क्राईम

“दोन कुटुंबांची वाताहत, एका आईचा सुन्न करणारा आक्रोश; केजमधील ‘हॉटेल गावकरी’ समोरील हत्येचा थरार!”

"डोक्याला टाके पडले, लातूरच्या रुग्णालयातून आरोपी फरार; केज पोलिसांना चकवा देणाऱ्या हल्लेखोरांचा 'क्रांतिसूर्य'वर पर्दाफाश!"

केज:-अनैतिक संबंधांचा संशय, वारंवार होणारा मानसिक त्रास आणि त्यातून झालेल्या राजकीय बॅनरच्या वादाची ठिणगी पडून केज तालुक्यातील ‘हॉटेल गावकरी’ समोर एका तरुणाची चाकू भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले हॉटेल मालक आणि शिवसेना (शिंदे गट) पदाधिकारी विलास घुले यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. हल्लेखोरांचे मूळ लक्ष्य असलेला उमेश माने हा या हल्ल्यातून थोडक्यात बचावला असला तरी, आपल्या मित्राला वाचवण्यासाठी मध्यस्थी करायला गेलेल्या विलास घुले या २५ वर्षांच्या नवयुवकाला मात्र आपला जीव गमवावा लागला आहे.

या रक्तरंजित मारहाणीत जखमी झालेले मुख्य संशयित आरोपी बाबासाहेब कदम, शुभम गायकवाड आणि भैय्यासाहेब गायकवाड हे लातूर येथे उपचार घेऊन तेथूनही फरार झाले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून पोलीस सध्या त्यांच्या मागावर आहेत.

काय आहे पूर्वइतिहास आणि वादाचे मूळ?

या थरारक घटनेची पाळेमुळे दोन-तीन वर्षांपूर्वीच्या एका कौटुंबिक आणि अनैतिक संबंधांच्या वादात रुतलेली आहेत.

 सोनिजवळा येथील रामेश्वर गायकवाड यांच्या मुलीचा विवाह कदमवाडी येथील रहिवासी बाबासाहेब कदम यांच्याशी दोन ते तीन वर्षांपूर्वी झाला होता. बाबासाहेब कदम यांची शेती ही केज जवळील ‘हॉटेल गावकरी’च्या अगदी पाठीमागेच आहे.

 टाकळी येथील रहिवासी उमेश माने आणि हॉटेल गावकरीचे मालक विलास घुले हे लहानपणापासूनचे जिवलग मित्र होते. यामुळे उमेश माने याची हॉटेलवर सतत उठबस असायची.

दोन वर्षे पत्नी राहिली माहेरी

हॉटेलच्या पाठीमागे शेतात काम करणाऱ्या बाबासाहेब कदम यांच्या पत्नीवर उमेश माने हा पाळत ठेवून असायचा. यातूनच त्यांच्यात अनैतिक संबंध असल्याचा संशय बळावला आणि संपूर्ण गावात याची चर्चा सुरू झाली. या गंभीर विषयावर विलास घुले यांच्या उपस्थितीत अनेकदा समेट घडवून आणण्यासाठी बैठका झाल्या. हा वाद इतका वाढला होता की, बाबासाहेबांची पत्नी दोन वर्षे माहेरी निघून गेली होती. या सर्व बैठकांची आणि वादाची नोंद केज पोलीस ठाण्यात देखील आहे.

पत्नी नांदायला आली, पण त्रास थांबला नाही

दोन वर्षांनंतर मध्यस्थीने बाबासाहेब कदम यांची पत्नी पुन्हा कदमवाडी येथे नांदायला आली. मात्र, तरीही उमेश माने याने तिचा पिच्छा सोडला नाही. तो पुन्हा त्यांच्या घराभोवती चकरा मारू लागला. या संपूर्ण प्रकारात विलास घुले हा कायम उमेश मानेच्या पाठीशी खंबीरपणे उभा असायचा आणि त्याला उघड पाठिंबा द्यायचा.

बॅनर वाद आणि वादाला हिंसक वळण

ही घटना घडण्यापूर्वी विलास घुले आणि उमेश माने यांनी शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला व त्यांना पक्षाचे पदाधिकारी पद मिळाले. या आनंदात त्यांनी टाकळी गावच्या प्रवेशद्वारावर एक मोठा फ्लेक्स (बॅनर) लावला होता.

 टार्गेट करण्याचा प्रयत्न: काही दिवसांपूर्वी हे बॅनर कोणीतरी फाडले. विलास घुले आणि उमेश माने यांनी याचा थेट आरोप बाबासाहेब कदम यांच्यावर केला. यानंतर त्यांनी बाबासाहेब व त्यांच्या पत्नीवर पुन्हा पाळत ठेवून त्यांना मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. वारंवार बैठका होऊनही हा त्रास थांबत नसल्याने वैतागलेल्या बाबासाहेब कदम यांनी ही सर्व हकीकत आपले सासरे रामेश्वर गायकवाड यांना सांगितली.

