Uncategorized

डॉ. बाबासाहेब ठोंबरे “कृषी माऊली पुरस्काराने” सन्मानित

 

प्राधान्याने कृषि संस्कृतीशी निगडित असलेल्या पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र या महत्त्वाच्या क्षेत्रात केलेले उल्लेखनीय कार्य तसेच पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने मोठे आणि व्यापक प्रमाणात केलेली वृक्ष लागवड तसेच वृक्ष संवर्धनाची सातत्यपूर्ण व अखंडितपणे केलेली यशस्वी कामगिरी या कृषि व पर्यावरणातील बहुमोल कार्याची दखल घेऊन, कृषि महाविद्यालय लातूर चे अधिष्ठाता व विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय लातूर चे अधिष्ठाता डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांना ‘श्री स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र दिंडोरी’ च्या वतीने “कृषि माऊली” या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
दि. ७ ते १० मार्च दरम्यान आयोजित केलेल्या मराठवाडा विभागीय कृषी महोत्सवात दि. १०/०३/२०२५ रोजी श्री आबासाहेब मोरे यांच्या हस्ते व वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माजी शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके व डॉ. विलास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. ठोंबरे यांना सदरील पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांचे पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र या महत्त्वाच्या कृषि क्षेत्राबरोबरच सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक तसेच पर्यावरण संवर्धन यासारख्या विविध क्षेत्रात त्यांचे उल्लेखनीय कार्य आहे.
वाळवंटातून सुद्धा स्वस्तिपद्मे रेखिती
देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती !
कवी बा. भ. बोरकरांच्या या काव्यपंक्ती सार्थ ठरवणारे व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. बाबासाहेब माणिकराव ठोंबरे !
डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांची एक शिस्तप्रिय, कार्यकुशल अधिकारी म्हणून ओळख आहे. सर्व वयोगटातील सहकार्यांना सोबत घेऊन जाण्याचे त्यांचे दृष्टे नेतृत्व व कौशल्य वाखाणण्याजोगे आहे. शिस्तप्रिय, कठोर, एक उत्तम प्रशासक, समन्वयक, व्यवस्थापक म्हणून त्यांची ख्याती आहे.
उंदरीसारख्या (ता. केज )आडवळणाच्या एका गावखेड्यात, एका सामान्य परंतु पुरोगामी विचारांच्या शेतकऱ्याच्या घरी जन्मलेला एक युवक, आपल्या मनात दुर्दम्य इच्छाशक्ती आणि उरात एक ध्येय बाळगून, सोबत आई-वडिलांच्या संस्काराची शिदोरी घेऊन शिक्षणासाठी बाहेर पडले. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातून कृषि पदवी घेऊन मुहूर्तमेढ रोवली व पुढे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय या विषयात आचार्य पदवी घेऊन त्यावर गुढी उभारली !
कृषि विद्यापीठात ३० वर्षाच्या सेवेत त्यांनी पदांचे एकेक शिखर पादाक्रांत करत आज लातूर येथील कृषि महाविद्यालयाचे अधिष्ठाता या पदाची धुरा समर्थपणे पेलत आहेत. तत्पूर्वी ते कृषि महाविद्यालय आंबेजोगाई येथे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य याच पदावर कार्यरत असताना त्यांनी अत्यंत उल्लेखनीय कार्य केले आहे. कृषि विद्यापीठाच्या शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्याबरोबरच त्यांनी महाविद्यालयात राबवलेल्या विविध उपक्रमांतर्गत वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन, अटल घनवन वृक्ष लागवड, योगापार्क, ऑक्सिजन हब इत्यादी संकल्पना त्यांनी राबवल्या. परिसरात व गावशिवारात अत्यंत अल्पावधीत एकूण २ लक्ष विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करुन त्यांचे संवर्धन केले आहे. त्याचबरोबर कृषि महाविद्यालयासमोर अत्यंत देखणे आणि रमणीय (गार्डन) बगीचा निर्माण करून महाविद्यालयाची शोभा वृद्धिंगत केली आहे. संस्थेशी विविध क्षेत्रातील मान्यवर, तज्ञ, विचारवंत, व्याख्याते, कवी, समाजसेवक यांचे वेळोवेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन घडवून संस्थेची त्यांचे जिव्हाळ्याचे नाते जोडले व आंबेजोगाई येथील कृषि महाविद्यालय तसेच लातूर येथील कृषि महाविद्यालय खऱ्या अर्थाने लोकाभिमुख केले.
कृषि व कृषिपूरक क्षेत्रातही त्यांचे उल्लेखनीय कार्य आहे. त्यांनी देशी गोवंश,म्हैसवर्ग व शेळी -मेंढी पालनात विशेष संशोधन करून ते शेतकऱ्यांना आर्थिक उन्नतीच्या दृष्टीने सहाय्यभूत ठरले आहे.
राष्ट्रीय स्तरावर शेतकरी, पशुपालक विद्यार्थी यांना मार्गदर्शन करण्यासाठी शेतकरी मेळावे व चर्चासत्रे यात सक्रिय सहभाग नोंदवला आहे. तसेच दूरदर्शन, आकाशवाणी, नियतकालिके, दैनिके याद्वारे जनजागृती करून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी सातत्याने भरीव योगदान दिले आहे. त्यांच्या या समाजोपयोगी, भरीव कार्याची दखल घेऊन आत्तापर्यंत डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांना अनेक विभागीय व राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यात, महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी राष्ट्रीय सेवा योजना राज्यस्तरीय पुरस्कार, भारतीय कृषि संशोधन परिषदेचा सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार, राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट समीक्षक पुरस्कार, पशु संवर्धनासाठीचा जीवनगौरव पुरस्कार,पर्यावरणाचा सुंदरलाल बहुगुणा पुरस्कार, उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार, संजीवनी कृषि पुरस्कार, सर्वोत्कृष्ट शिक्षण तज्ञ पुरस्कार, वृक्ष संवर्धनाचा प्रभावती नागरी गौरव पुरस्कार अशा विविध पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले आहे.
डॉ. ठोंबरे यांना सुमारे ३० वर्षाचा शिक्षण, संशोधन व विस्तार कार्याचा प्रदिर्घ अनुभव आहे.
डॉ. ठोंबरे यांचे आचार्य पदवीच्या ११ विद्यार्थ्यांना व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या ४९ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले आहे. तसेच त्यांची आंतरराष्ट्रीय नियतकालिकात १०५ संशोधनपर लेख व विविध ११ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांना “कृषि माऊली पुरस्काराने” सन्मानित केल्याबद्दल त्यांचे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी, कुलसचिव संतोष वेणीकर, शिक्षण संचालक डॉ.भगवान आसेवार, माजी कुलगुरू डॉ. अशोक ढवण, डॉ. मधुकर गायकवाड, पं. उद्धवबापू आपेगावकर, रमेश आडसकर, नंदकिशोर मुंदडा, राहुल सोनवणे, डॉ. अनिलकुमार भिकाने, डॉ. सोमनाथ रोडे, डॉ. दिगंबर चव्हाण, कुणाल घुंगार्डे, रणजीत डांगे, राजेश रेवले, राजेंद्र रापतवार ,मुकुंद राजपंखे आदींनी अभिनंदन केले.

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button