सामाजिक

मुस्लिमोफोबिया- एक भयानक मानसिक आजार.

२०१४ पासुन हिंदूना मुस्लिमापासुन तोडण्याचा जानीवपुर्वक प्रयत्न

मनोगत

माझे एक काका रिटायर झाले. साधा सरळ माणूस कुणाच्या अध्यात मध्यात न पडणारा. मी त्यांना भेटायला जायचो. रिटायर झाल्यावर घरी बसून काय करणार म्हणून ते टीव्ही बघायचे. नंतर त्यांना टीव्हीवरील न्यूज बघायची सवय लागली. विशेष करून ते हिंदी न्यूज चैनल्स बघायचे. मात्र या दरम्यान त्यांच्यामध्ये भयंकर नकारात्मक बदल होत चालले आहे हे माझ्या लक्षात आलं. सगळ्यांविषयी चांगलं बोलणारे हे माझे काका मुस्लिमांविषयी मात्र अचानक अत्यंत नकारात्मक होत चालले आहे हे मी नोटीस केलं. मुस्लिमांची संख्या वाढत चालली आहे, मुस्लिम आतंकवादी असतात, त्यांच्यामुळे आपल्या धर्माला धोका आहे असं प्रत्येक भेटीत ते मला सांगायला लागले. विशेष म्हणजे इतर विषयांवर बोलणं त्यांनी जवळपास सोडूनच दिलं. एकदा मी त्यांना म्हणालो चला बाजारात जावून फळं घेऊन येऊ तर ते म्हणाले नको तिकडे मुस्लिम वस्ती आहे. एक भयंकर प्रकारची दहशत त्यांच्या मनात निर्माण झाली होती.
एक भयानक भीती आणि असुरक्षितता त्यांना पोखरत चालली होती. एक समुपदेशक म्हणून मी त्यांना न्यूज चैनल्स बघणे बंद करा असा सल्ला दिला. इतर छंद जोपासा, बाहेर पडा, लोकांशी बोला
असं प्रेमाने मी त्यांना सांगितलं.
त्यांनी न्यूज चैनल्स बघणे बंद केले आणि ते पुन्हा पूर्ववत होत गेले.
यावरून न्यूज चैनल्स मधून काय भयानक कंटेंट या साध्या माणसाच्या डोक्यात घुसवण्यात येत असेल हे मला समजले.
दुसरी घटना माझ्या गावातील. माझ्या छोट्याशा गावात एकही मुस्लिम घर नाही. आमच्या गावातील एक शेतकरी मात्र भर चौकात एकदा मुस्लिमांना शिव्या घालत होता. यांच्यामुळे आपल्या देशाचा विकास होत नाहीये, आपला धर्म धोक्यात सापडला आहे, एका राजकीय पक्षाने यांचे खूप लाड केले म्हणून हे दिवस आले आहेत असं बरंच काही. मात्र काकांच्या बोलण्यात आणि त्याच्या बोलण्यात साधर्म्य होते. त्याच्या घरी तर टीव्ही सुद्धा नव्हता मग त्याला ही माहिती कुठून मिळते हे विचारल्यावर तो म्हणाला मी व्हाट्सअप वर वाचतो, व्हिडिओ बघतो. मला सर्व समजतं.
यामध्ये गमतीचा भाग म्हणजे माझे काका असो किंवा तो शेतकरी दोघांचा मुस्लिम लोकांशी संबंध बिलकुल नसल्यासारखाच.
तरीही त्यांनी मुस्लिमांविषयी आपल्या मनात भयंकर द्वेष, भीती आणि असुरक्षितता निर्माण करून घेतली होती.
मी एक समुपदेशक आहे त्यामुळे त्या विषयावर संशोधन करून तो विषय व्यवस्थित समजून घेणे मला आवडते.
या दोघांच्या बोलण्यात एक कॉमन गोष्ट होती ती म्हणजे. एका राजकीय पक्षाने मुस्लिमांचे लाड केल्यामुळे आज मुस्लिमांची संख्या वाढत आहे त्यांच्यामुळे आपल्या धर्माला धोका निर्माण झाला आहे वगैरे वगैरे.
दुसरं यावर तोडगा म्हणजे एका विशिष्ट राजकीय पक्षाला समर्थन देऊन ही समस्या आपण संपवू शकतो. त्या पक्षाचा एक महान नेता आहे. त्याच्या पाठीमागे आपण उभे राहायला हवे. त्याला समर्थन दिले तर तो आपल्या धर्माला मुस्लिमांपासून वाचवू शकतो. शिवाय तो कशाप्रकारे मुस्लिमांना धडा शिकवत आहे याबाबतचे वेगवेगळे न्यूज, लेख आणि व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचतात हेही मला कळाले.
