अस्वच्छता आणि भेसळीच्या संशयावरून कारखान्याचा परवाना निलंबित
६ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात; मिठाईचे नमुने प्रयोगशाळेत रवाना
गुन्हा दाखल होणार की अधिकारी ‘सही सलामत’ सोडून देणार? केज तालुक्यात चर्चांना उधाण!
केज :-राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने बीड जिल्ह्यातील केज शहरालगत सुरू असलेल्या एका मोठ्या मिठाई आणि पेढे तयार करणाऱ्या कारखान्यावर धडक कारवाई केली आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या (FSSAI) नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे उघडकीस आल्यानंतर, प्रशासनाने संबंधित कारखान्याचा परवाना तात्काळ निलंबित केला आहे. या कारवाईत तब्बल ६ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून, मिठाईचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. या धडक कारवाईमुळे केज तालुक्यासह संपूर्ण बीड जिल्ह्यात प्रचंड खळबळ माजली आहे.
उमरी फाट्यावरील ‘विशाल डेअरी’वर छापा
मिळालेल्या माहितीनुसार, केज-मांजरसुंबा रोडवर केज शहरापासून सुमारे ६ किलोमीटर अंतरावर, गंगा माऊली साखर कारखान्याच्या समोर उमरी फाटा येथे गट नंबर ७८/१ मध्ये ‘चौरे’ यांच्या मालकीचा ‘विशाल डेअरी’ नावाचा दुग्धजन्य पदार्थ आणि मिठाई बनवण्याचा मोठा कारखाना आहे. या कारखान्यात मोठ्या प्रमाणावर मिठाई आणि पेढे तयार केले जात होते.
आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशाने धडक कारवाई
महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या कडक आदेशानंतर, छत्रपती संभाजीनगर विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. यामध्ये सहाय्यक आयुक्त व्ही. व्ही. पाटील, सहआयुक्त एस. आर. करकळे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी ए. डी. नरवाडे, अभय गाढे, एस. एस. खंदारे आणि प्रशांत कुचेकर यांच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दि. १७ जून रोजी ‘विशाल डेअरी’वर अचानक धाड टाकली.
कारखान्यात आढळला घाणीचा साम्राज्य आणि भेसळीचा संशय
अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी कारखान्यात पोहोचले तेव्हा तेथील दृश्य पाहून त्यांचेही डोळे चक्रावले. कारखान्यात सर्वत्र प्रचंड घाण पसरली होती.
अस्वच्छता आणि कीटक: मिठाई तयार होत असलेल्या ठिकाणी माशा, कीटक यांचा मोठा प्रादुर्भाव आढळून आला. भिंतींवर जाळी, जळमटे आणि जमिनीची फरशी फुटून त्यात दुर्गंधीयुक्त घाण साचलेली होती.
नियमांना हरताळ: तयार करण्यात आलेल्या अन्नपदार्थ आणि मिठाईवर ‘भारतीय अन्न सुरक्षा मानक आणि प्राधिकरण’ (FSSAI) च्या नियमांनुसार कोणतेही अनिवार्य लेबलिंग आढळले नाही.
कच्चा माल आणि साठवणूक: हलवा आणि कलाकंद बनवण्यासाठी वापरण्यात येणारे द्रव स्वरूपातील ग्लुकोज अत्यंत अस्वच्छ स्थितीत साठवून ठेवले होते. तसेच, तेथे वापरल्या जाणाऱ्या खवा व इतर कच्च्या मालाची खरेदीची कोणतीही अधिकृत बिले चालकाकडे मिळून आली नाहीत.
या गंभीर बाबी लक्षात घेता, अन्नपदार्थ कमी दर्जाचे आणि भेसळयुक्त असण्याच्या संशयावरून प्रशासनाने ‘विशाल डेअरी’चा परवाना तात्काळ निलंबित केला आहे. तसेच घटनास्थळावरून ६ लाख ६८ हजार रुपयांचे अन्नपदार्थ जप्त करून त्याचे नमुने लॅब टेस्टसाठी पाठवले आहेत.
नागरिकांचा सवाल: गुन्हा दाखल होणार की अधिकारी ‘सही सलामत’ सोडून देणार?
तुकाराम मुंडे यांच्या आदेशाने झालेल्या या धडक कारवाईचे जनतेतून स्वागत होत असले, तरी केज तालुक्यात आता एकाच चर्चेला उधाण आले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या कारखाना चालकावर अन्न सुरक्षा कायद्यानुसार कडक गुन्हा दाखल होणार की दरवेळेप्रमाणे काही ‘अर्थपूर्ण’ तडजोडी करून अधिकारी त्याला सही सलामत सोडून देणार? याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर प्रशासन काय पावले उचलते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल
आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा
जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका
जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल