडे यांच्या फिर्यादीवरून आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. चालकाच्या चौकशीत हा संपूर्ण काळा धंदा दिलीप हंबर्डे याच्या सांगण्यावरून चालत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवून मुख्य संशयित आरोपी दिलीप हंबर्डे याला अटक केली.

आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न व औषध प्रशासन आता ही बनावट पावडर नेमकी कुठून आणली जात होती आणि हे भेसळयुक्त दूध परिसरातील कोणकोणत्या नामांकित डेअऱ्यांना पुरवले जात होते, याचा सखोल तपास करत आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील भेसळखोर दूध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button