सामाजिक

सत्यशोधक महात्मा फुले जयंती निमित्त

थोर समाजसुधारक यांचा अग्रलेख

महात्मा फुले झोपताना उशाशी दांडपट्टा ठिवून झोपायचे ! कधीबी घातपात झाला तर तयारी असावी म्हणून. त्याकाळातली पिलावळ त्यांचं असंच ट्रोलिंग करायची. त्यांनाही धमक्या यायच्या. या भितीमुळं भलेभले मूग गिळून गप्प बसतात. त्याकाळात, आधाराला संविधान नसताना, हा माणूस विरोधकांच्या बेभान, मदमस्त झुंडीबरोबर निडरपणे झुंजत होता. एकटा !

…खरंच फुले म्हन्जे ‘वन मॅन आर्मी’ होती.
गुलामीत खितपत पडलेल्या बहुजनांच्या या एकांड्या हिरोनं अन्यायी व्यवस्थेविरोधात शड्डू ठोकला होता. पाठीशी कोण उभं रहाणार? आपलं शोषण होत आहे हेच बिचार्‍यांना समजत नव्हतं. हजारो वर्ष ‘गुलामगिरी हेच आपलं प्रारब्ध आणि तोच आपला धर्म’ हेच मनावर बिंबवलं होतं. अशावेळी फुलेंच्या पाठीशी उभं राहून जीवावर उदार कोण होणार होतं? त्यावेळी ‘आय सपोर्ट फुले’ करत कुनी हॅशटॅग चालवला असता, तर त्याला फुलेविरोधक हिंस्त्र जनावरांनी अक्षरश: फाडून खाल्लं असतं.

..पण महात्मा फुले एकटे वाघासारखे लढले. तुकोबारायाची आक्रमकता त्यांच्या अंगी रुजली होती. ‘दिवार’ मधला बच्चन कसा खतरनाक ॲटिट्यूडनं पिटरच्या खिशात चावी ठेवून म्हन्तो “इसे अपने जेब में रख ले पीटर..अब मै ये ताला तेरी जेब से चाबी निकाल ही खोलूँगा.”.. टाळ्याशिट्ट्यांचा पाऊस पडतो… पन, शिनेमात अस्लं सोपं असतं भावांनो.. ‘नाटक’ असतं ते. खर्‍या आयुष्यात महात्मा फुलेंनी शंभरपट ॲटिट्युडनं हजारो वर्ष जुल्मी ‘पीटर’च्या खिशात असलेली सामाजिक-धार्मिक-बौद्धिक शृंखलेची ‘चावी’ अक्षरश: हिसकावून घेतली ! हिरोच वो.. खराखुरा हिरो !! त्या हिरोला टाळ्याशिट्ट्यांची अपेक्षा नव्हती गड्याहो.. ती ‘चावी’ मिळवून आपल्या आई-बहीण-मुलींना शिक्षणाची दारं उघडून द्यायची होती… अन्यायी व्यवस्थेची ‘दिवार’ तोडून महिलांना, बहुजनांना आणि अस्पृश्यतेचे चटके सोसणार्‍या लोकांना सर्वांसोबत समानतेनं मुख्य प्रवाहात सामील करायचं होतं.

त्यावेळी ज्या लोकांनी जोतीसावित्रीवर चिखल, शेणामातीचा मारा केला असेल… त्यांच्या स्वत:च्या घराण्यातल्या लेकीबाळीबी आज फुलेंच्या संघर्षातनं मिळालेल्या स्वातंत्र्याचा-शिक्षणाचा उपभोग घेतायत !

माझ्या बहुजन भावाबहिणींनो, फुले दाम्पत्यानं प्रचंड संघर्ष करून आपल्याला मिळवून दिलेलं सामाजिक आणि बौद्धिक स्वातंत्र्य टिकवून ठेवणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे.. झुंडशाहीला घाबरता मन,मेंदू वापरून फुले वाचणं आणि पुढच्या पिढीपर्यन्त पोहोचवणं याशिवाय पर्याय नाही.

महात्मा फुले यांना विनम्र अभिवादन !

किरण माने

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button