हॉटेलवर थरार: बिअरच्या बाटल्या आणि चाकूचा वार

सासऱ्याला घडलेला प्रकार सांगितल्यानंतर संतापलेल्या रामेश्वर गायकवाड यांनी आपल्या स्वतःच्या पांढऱ्या रंगाच्या स्कोर्पिओ गाडीत ४ ते ५ जणांना सोबत घेतले आणि ते ‘हॉटेल गावकरी’ येथे पोहोचले.

1. प्रतिहल्ला: त्यांनी हॉटेलमध्ये बसलेल्या उमेश मानेला गाठून बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण सुरू असताना हॉटेलमध्ये असलेल्या रिकाम्या बिअरच्या बाटल्यांनी बाबासाहेब कदम, शुभम गायकवाड आणि भैय्यासाहेब गायकवाड यांच्या डोक्यात प्रहार करण्यात आले. यात हे तिघेही रक्ताने माखले व त्यांच्या डोक्याला ५ ते ६ टाके पडले.

2. जीव वाचवण्यासाठी पळाला: प्रचंड मारहाणीमुळे आपला खून होईल या भीतीने उमेश माने याने हॉटेलमधून पळ काढला.

3. आणि विलास घुलेचा बळी गेला: गंभीर जखमी असूनही बाबासाहेब कदम आणि त्यांच्या साथीदारांनी उमेश मानेचा पिच्छा सोडला नाही. त्याला रस्त्यात अडवून पुन्हा जबर मारहाण केली. याचवेळी बाबासाहेब कदम याने उमेश मानेच्या पोटात चाकू खुपसण्याचा प्रयत्न केला. मात्र, मित्र उमेशला वाचवण्यासाठी विलास घुले हा मध्ये आडवा आला. तो वार चुकून विलास घुले यांच्या पोटात खोलवर लागला. अतिशय खोल जखम झाल्याने विलास घुले यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला.

उपचार घेऊन आरोपी लातूरमधून फरार

या रक्तरंजित थरारात बिअरच्या बाटल्या डोक्यात लागल्याने मुख्य आरोपी बाबासाहेब कदम, शुभम गायकवाड आणि भैय्यासाहेब गायकवाड हे तिघेही गंभीर जखमी झाले होते. रक्ताने माखलेल्या अवस्थेत त्यांनी केजमधून पळ काढून थेट लातूर गाठले आणि तिथल्या रुग्णालयात उपचार घेतले. डोक्याला ५ ते ६ टाके पडल्यानंतर, पोलिसांचा ससेमिरा पाठीमागे लागू नये म्हणून उपचार पूर्ण होताच तिघांनीही तिथून धूम ठोकली. पोलीस आता त्यांच्या मागावर असून आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

बेकायदेशीर गोष्टींची दुर्दैवी परिणती: सुज्ञ नागरिकांचे आवाहन

एका अनैतिक संबंधाच्या संशयातून आणि चुकीच्या प्रवृत्तीला खतपाणी घातल्यामुळे हा दुर्दैवी अंत झाल्याची चर्चा परिसरात आहे. आज या घटनेमुळे विलास घुले यांच्या रूपाने एका कुटुंबाने आपला अवघा २५ वर्षांचा तरुण मुलगा गमावला आहे. नाही त्या भानगडीत पडल्यामुळे एका निष्पाप नवयुवकाचा नाहक बळी गेला असून, त्या माउलीचा (आईचा) आक्रोश उपस्थितांना पाहवत नव्हता.

दुसरीकडे खुनाचा गुन्हा अंगावर आल्याने कदम आणि गायकवाड कुटुंबाचीही पूर्णपणे वाताहत झाली आहे. या निमित्ताने सुज्ञ नागरिकांमधून संतप्त भावना व्यक्त होत असून समाजमाध्यमांतून आवाहन केले जात आहे की:

“अशा घटना जाती-पातीच्या पलीकडे जाऊन थांबल्या पाहिजेत. आज एका आईच्या लेकराचा बळी गेला, उद्या अजून कोणाच्या आईच्या लेकराचा बळी जाऊ नये याचे भान सर्व समाजातील नेते मंडळी आणि गावातील जाणत्या लोकांना राहिले पाहिजे. ज्यांना राजकारण करायचे त्यांनी करावे, पण अशा रीतीने कोणाच्याही वयात आलेल्या निष्पाप लेकरांचे बळी जाऊ नयेत. तसेच कोणीही अशा बेकायदेशीर गोष्टींना किंवा अनैतिक कृत्यांना सहकार्य करू नये, कारण त्याची परिणती अशा भयानक घटनेत होते.”

या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button