Uncategorized

केज महावितरण कुंभकर्णी झोपेत! मान्सूनपूर्व कामे गुल, लाईनमन गायब; खासगी गुत्तेदारांमुळे केज तालुक्यावर मृत्यूचे सावट

महावितरणच्या 'बोगस' कारभाराचा केज पॅटर्न! वृक्षछाटणी न करताच बिले लाटली? पैशांची मागणी करणाऱ्या खासगी टोळीला अभय कोणाचे?

केज:- पावसाळा तोंडावर आलेला असतानाही केज तालुक्यात महावितरण कंपनीकडून अत्यंत आवश्यक असलेली मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीची कामे अद्याप झालेली नाहीत. तर दुसरीकडे अधिकृत लाईनमन कर्तव्यावर न जाता खासगी लोकांकडून अनधिकृतपणे कामे करून घेत असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या गंभीर निष्काळजीपणाविरोधात कृषी उत्पन्न बाजार समिती, केजचे उपसभापती डॉ. वासुदेव नेहरकर यांनी महावितरणच्या लातूर येथील मुख्य अभियंत्यांना लेखी पत्राद्वारे तीव्र इशारा दिला आहे. कामे तातडीने न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

धोकादायक परिस्थिती; जीवितहानीची शक्यता
मुख्य अभियंत्यांना पाठवलेल्या पत्रात डॉ. नेहरकर यांनी महावितरणच्या कारभाराचे वाभाडे काढले आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी विजेचे खांब वाकलेले असून विद्युत तारा सैल झाल्या आहेत. झाडांच्या फांद्या न छाटल्यामुळे त्या तारांवर पडून दुर्घटना घडण्याची भीती निर्माण झाली आहे. याशिवाय, अनेक ठिकाणी रोहित्रामधून (DP) तेल गळती होत आहे, तसेच ‘डीपी बॉक्स’ उघडे व इन्सुलेटर खराब अवस्थेत आहेत. या निष्काळजीपणामुळे पावसाळ्यात मोठी जीवितहानी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
निकृष्ट कामांची चौकशी करण्याची मागणी
महावितरणने केज तालुक्यात काही ठिकाणी केलेली कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप बाजार समितीने केला आहे. खांब खोल न रोवणे, सैल तारा न ताणणे आणि वृक्षतोड न करताच ती कागदोपत्री झाल्याचे दाखवणे, असे गैरप्रकार घडले असून या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
लाईनमन गायब; खासगी व्यक्तींकडून शेतकऱ्यांची लूट

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, केज तालुक्यातील अनेक गावांमध्ये नियुक्त केलेले शासकीय लाईनमन स्वतः जागेवर जात नाहीत. ते गावातील खासगी व्यक्तींकडून अनधिकृतपणे कामे करून घेतात. हे खासगी लोक स्वतः नशेच्या धुंदीत कामे करत असून काम करण्यासाठी गरिबांकडून व शेतकऱ्यांकडून पैशांची मागणी करत असल्याच्या तक्रारी आहेत.
विशेष म्हणजे, हे खासगी लोक महावितरणच्या उपअभियंता व ऑपरेटरकडून फोनवर थेट वीज बंद व चालू करण्याची परवानगी (Permit) मिळवतात. हा प्रकार अत्यंत घातक असून यामुळे काम करणाऱ्यांच्या व नागरिकांच्या जिवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. यासंदर्भात स्थानिक उपअभियंता व सहाय्यक अभियंत्यांकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही कारवाई झालेली नाही.

तीव्र आंदोलनाचा इशारा

“तालुक्यातील मान्सूनपूर्व विद्युत कामे तात्काळ पूर्ण करण्यात यावीत, झालेल्या बोगस कामांची चौकशी व्हावी आणि खासगी व्यक्तींकडून केली जाणारी अनधिकृत कामे थांबवून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी. अन्यथा महावितरण कार्यालयाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व भविष्यात कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याला सर्वस्वी महावितरण प्रशासन जबाबदार राहील,” असा इशारा डॉ. वासुदेव नेहरकर यांनी दिला आहे.

या पत्राच्या प्रती आमदार नमिताताई मुंदडा, अधीक्षक अभियंता (बीड), कार्यकारी अभियंता (अंबाजोगाई), तहसीलदार (केज) आणि उपअभियंता (केज) यांना माहिती व योग्य त्या कारवाईसाठी पाठवण्यात आल्या आहेत.

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button