राजकारण
सत्तेच्या तुकड्यावर डोलणारी निष्ठा! बुडत्या जहाजातून उड्या मारणारे ‘उंदीर’ कुणाचेच नसतात
संकट काळात पक्षाने उमेदवारी दिली, निवडून येताच खासदारांनी वैयक्तिक विकासासाठी पलटी मारली!
मुंबई:-उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर हजारो आक्षेप घेता येतील, पण संकट काळात पक्षाला लाथ मारून पळणारे नेते हे बुडत्या जहाजातून उड्या मारणाऱ्या उंदरांपेक्षा वेगळे नाहीत, हेच महाराष्ट्राच्या राजकारणाचे आजचे विदारक वास्तव आहे. ज्या नेत्यांना उद्धव ठाकरेंनी राजकीय पुनर्जीवन दिले, ज्यांना मरगळलेल्या अवस्थेतून बाहेर काढून खासदारकीच्या खुर्चीवर बसवले, तेच नेते आज सत्तेच्या आणि लाभाच्या मोहापायी ‘पदर फाडून’ पळाले आहेत.
उपकाराची परतफेड अपकाराने! ‘या’ नेत्यांची बदललेली निष्ठा
पक्षाने ज्यांना फक्त देण्याचे काम केले, त्यांनी ऐन मोक्याच्या क्षणी पक्षाला ‘खो’ दिला आहे. निवडणुकीच्या निकालानंतर फुटलेल्या या नेत्यांची पार्श्वभूमी पाहिली, तर मतदारांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे:
संजय दिना पाटील: शरद पवारांच्या एका शब्दावर ठाकरेंनी तिकीट दिले. राजकीय करिअर संपत आलेले असताना मुंबईतून खासदार झाले आणि पुनर्जीवन मिळताच त्यांनी पलटी मारली.
बंडू जाधव (बंडू बॉस): परभणीत त्यांच्याविरोधात प्रचंड नकारात्मक वातावरण असतानाही ‘निष्ठावान’ म्हणून ठाकरेंनी उमेदवारी दिली. मराठवाड्यातील जातीय समीकरणात ते निवडून आले, पण शेवटी त्यांनीही पाठ फिरवली.
ओमराजे निंबाळकर: वडिलांच्या हत्येनंतर ज्यांना ठाकरे कुटुंबाने संपूर्ण राजकीय ताकद दिली, आमदार-खासदार केले, ते ओमराजे ‘उद्धव ठाकरेशी कशी नजर मिळवू?’ असे म्हणायचे. पण आज परिस्थिती अशी आहे की, मीडियाला तोंड देण्याच्या भीतीने विमानतळाच्या लाऊंजमध्ये ३ तास लपून त्यांना आडमार्गाने पळ काढावा लागला.
भाऊसाहेब वाकचौरे: ऐन निवडणुकीत शिर्डीत आले, तिकीट मिळवले, साईबाबांची शपथ घेतली आणि निवडून आल्यावर ती शपथही हवेत विरली.
आष्टेकर आणि देशमुख: आष्टेकरांनी ‘बायकोच्या निधनानंतर ठाकरे सांत्वनाला आले नाहीत’ हे हास्यास्पद कारण पुढे करून पक्ष सोडला, पण त्यांचा मुलगा मात्र महाविकास आघाडीसोबतच आहे! तर देशमुख नावाचे खासदार बारा गावचे पाणी पिऊन पक्षात आले आणि खासदार होताच पळ काढला.
मतदारांशी प्रतारणा: भाजपमधील ‘आयाराम-गयारामांना’ पायघड्या
आज बहुतांश लोकप्रतिनिधींचा ओढा भाजप किंवा त्यांच्या मित्रपक्षांकडे असण्याचे एकमेव कारण म्हणजे ‘सत्ता आणि आर्थिक लाभ’. मतदारांनी या लोकांना व्यक्ती म्हणून नव्हे, तर पक्ष आणि विचारधारेला पाहून मतदान केले होते. आज या फुटीरांमुळे मतदारांची घोर फसवणूक झाली आहे.
निष्ठावंतांची कीव!
भाजप आज बाहेरून येणाऱ्या बंडखोरांना थेट मोठी पदे देऊन पायघड्या अंथरत आहे. पण या ‘होलेसेल तोडफोडीच्या’ भाऊगर्दीत, पक्षासाठी आयुष्य वाहून घेतलेल्या जुन्या आणि संघर्ष करणाऱ्या भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांची मात्र मोठी कीव येत आहे.



