Uncategorized
अंबाजोगाईत ५०० बंदी क्षमतेचे ‘वर्ग-१’ जिल्हा कारागृह मंजूर; आ. नमिता मुंदडांच्या पाठपुराव्याला मोठे यश
"बीड जिल्ह्याचा कारागृह प्रश्न सुटणार; अंबाजोगाईत नवीन जिल्हा जेलमुळे पोलीस प्रशासनाचा ताण होणार हलका!"
अंबाजोगाई:-बीड जिल्ह्यातील कारागृह प्रशासनावरील ताण कमी करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. अंबाजोगाई येथे ५०० बंदी क्षमतेच्या नवीन ‘जिल्हा कारागृह वर्ग-१’ ला अधिकृत मंजुरी मिळाली असून, यासंदर्भातील अधिसूचना ५ मे २०२६ रोजी राज्य राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे. केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हा महत्त्वाचा प्रकल्प आता प्रत्यक्ष साकारला जाणार आहे.
ठळक मुद्दे:
• जागा: मौजे काळवंटी (लमाण तांडा) येथील सर्व्हे क्र. १/अ/५ मधील ३० एकर क्षेत्र.
• क्षमता: ५०० कैदी (जिल्हा कारागृह वर्ग-१).
• कायदा: महाराष्ट्र कारागृह आणि सुधारसेवा अधिनियम २०२५ च्या कलम ३ आणि ४ अंतर्गत घोषणा.
• फायदा: बीड जिल्हा कारागृहावरील ताण कमी होणार आणि पोलीस प्रशासनाची धावपळ थांबणार.
पोलीस प्रशासनाची ओढाताण थांबणार
सध्या बीड जिल्ह्यात केवळ एकच जिल्हा कारागृह असल्याने कैद्यांची संख्या आणि पोलिसांवरील कामाचा बोजा प्रचंड वाढला होता. विशेषतः अंबाजोगाई परिसरातील आरोपींना सुनावणीसाठी ने-आण करताना पोलीस प्रशासनाला मोठी कसरत करावी लागत असे. नवीन कारागृहामुळे ही गैरसोय दूर होऊन कामकाजात सुसूत्रता येणार आहे.
भव्य प्रकल्पाची रूपरेषा
हे कारागृह काळवंटी परिसरातील ३० एकरच्या विस्तीर्ण जागेवर उभारले जाईल. या जागेच्या चतुःसीमा देखील निश्चित झाल्या असून, उत्तर व दक्षिण दिशेला गायरान जमीन, पूर्वेस रस्ता आणि पश्चिमेस सर्व्हे क्र. १० अशी याची व्याप्ती आहे. राज्यपालांच्या आदेशानुसार सहसचिव सुग्रीव धपाटे यांनी या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे.
“अंबाजोगाईत स्वतंत्र जिल्हा कारागृह व्हावे, ही काळाची गरज होती. ३० एकर जागेची उपलब्धता आणि प्रशासकीय तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील होतो. या निर्णयामुळे जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्था यंत्रणेला मोठे बळ मिळेल.”



