Uncategorized
“तुमचा बाप बाहेर जिवंत आहे, काटाच काढणार!” बीडमध्ये फरार कृष्णा आंधळे गँगची गावकऱ्यांना थेट जीवे मारण्याची धमकी; मैंदवाडीत प्रचंड खळबळ!
केज:- मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य फरार आरोपी कृष्णा आंधळे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. मात्र, आता त्याच्या टोळीने बीडच्या धारूर तालुक्यातील मैंदवाडी गावात उघड गुंडगिरी आणि दहशत निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. “कृष्णा आंधळे जोपर्यंत बाहेर आहे तोपर्यंत आम्ही तुमचा काटा काढल्याशिवाय राहणार नाही, तुमचा बाप बाहेर जिवंत आहे,” अशा अत्यंत गंभीर शब्दांत मैंदवाडी गावातील नागरिकांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
या उघड धमकीमुळे मैंदवाडी गावात भीतीचे वातावरण पसरले असून, संतप्त आणि भयभीत गावकऱ्यांनी थेट बीड पोलीस अधीक्षक (SP) कार्यालयात धाव घेत न्यायाची गुहार लावली आहे.
गावात बाहेरील गुंडांचा वावर; पोलिसांत तक्रार
गावकऱ्यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनानुसार, गावातीलच नितीन राजेभाऊ मैंद, जयराम राजेभाऊ मैंद आणि राजेभाऊ धोंडिबा मैंद हे लोक बाहेरून कृष्णा आंधळे गँगच्या गुंडांना गावात आणत आहेत. या गुंडांच्या मदतीने मैंदवाडीतील सर्वसामान्य लोकांना विनाकारण मारहाण करणे, महिलांना धमकावणे, गावात दहशत माजवून शांतता भंग करणे असे प्रकार सातत्याने सुरू आहेत. या गँगकडून गावात मोठी जीवीतGroup हानी किंवा घातपात घडवला जाऊ शकतो, अशी भीती गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
‘CDR काढला तर आंधळेचा पत्ता लागेल’ – गावकऱ्यांचा दावा
निवेदन देण्यासाठी आलेल्या नागरिकांनी पोलिसांकडे एक महत्त्वाचा दावा केला आहे. गावातील काही ठराविक लोक हे अजूनही फरार आरोपी कृष्णा आंधळेच्या थेट संपर्कात आहेत. जर निवेदनात संशय व्यक्त केलेल्या व्यक्तींच्या मोबाईलचे कॉल रेकॉर्डिंग आणि सीडीआर (CDR) तपासले, तर पोलिसांना गुंगारा देणारा मोस्ट वॉन्टेड कृष्णा आंधळे कुठे लपला आहे, याचा माग काढणे पोलिसांना सहज शक्य होईल.
गावकऱ्यांची मागणी: > गावात सुरू असलेली गुंडगिरी तात्काळ थांबवून या गँगवर कडक कायदेशीर कारवाई करावी आणि मैंदवाडीतील नागरिकांना पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. आता बीड पोलीस या धमकी प्रकरणावर काय ॲक्शन घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



