क्राईम

मित्राच्या विश्वासाचा घात! केजमध्ये प्लॉटमध्ये गुंतवणुकीचा सल्ला देऊन मित्रानेच लाटली जमीन; तोतया व्यक्ती उभा करून बोगस खरेदीखत केल्याप्रकरणी तिघांवर न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल

  • केज:-प्लॉटमध्ये पैशांची गुंतवणूक करण्याचा सल्ला देऊन जवळच्या मित्रानेच मित्राच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार केज येथे उघडकीस आला आहे. स्वतःच्या मित्राच्या गैरहजेरीत दुय्यम निबंधक कार्यालयात कॅमेऱ्यासमोर टोपी घातलेला तोतया व्यक्ती उभा करून, बनावट सह्या आणि बोगस नकाशाच्या आधारे परस्पर जमीन स्वतःच्या नावावर लाटण्यात आली. या प्रकरणी स्थानिक पोलीस व प्रशासनाने सुरुवातीला दुर्लक्ष केले होते; मात्र अखेर केज न्यायालयाच्या दणक्यानंतर तीन जणांवर भारतीय न्याय संहिता (BNS) आणि नोंदणी अधिनियमाच्या विविध गंभीर कलमांखाली फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

  • ‘मित्रानेच घातला लाखो रुपयेला गंडा’

  • फिर्यादी प्रवीण दादा निकम (वय ३७, रा. सोरडेवस्ती खंडाज, ता. बारामती, जि. पुणे) आणि आरोपी रोहन रवींद्र कोमटवार यांच्यात अत्यंत घनिष्ठ मैत्री होती. याच ओळखीचा व विश्वासाचा गैरफायदा घेत, रोहन रवींद्र कोमटवार यांनी प्रवीण निकम यांना केज शहरात प्लॉटमध्ये पैसे गुंतवण्यास सांगितले. मित्राच्या शब्दावर पूर्ण विश्वास ठेवून प्रवीण निकम यांनी कसबे केज येथील सर्व्हे नंबर २२८/२/४ मधील ००.०३.६० आर ही खुली मिळकत १७ जानेवारी २०२३ रोजी रीतसर खरेदीखताद्वारे (दस्त क्र. १६६/२०२३) खरेदी केली. महसूल दप्तरी फेरफार क्र. ५४४३ अन्वये नोंद होऊन निकम हे या मिळकतीचे कायदेशीर मालक व वहिवाटदार झाले होते.
    ऑफिस सुटल्यावर रात्रीचा खेळ: कॅमेऱ्यासमोर तोतया इसम!
    मात्र, ज्या मित्रावर विश्वास ठेवून गुंतवणूक केली, त्याच विश्वासाचा घात करण्यात आला. तक्रारीनुसार, १४ मे २०२५ रोजी मूळ मालक प्रवीण निकम केजमध्ये हजर नसतानाही, केज तहसील कार्यालय परिसरातील दुय्यम निबंधक कार्यालयीन कामकाजाची वेळ संपल्यानंतर सायंकाळी ७:५६ वाजता हे संपूर्ण बोगस कारस्थान रचले गेले.
    निकम यांच्या जागी एका अनोळखी इसमाच्या डोक्यावर टोपी घालून त्याला कॅमेऱ्यासमोर ‘प्रवीण निकम’ भासवून उभे करण्यात आले. त्यांचे जुने फोटो व आधार माहितीचा वापर करत, बोगस सह्या करून दस्त क्र. १६८१/२०२५ नोंदवून घेतला गेला. इतर सर्व खरेदीखतांना आधार व्हेरिफिकेशन सक्तीचे असताना या दस्ताचे व्हेरिफिकेशन जाणीवपूर्वक टाळण्यात आले. इतकेच नव्हे तर उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाचा बनावट मोजणी नकाशा जोडून जमीन थेट रोहन कोमटवार याच्या नावे करून घेण्यात आली. या बोगस दस्तऐवजाच्या आधारे आरोपीने महसूल दप्तरी फेरफार क्र. ७८८० ची नोंदही स्वतःच्या नावे पदरात पाडून घेतली.
    गुन्हा दाखल झालेले संशयित आरोपी:
    या प्रकरणी संगनमत करून फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार केज पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे:
    1. रोहन रवींद्र कोमटवार (रा. कोमटवार गल्ली, केज, जि. बीड) – जमीन स्वतःच्या नावे करून घेणारा मुख्य संशयित आरोपी
    2. प्रितम प्रकाश नांदेडेकर (वय ३२, रा. अयोध्या नगर, धारूर, जि. बीड) – खरेदीखतातील बनावट साक्षीदार
    3. शांतीनाथ प्रकाश काळे (वय ३१, रा. संभाजी चौक, धारूर, जि. बीड) – खरेदीखतातील बनावट साक्षीदार
    या दोघा साक्षीदारांनी मूळ मालक प्रवीण निकम गैरहजर असतानाही कॅमेऱ्यासमोरील तोतया इसम हाच प्रवीण निकम असल्याची खोटी साक्ष दुय्यम निबंधकांसमोर दिली होती.
    पोलीस व प्रशासनाचे दुर्लक्ष; अखेर कोर्टाचा दणका
    हा गंभीर गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर फिर्यादी प्रवीण निकम यांनी २४ ऑक्टोबर २०२५ रोजी केज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली; मात्र पोलिसांनी त्याची साधी दखलही घेतली नाही. त्यानंतर निकम यांनी पोलीस अधीक्षक (बीड), उपविभागीय पोलीस अधिकारी (केज), महसूल मंत्री, नोंदणी महानिरीक्षक (पुणे), मुद्रांक जिल्हाधिकारी तसेच भूमी अभिलेख कार्यालयाकडे वारंवार नोंदणीकृत टपालाने लेखी अर्ज पाठवले.
    प्रशासनाकडून कुठलीही कारवाई न झाल्याने शेवटी त्यांनी केजच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात फौजदारी अर्ज (क्र. २४१/२०२५) दाखल केला. न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत तात्काळ गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले. त्यानुसार केज पोलीस ठाण्यात ०३ सप्टेंबर २०२६ रोजी प्रथम खबर क्र. ०५६० अन्वये तिघांवर भा.न्या.सं. कलम २३५, २३६, २३७, ३१८(२), ३१८(४), ३३६(२), ३३६(३), ३३६(४), ३४०(२), ३(५), ३१९, ३२२ तसेच नोंदणी अधिनियम कलम ८२ अन्वये गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button