Uncategorized

केज तालुक्यातील पवनचक्क्यांच्या नावाखाली १ कोटी ७५ लाखांचा मलिदा; जिल्हाधिकारी पाठक पाठोपाठ ‘त्या’ तहसीलदारावर कारवाई कधी?

बीड: बीड जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या अटकेनंतर भ्रष्टाचाराचे जे ‘पवनचक्की मॉडेल’ समोर येत आहे, ते पाहून सामान्य जनतेचे डोळे विस्फारले आहेत. केवळ जिल्हाधिकारीच नव्हे, तर केजच्या तहसीलदाराने या भ्रष्ट साखळीत आपली झोळी भरून घेतल्याचा धक्कादायक आरोप आता समोर आला आहे. २५ पवनचक्क्यांच्या बदल्यात तब्बल १ कोटी ७५ लाख रुपयांची लाच लाटल्याची माहिती उघड होत असून, यात केजच्या तहसीलदाराचा वाटा ५० लाख रुपये असल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
शेतकऱ्यांच्या अश्रूंची ‘किंमत’ ७ लाख प्रति पवनचक्की!
केज तालुक्यातील विडा, येवता, दहिफळ, मस्साजोग आणि शिंदी परिसरात ‘अवादा’ कंपनीने पवनचक्क्या उभारताना शेतकऱ्यांच्या शेतीचा अक्षरशः ‘तिनतेरा’ वाजवला. शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात तक्रारींचे ढिगारे लावले, आंदोलने केली. मात्र, शेतकऱ्यांना न्याय देण्याऐवजी तत्कालीन जिल्हाधिकारी पाठक आणि केजच्या तहसीलदाराने कंपनीच्या मॅनेजरला बोलावून ‘टेबलवर’ व्यवहार पूर्ण केला.
प्रत्येक पवनचक्कीमागे ७ लाख रुपये या दराने एकूण २५ पवनचक्क्यांचे १ कोटी ७५ लाख रुपये लाच म्हणून निश्चित झाले. यातील सिंहाचा वाटा जिल्हाधिकाऱ्यांकडे गेला असला, तरी या संपूर्ण प्रकरणाची सेटिंग लावणाऱ्या केजच्या तहसीलदाराने स्वतःसाठी ५० लाख रुपये पदरात पाडून घेतले.
तहसीलदार ‘धुतलेल्या तांदळासारखे’ आहेत का?
जिल्हाधिकारी हा जिल्ह्याचा प्रमुख असतो हे मान्य असले, तरी खालच्या पातळीवर रसद पुरवण्याचे आणि तक्रारी दाबण्याचे काम तहसीलदाराने चोख बजावले. मग केवळ पाठकच दोषी कसे? ५० लाखांची लाच घेणारे हे तहसीलदार अद्यापही कारवाईपासून दूर कसे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. हे तहसीलदार स्वतःला निर्दोष भासवण्याचा प्रयत्न करत असले तरी, अवादा कंपनीच्या फाइलवर त्यांनी घेतलेल्या ‘तडजोडी’च्या निर्णयांनी त्यांचे हात काळे असल्याचे स्पष्ट होत आहे.
भ्रष्टाचारातूनच संतोष देशमुख हत्याकांडाचा ‘प्लॉट’ तयार झाला?
या कोटींच्या उलाढालीची माहिती तहसील कार्यालयातील गोपनीय सूत्रांकडून वाल्मिक कराडच्या गटापर्यंत पोहोचली. तहसीलदाराने ५० लाख आणि जिल्हाधिकाऱ्यांनी सव्वा कोटी खाल्ल्याची बातमी वाल्मिक कराडचा मावस भाऊ विष्णू चाटे याला समजली आणि तिथूनच २ कोटींच्या खंडणीचा खेळ सुरू झाला. या पैशांच्या हव्यासापायी आणि प्रशासकीय आशीर्वादाने माजलेल्या गुंडगिरीमुळेच पुढे सरपंच संतोष देशमुख यांचा बळी गेला.
आता जनतेचा सवाल: तहसीलदाराच्या मुसक्या कधी आवळणार?
जिल्हाधिकारी पाठक अटकेत असताना, ज्यांनी या भ्रष्टाचाराची पायाभरणी केली आणि स्वतः ५० लाखांची माया जमवली, त्या केजच्या तहसीलदाराला मोकळे रान का दिले जात आहे? बीड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात अशाच प्रकारे तहसीलदारांच्या मदतीने भ्रष्टाचार फोफावला असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

या १ कोटी ७५ लाखांच्या लाच प्रकरणाची सखोल चौकशी करून, ५० लाख लाटणाऱ्या तहसीलदाराला तातडीने निलंबित करून अटक करण्याची मागणी आता जोर धरत आहे.

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button