दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी बोरगाव (बु.) ग्रामपंचायतचा अनोखा उपक्रम.
साधारणतः तीन हजार लोकसंख्या असलेल्या बोरगाव (बु.) ता. केज येथील सरपंचांनी ग्रामस्थांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे. ग्रामपंचायत कार्यालयासमोरील मनोऱ्यावर ८ फूट उंचीचा आणि २० किलो वजनाचा आकाशकंदील लावला आहे. ४ बाय ४ फूट लांबी रुंदी आणि ८ फूट उंची असलेला हा आशकंदील आकर्षक सजावटीसह तयार करण्यात आला आहे.
दिवाळी निमित्त ग्रामपंचायत कार्यालयाकडून गावात पथदीवे लावण्यात येत आहेत. गावात पथदीवे लावत असताना सरपंच बाळासाहेब गव्हाणे यांना ही संकल्पना सुचली आणि त्यांनी तात्काळ लोखंडी फ्रेम मध्ये मजबूत असा हा भव्य आकाशकंदील तयार करून घेतला. त्यावर रंगेबीरंगी नक्षीचे पुठ्ठे चढवून आकर्षक लेसने तसेच आकर्षक माळांनी त्याला सजवले आहे. आणि ग्रामपंचायत कार्यालयासमोरील मनोऱ्यावर ३० फूट उंचीवर हा आकाशकंदील लावण्यात आला आहे.
सरपंचाकडून ग्रामस्थांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्याच्या या संकल्पनेची चर्चा आणि कौतुक पंचक्रोशीतील लोक करत आहे.