शैक्षणिक
केज जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पुनर्जीवन करण्यासाठी शेकडो माजी विद्यार्थी एकवटले
प्रजासत्ताक दिनानिमित्त केज शहरात अभुतपुर्व माजी विद्यार्थ्याची रॅली

केज:-. जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, केजच्या पुनर्जीवनासाठी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित केलेला कार्यक्रम अत्यंत उत्साहात काल २६ जानेवारी २६ रोजी अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी वातावरणात यशस्वीपणे पार पडला. या कार्यक्रमाला ६०० पेक्षा अधिक माजी विद्यार्थी, गुरुजन वर्ग, विविध क्षेत्रांतील नागरिक आणि सर्व समुदायांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. १९६८ पासूनच्या सर्व बॅचचे विद्यार्थी एकाच व्यासपीठावर एकत्र आल्याने, अनेक वर्षांनंतरच्या भेटीचा आनंद द्विगुणित झाला. चेहऱ्यांवरचा आनंद, डोळ्यांत दाटलेला भाव आणि मनात दाटून आलेल्या आठवणी — हा सोहळा केवळ कार्यक्रम न राहता एक भावनिक पर्व ठरला.
या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी झेंडावंदनाने झाली. त्यानंतर सर्व समुदायांच्या सहभागाने प्रभात फेरी काढण्यात आली. संपूर्ण शहरातून ही प्रभात फेरी जात असताना शाळा पुन्हा सुरू करण्याचा संदेश सर्वदूर पोहोचला. प्रभात फेरीदरम्यान शाळेत प्रवेश घेण्याचे आवाहन करण्यात आले, आणि विशेष बाब म्हणजे ८–१० विद्यार्थ्यांचे प्रवेश कार्यक्रमस्थळीच निश्चित झाले. ही शाळा पुनर्जीवनाची एक अत्यंत सकारात्मक आणि आशादायी सुरुवात ठरली.
प्रभात फेरीनंतर तहसीलदार महोदयांना शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत अधिकृत निवेदन देण्यात आले. त्यानंतर सर्वजण पुन्हा शाळेच्या मैदानावर एकत्र जमले. या कार्यक्रमाची चर्चा संपूर्ण शहरात सुरू झाली आणि शहरवासीयांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळू लागला.
कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या गुरुजन वर्गाचा यथोचित सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून जुन्या आठवणी, शाळेचे संस्कार आणि आजच्या आयुष्यात त्याचे महत्त्व भावनिक शब्दांत व्यक्त केले.
शाळेचे पूर्वीचे वैभव पुन्हा मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे वचन दिले.
कार्यक्रमा दरम्यान अल्पोपहारासह जेवणाचा सर्वांनी आस्वाद घेतला. भोजनासोबतच संवाद, आठवणी आणि पुढील वाटचालीसाठी चर्चा रंगली. उपस्थित नागरिकांनीही सर्व प्रकारच्या मदतीचे आश्वासन दिले.
वेगवेगळ्या माध्यमांतून शाळेसाठी आर्थिक, शैक्षणिक आणि भौतिक स्वरूपातील मदत देण्यासाठी अनेक हात पुढे आले. शाळेच्या पुनर्वसनासाठी नागरिक, माजी विद्यार्थी आणि संस्था एकत्र येत असल्याचे चित्र आशादायी आहे.
हा भव्य आणि शिस्तबद्ध कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी नियोजन समितीने केलेले नियोजन अत्यंत कौतुकास्पद ठरले. वेळेचे काटेकोर पालन, प्रत्येक टप्प्यावर स्पष्ट दिशा आणि सर्वांचा समन्वय — यामुळे हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने एक मोठा समारंभ ठरला.
हा दिवस अनुभवताना अनेकांना असे वाटले की, “निश्चितच आज सर्वांचे आयुष्य १०–१५ वर्षांनी वाढले असेल.” पुन्हा पुन्हा भेटत राहून, सातत्य टिकवून, आवश्यक ती प्रशासकीय व सामाजिक कार्यवाही करत जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, केज पुन्हा सुरू करण्याचे ठाम वचन सर्वांनी दिले.
हा कार्यक्रम केवळ आठवणींचा सोहळा नव्हता — तो होता पुनर्जन्माचा संकल्प आहे असं म्हणावं लागेल..
हा कार्यक्रम सर्व विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे आयोजित आणि नियोजित करून पार पाडला.
जय जिल्हा परिषद माध्यमिक शाळा



