क्राईम
सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील मुख्य आरोपी व खंडणीखोर वाल्मिक कराड व त्यांचे साथीदारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करा –
राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सचिव सचिन फोलाने

अंबाजोगाई! मस्साजोगचे मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड व त्याचे साथीदारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सचिव सचिन फोलाने यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून केले आहे. याप्रकरणी तातडीने दखल घेऊन योग्य त्या उपाययोजना करा अशी अपेक्षा निवेदनात व्यक्त केली आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सचिव सचिन फोलाने यांनी मुख्यमंत्र्यांना बुधवार, दिनांक १८ डिसेंबर रोजी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, मस्साजोग (ता.केज,जि.बीड) येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निघृण खून प्रकरणाला आज आठ दिवस झाले आहेत. या घटनेने केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात खळबळ उडवली आहे. प्रकरणाच्या गांभिर्यामुळे राज्यातील विधिमंडळ तसेच देशाच्या संसदेतही या विषयावर चर्चा झाली आहे. परंतु, एवढे दिवस उलटूनही मुख्य आरोपी वाल्मिक कराड व सुदर्शन घुले हे अजूनही फरार आहेत, हे अत्यंत दुर्दैवी आहे. या प्रकरणात काही गंभीर शंकांना वाव आहे. १) या फरार आरोपींना पकडण्यात पोलीस यंत्रणा का अयशस्वी ठरत आहे..?, २) आरोपींना कोणत्याही प्रभावशाली व्यक्तीकडून आश्रय किंवा संरक्षण मिळत आहे का..?, ३) जर आरोपींनी जामिनासाठी न्यायालयाचा पर्याय निवडला असेल, तर त्यांनी पकडले जाण्याआधी पोलिसांकडून योग्य ती कार्यवाही का होत नाही..? त्यामुळे सरकारने या घटनेची दखल घेऊन ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. अन्यथा, सामान्य जनतेमध्ये सरकार आणि पोलीस यंत्रणेबद्दल विश्वास कमी होईल आणि गुन्हेगारांना संरक्षण मिळत असल्याचा चुकीचा संदेश जाईल. तरी आम्ही आपणांस विनंती करतो की, मस्साजोग प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड, विष्णु चाटे, सुदर्शन घुले आणि त्यांच्या साथीदारांवर मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा) अंतर्गत त्वरित कारवाई करावी. तसेच, या प्रकरणाचा तपास जलदगतीने पूर्ण करून गुन्हेगारांना कठोर शिक्षेसाठी न्यायालयात हजर करण्यात यावे. जर या प्रकरणात वेळेवर आणि प्रभावी कारवाई झाली नाही, तर सामान्य नागरिकांचा सरकारवरील विश्वास डळमळीत होईल आणि कायद्याची भीती गुन्हेगारांमध्ये राहणार नाही. आपण या विषयाची तातडीने दखल घेऊन योग्य त्या उपाययोजना कराल, अशी अपेक्षा राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सचिव सचिन फोलाने यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. सदरील निवेदनाच्या प्रती उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि उपजिल्हाधिकारी अंबाजोगाई यांना देण्यात आल्या आहेत.



