सरकारी कर्मचार्याना निवडणूक आयोगाचा दणका
प्रचार सभेत दिसल्यास किंवा प्रचार केल्यास होणार निलंबित

साहेबांचा प्रचार सरकारी बाबूंना महागात पडणार
सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना व्हाॅटसअॅप ग्रुपवरून एखाद्या उमेदवाराचा प्रचार करणे महागात पडणार आहे. निवडणूक काळात सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मोबाईलवर उमेदवार व राजकीय पक्ष यांच्याशी संबंधित व्हॉट्स अॅप चॅटिंग किंवा स्टेटस किंवा प्रचारावर निवडणूक आयोगाने वॉच ठेवण्याचे धोरण कडक केले आहे. आणि एखादा सरकारी कर्मचारी एखाद्या पक्षाचा प्रचार करताना दिसल्यास थेट निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे सरकारी बाबूंमध्ये सध्या घबराटीचे वातावरण आहे.
सरकारी कर्मचारी-अधिकारी यांना निवडणुकीच्या काळात कोणत्याही राजकीय पक्षांचा प्रचार करता येत नाही. त्यामुळे निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी नांदेड जिल्हा परिषदेच्या एका कर्मचाऱ्यांना थेट निलंबित करण्यात आल्याने सरकारी अधिकारी व कर्मचारी हादरले आहेत. अनेकांनी राजकीय नेते, आमदार, खासदारांच्या कार्यकर्त्यांचे ग्रुप सोडले. स्टेटस ठेवणे बंद केले. सरकारी नोकरीत असले, तरी बहुतांशी अधिकारी व कर्मचारी यांना राजकारणाची मोठी आवड असते.
अनेक अधिकारी व कर्मचारी हे काही विशिष्ट नेते, आमदार, खासदार यांच्या मर्जीतील ‘खास’म्हणून वावरत असतात. आणि नोकरीमध्ये राजकीय प्रोटेक्शनचा वापर करतात. काहीजण राजकारणाविषयीच्या चर्चेमध्ये सोशल मीडिया आणि आणि इतर माध्यमातून प्रचारामध्येही भाग घेतात. किंबहुना सोशल मीडियावरदेखील व्यक्त होतात. अनेक कर्मचारी, शिक्षक यांनी तर थेट प्रचार सभांमध्ये भाषणे ठोकून उमेदवारांचा प्रचार केल्याची उदाहरणे आहेत. काहीजण तर उमेदवार आणि राजकीय पक्षांच्या कार्यालयात बसून निवडणुकीचे प्रत्यक्ष कामदेखील करीत असल्याचे यापूर्वी अनेकदा समोर आले आहेत.