शेवटी मी या निष्कर्षापर्यंत पोहोचलो की एका राजकीय पक्षाने राजकारणात यश मिळवण्यासाठी माध्यमांना आपल्या हाताशी धरून सामान्य लोकांना मानसिक आजारी बनवण्याचा सपाटाच लावला आहे.
एक अनामिक भीती न्यूज चैनल, व्हाट्सअप आणि विविध माध्यमांमधून सतत त्यांच्या मनात निर्माण केली जात आहे. मुस्लिम धर्माविषयी त्यांच्या मनात द्वेष निर्माण करून त्यांना अक्षरशः हिंसक झोंबी बनवले जात आहे.
महात्मा गांधी यांनी नकारात्मकतेवर सर्वात सुंदर उपाय सुचवला आहे.
“वाईट बोलू नका, वाईट बघू नका, वाईट ऐकू नका”. याचे कारण तुम्ही तुमच्या मेंदूला ज्या प्रकारचे खाद्य देतात तो तसाच होत जातो.
माहिती कितीही खोटी असली तरी ती सतत मेंदूमध्ये घुसवली तर मेंदूला ती खरी वाटायला लागते असं सायकॉलॉजी सांगते.
सध्या असे किती साधे, निरागस लोक मुस्लिमोफोबियाला बळी पडत आहे.
एकदा असंच एका ओळखीच्या ज्येष्ठ मुस्लिम व्यक्तीशी मी संवाद साधला.
त्यांना गमतीने म्हणालो तुम्हाला माहित आहे का तुमच्यामुळे आम्ही धोक्यात आहोत म्हणून.
ते खळखळून हसले. म्हणाले बेटा आज भारतातील सर्वात मोठी समस्या बेरोजगारी आहे. माझा एक मुलगा ड्रायव्हर आहे दुसरा पंक्चरचे दुकान चालवतो. दोघांची लग्न झाली आहेत. याचे कारण आमच्यामध्ये मुलगा धंदा करून पोट भरतो ना एवढेच बघितले जाते. मुलगा नोकरी करत नसला तरी चालतो.
आज खाजगीकरण आणि कंत्राटीकरणामुळे आज रोजगार मिळत नाहीये. तुमच्या धर्मात नोकरी असल्याशिवाय मुलाला मुलगी मिळत नाही. आता विचार करा नोकऱ्यांचे खाजगीकरण आणि कंत्राटीकरण कोण करत आहे??
आणि जर नोकरी नसल्यामुळे तुमच्या मुलांना मुलगीच मिळत नसेल तर तुमचा धर्म पुढे कसा वाढेल??
याचा अर्थ तुमचा धर्म धोक्यात आला आहे.
मात्र कुणामुळे आला आहे याचा विचार तुम्ही स्वतः करा. बेटा उगाच आमची भीती बाळगून काय फायदा??
नंतर या गोष्टीवर मी बराच विचार केल्यावर मला समजले. ही “डिस्ट्रॅक्ट पॉलिसी” आहे.
काही विशिष्ट लोकांच्या नावावर आपल्या देशातील सरकारी मालमत्ता केली जात आहे त्यालाच आपण “खाजगीकरण” म्हणतो. आणि याकडे कुणाचे लक्ष जाऊ नये म्हणून आपल्या बहुसंख्यांक समाजाचे लक्ष एका विशिष्ट प्लॅन नुसार मुस्लिमांकडे वळवण्यात आले आहे.
आपल्या समाजामध्ये अशा मानसिक आजारी लोकांची संख्या वाढतच राहिली तर आपला धर्म खरंच भयंकर धोक्यात आला आहे असंच भविष्यात दुर्दैवाने म्हणावे लागेल.
यावर उपाय एकच तर्क आणि विवेक वापरून विचार करणे आणि नकारात्मक माहिती पासून लांब राहणे. हजारो वर्षांच्या आपल्या महान संस्कृतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य तिची “सर्वसमावेशकता” आहे हे विसरून कसे चालेल!!!

अजय पाटील
समुपदेशक, सचिव
जिंदगी फाउंडेशन, जळगाव.

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button