‘माझ्या बायकोचा नाद सोड, आज तुझा मर्डरच करतो’; हॉटेल गावकरीवरून सुरू झालेला वाद राष्ट्रीय महामार्गावर रक्ताळला, केज पोलिसांचा कोर्टात चौकशी रिपोर्ट सादर
केज :-केज ते बीड रोडवरील रेणु बारसमोर पूर्ववैमनस्यातून एका २५ वर्षीय तरुणाची चाकूने पोटात वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी केज पोलिसांनी कोर्टात सादर केलेल्या अधिकृत पोलीस रिपोर्टनुसार (गु.र.नं. ३९२/२०२६) तात्काळ कारवाई करत दोन मुख्य आरोपींना अटक केली असून, इतर ७ आरोपी सध्या फरार आहेत.
विलास नवनाथ घुले (वय २५, रा. टाकळी, ता. केज) असे या घटनेत मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा भाऊ रमेश नवनाथ घुले (वय ३५) याने केज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
घटनाक्रम आणि हत्येचे कारण
पोलीस रिपोर्टमधील माहितीनुसार, मृत विलास घुले आणि त्याचा भागीदार आकाश चाळक हे टाकळी फाटा ते कदमवाडी फाटा दरम्यान ‘हॉटेल गावकरी’ चालवत होते. २० जून २०२६ रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास आकाश चाळक, उमेश माने आणि स्वयंपाकी गणेश शुक्ला हे हॉटेलवर बसलेले असताना, आरोपी पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीतून (क्र. MH44Z9542) तिथे आले.
“तू माझ्या बायकोचा नाद का सोडत नाही, आज तुझा मर्डरच करतो” असे म्हणत आरोपींनी उमेश माने यास जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण सुरू केली. जीव वाचवण्यासाठी उमेश माने केजच्या देशाने पळाला असता, त्याच्या मागे विलास घुले आणि त्याचा चुलत भाऊ नितीन घुले हे देखील धावले.
केज-बीड रोडवरील रेणु बार आणि बंद असलेल्या समर्थ बिअरबार समोर राष्ट्रीय महामार्गावर आरोपींनी त्यांना गाठले. “तू मध्ये का पडतोस?” असे म्हणत आरोपी रामेश्वर गायकवाड याने विलासच्या पोटात चाकू खुपसला. या गंभीर हल्ल्यात विलास घुले गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असताना २१ जून रोजी दुपारी ३.०० वाजताच्या सुमारास डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.२ आरोपी गजाआड, ७ जण फरार
या घटनेनंतर केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक स्वप्निल कचरू उणवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तात्काळ शोधमोहीम राबवून २२ जून २०२६ रोजी पहाटे दोन आरोपींना अटक केली:
१) बाबासाहेब गोरबा उर्फ गोरख कदम (वय ४० वर्षे, रा. कदमवाडी) – अटक वेळ: २२/०६/२०२६ रोजी पहाटे ०२.१५ वाजता.
२) संतोष नरहरी कदम (वय ४५ वर्षे, रा. कदमवाडी) – अटक वेळ: २२/०६/२०२६ रोजी पहाटे ०३.१२ वाजता.
पोलीस रिपोर्टनुसार, सदर गुन्ह्यात एकूण ९ आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०३(१) (खून), १०९, १८९(२), १९१(२), १९१(३), १९० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगेष गोरख कदम, रामेश्वर गायकवाड, शुभम गायकवाड, भैय्यासाहेब गायकवाड, अजय उर्फ बँकटी कदम, नवनाथ कदम आणि दिपक कदम हे ७ आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
७ दिवसांची पोलीस कोठडी; पोलिसांचा तपास रिपोर्ट सादर
पोलीस निरीक्षक स्वप्निल कचरू उणवणे यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी साहेब, कोर्ट केज यांच्या सेवेत सादर केलेल्या पोलीस कस्टडी रिमांड (PCR) रिपोर्टमध्ये ७ दिवसांची कोठडी मागण्यासाठी
खालील प्रमुख कारणे नमूद केली आहेत:
अटक केलेल्या आरोपींव्यतिरिक्त इतर ७ फरार आरोपींच्या ठावठिकाण्याबाबत माहिती मिळवून त्यांना अटक करणे बाकी आहे.
गुन्ह्यात मयतास मारण्यासाठी वापरलेले मुख्य हत्यार (चाकू) जप्त करणे आहे.
गुन्ह्यात वापरलेली पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी (क्र. MH44Z9542) जप्त करणे बाकी आहे.
आरोपींनी अत्यंत क्रूरपणे चाकू खुपसून हत्या केली असल्याने, या गंभीर घटनेचा आरोपींकडे घटनाक्रमानुसार बारकाईने अधिक तपास करणे आवश्यक आहे.
सदरचा गुन्हा आरोपींनी नक्की कोणत्या मुख्य कारणासाठी केला आणि यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेणे बाकी आहे.
या गंभीर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक स्वप्निल उणवणे स्वतः करत आहेत.
क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल
आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा
जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका
जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल