नाशिक:-१९८० चा तो काळ… कांद्याचे दर पंचवीस पैशांपर्यंत कोसळलेले. शेतकरी रक्ताचं पाणी करून पिकवलेला कांदा मातीमोल भावाने विकला जाताना बघत होता. पण तेव्हाचा शेतकरी आजच्यासारखा ‘लाचार’ नव्हता. नाशिक-मनमाड रेल्वे लाईन दोन दिवस ठप्प होती. रुळांवर खिल्लारी बैल आणि गाड्या उभ्या करून व्यवस्थेला आव्हान दिलं होतं. याच आंदोलनाच्या धगधगत्या कुंडातून एक नाव अजरामर झालं— स्व. माधवराव खंडेराव मोरे (नाना).
आज ४६ वर्षांनंतरही कांद्याचा दर जेव्हा पुन्हा त्याच ‘आठ आण्यावर’ येऊन ठेपतो, तेव्हा मोरे नानांनी सत्ताधारी खासदाराच्या कानशिलात लगावलेला तो ऐतिहासिक किस्सा पुन्हा एकदा व्यवस्थेच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालतोय.
१० मिनिटांत दिल्ली हादरली होती!
त्याकाळी निरोप पाठवण्यासाठी फक्त ‘तार’ किंवा ‘ट्रंक कॉल’ हेच पर्याय होते. जिल्हाधिकारी सांगत होते की, “आम्ही केंद्राला निरोप पाठवलाय, पण उत्तर येत नाहीये.” याच संतापातून मोरे नानांनी व्यासपीठावर जाऊन तत्कालीन खासदाराच्या (झंगडू महानगडू कान्हडोळ) कानशिलात लगावली. म्हणतात की, जो निरोप तासांनतास पोहोचत नव्हता, तो या एका कानशिलाच्या आवाजामुळे फक्त १० मिनिटांत थेट पंतप्रधानांपर्यंत पोहोचला आणि संपूर्ण केंद्र सरकार हादरलं होतं. तो सत्तेचा माज उतरवणारा स्वाभिमानी प्रहार होता.
बळीराजा की ‘भिकारी’? नानांचे जळजळीत प्रश्न
आजची परिस्थिती पाहिली तर नानांनी नक्कीच संतापाने विचारलं असतं— “तुमची हीच औकात आहे का?”
• सन्मान की भीक?: वर्षाला सहा हजार रुपये खात्यात जमा झाल्यावर स्वतःला ‘बळीराजा’ म्हणवून घेणाऱ्यांना नानांनी विचारलं असतं, “सरकारच्या तुकड्यांवर जगणारे तुम्ही अन्नदाता कसे?”
• लाचारीचा कळस: ज्या व्यवस्थेने शेतकऱ्याला भिकारी आणि लाचार करून सोडलंय, त्याच व्यवस्थेसमोर झुकताना तुम्हाला लाज कशी वाटत नाही?
• मतदानाची किंमत: चार तुकडे अंगावर फेकल्यावर कोणालाही मतदान करणाऱ्या आणि आपल्या प्रतिनिधीला जाब विचारण्याची धमक नसलेल्या मतदारांवर नानांनी कडाडून टीका केली असती.
प्रगतीची दरी आणि शेतकरी
गेल्या ५० वर्षांत काय बदललं?
• नोकरदार: ५ हजार पगार घेणारा आज लाखांच्या घरात पोहोचला.
• शेतकरी: ४६ वर्षांपूर्वीही कांदा २५-५० पैसे होता आणि आजही तोच भाव मिळतोय.
जमिनी भूमिसंपादनात जात आहेत, पैसे मिळत आहेत, पण त्या पैशांसाठी घरातच एकमेकांचे गळे दाबले जात आहेत. पैसा संपला की शहरात मिळेल ती नोकरी करायची हीच काय तुमची प्रगती? असा बोचरा प्रश्न आज उभा राहिला आहे.
क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल
आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा
जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका
जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल