जाती-धर्माच्या भिंती ओलांडून केजचा विकास; हारुणभाई इनामदार आणि नगराध्यक्षा सिता बनसोड यांच्याकडून शेकडो नागरिकांना हक्काचे पी.टी.आर. आणि घरकुल सुपूर्द
प्रतिकूल राजकीय परिस्थितीतही केजमध्ये विकासाची सत्ता; हारुणभाई इनामदारांच्या निधर्मी आणि पारदर्शक कारभाराची जिल्ह्यात चर्चा!
केज:- केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाची (भाजप) भक्कम सत्ता असताना, स्थानिक पातळीवर कोणत्याही मोठ्या राजकीय राजआश्रयाशिवाय केज नगरपंचायतीमध्ये स्वतःच्या बळावर सत्ता आणणे आणि ती टिकवून ठेवणे, हे आजच्या राजकीय पटलावर थक्क करणारे आहे. सामाजिक नेते हारुणभाई इनामदार यांनी केज नगरपंचायतीच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवत आपले राजकीय वर्चस्व सिद्ध केले आहे. नुकत्याच झालेल्या पी.टी.आर., रमाई घरकुल आणि दिव्यांग निधी वाटप कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांच्या याच सर्वसमावेशक नेतृत्वाची चर्चा पुन्हा एकदा संपूर्ण बीड जिल्ह्यात रंगली आहे.
‘मुस्लिम चेहरा, पण निर्णय सर्वसमावेशक’ – शैक्षणिक संस्थांमधील वास्तव
हारुणभाई इनामदार हे मुस्लिम समाजातून येत असले, तरी त्यांचे सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील काम जाती-धर्माच्या पलीकडे जाणारे आहे. केज परिसरातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात सध्या एका गोष्टीची प्रकर्षाने चर्चा होत आहे, ती म्हणजे त्यांच्या शैक्षणिक संस्थांमधील कर्मचारी भरती.
एकीकडे अनेक हिंदू विचारसरणीच्या किंवा हिंदू नेत्यांच्या शैक्षणिक संस्थांमध्ये विशिष्ट जाती-धर्माच्या लोकांना प्राधान्य दिले जात असल्याचे चित्र दिसते; तर दुसरीकडे, हारुणभाई इनामदार यांच्या शैक्षणिक संस्थांमध्ये मुस्लिम कर्मचाऱ्यांपेक्षा हिंदू समाजातील सुशिक्षित तरुणांना मोठ्या प्रमाणावर नोकरीच्या संधी देण्यात आल्या आहेत. हेच त्यांच्या निधर्मी आणि सर्वसमावेशक दृष्टिकोनाचे सर्वात मोठे उदाहरण मानले जाते.
राजकीय राजआश्रयाचा अभाव, तरीही सत्तेवर पकड
सध्याच्या राजकीय परिस्थितीत अल्पसंख्याक समाजातील नेत्यांना मुख्य प्रवाहातील सत्ताधाऱ्यांकडून सहजासहजी राजकीय आश्रय किंवा पाठबळ मिळत नाही, हे उघड सत्य आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याने स्थानिक पातळीवर विरोधकांचे आव्हान व हिंदू-मुस्लिम जातीयवादाचे सावट मोठे होते. अशा तटस्थ आणि प्रतिकूल परिस्थितीतही हारुणभाई इनामदार यांनी कोणत्याही मोठ्या पक्षाच्या आश्रयावर अवलंबून न राहता, केजमधील बहुसंख्य (विशेषतः हिंदू) मतदारांचा विश्वास संपादन केला.
“आम्ही केवळ घोषणा करत नाही, तर काम करून दाखवतो,” हा विश्वास त्यांनी इनामी जागेत राहणाऱ्या नागरिकांना पी.टी.आर. मिळवून देऊन आणि गोरगरिबांना रमाई घरकुल योजनेचा लाभ देऊन सार्थ ठरवला आहे.
राजकारणातील दुटप्पीपणा: रात्री लोटांगण, सकाळी जातीयवादाची आरोळी!



