विलास घुले यांच्या खुनाला कारणीभूत ठरलेल्या नराधम उमेश मानेच्या अखेर मुसक्या आवळल्या! दीड महिन्यानंतर केज पोलिसांची धडक कारवाई
बलात्कार, ब्लॅकमेलिंग अन् हत्या; बीड हादरवणाऱ्या उमेश मानेला घरातूनच ठोकल्या बेड्या!

केज:-एका निष्पाप हॉटेल व्यावसायिकाचा बळी घेण्यास कारणीभूत ठरलेला आणि विवाहितेवर लैंगिक अत्याचार करून तिचे आयुष्य उद्ध्वस्त पाहणारा नराधम उमेश माने याला अखेर केज पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गेल्या दीड महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या या विकृत आरोपीला १ सप्टेंबर रोजी टाकळी येथील त्याच्या घरातूनच अत्यंत शिताफीने ताब्यात घेण्यात आले. एका असहाय्य महिलेला न्यायासाठी सोशल मीडियावर आक्रोश करावा लागणे आणि त्यातून पेटलेल्या वादात एका निष्पापाचा जीव जाणे, या संपूर्ण प्रकारामुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात प्रचंड संतापाची लाट उसळली होती.
अत्याचार, ब्लॅकमेलिंग आणि भररस्त्यात रक्तरंजित थरार
उमेश माने याने एका विवाहित महिलेवर बळजबरीने लैंगिक अत्याचार करून तिचे आक्षेपार्ह व्हिडीओ तयार केले होते. ‘व्हिडीओ व्हायरल करेन आणि पती-मुलांना संपवून टाकेन,’ अशी धमकी देत तो वारंवार तिच्यावर अत्याचार करत राहिला. अखेर या संतापाचा स्फोट २० जून रोजी झाला. केज-मांजरसुंबा रस्त्यावरील बळीराजा हॉटेलजवळ पीडितेचे नातेवाईक आणि उमेश माने यांच्यात जोरदार राडा झाला.
स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळत सुटलेल्या उमेश मानेला वाचवण्यासाठी हॉटेल मालक विलास घुले पुढे आले; मात्र, संतप्त जमावातील एकाने घुले यांच्यावरच धारदार शस्त्राने सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या विलास घुले यांचा २१ जून रोजी अंबाजोगाई येथे उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. निष्पाप घुले यांच्या खुनानंतर रमेश घुले यांच्या फिर्यादीवरून १० जणांवर गुन्हा दाखल झाला, ज्यामध्ये खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचे नाव पुरवणी जबाबात आल्याने संपूर्ण राज्यात प्रचंड राजकीय आणि सामाजिक खळबळ उडाली होती.
प्रशासनाचा ढिम्मपणा, महिलेचा आक्रोश आणि गुन्हा दाखल
एवढा मोठा रक्तरंजित खेळ होऊनही नराधम उमेश माने प्रसारमाध्यमांसमोर बिनधास्त फिरत होता. पोलीस दाद देत नसल्याचे पाहून अखेर हतबल झालेल्या पीडित विवाहितेने सोशल मीडियावर स्वतःची व्यथा मांडणारा व्हिडीओ व्हायरल केला. या व्हिडीओने बीड जिल्ह्याला हादरवून सोडले आणि जनक्षोभ उसळला. जनतेच्या दबावानंतर खडबडून जागी झालेल्या केज पोलिसांनी १४ जुलै रोजी उमेश मानेविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४(२)(एम) आणि ३५१(२) अन्वये बलात्काराचा गुन्हा दाखल केला. मात्र, गुन्हा दाखल होताच हा विकृत आरोपी पसार झाला होता.
गुपचूप गावात आला अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला!
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली पिंक पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राकेश नेटके करत होते. आरोपी उमेश माने हा टाकळी येथे आपल्या घरी लपून बसल्याची पक्की खबर निरीक्षक सूर्यतळ यांना मिळाली. माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण उंबरे, बाळासाहेब अहंकारे, शिवाजी कागदे, नितीन वारे, राहुल तरकसे, पूजा माके आणि अनिता दगडखैर यांच्या पथकाने सापळा रचून त्याला घरातूनच मुसक्या बांधल्या.
दरम्यान, विलास घुले यांच्या खुनाचा तपास आता एसआयटीकडून (SIT) काढून सीआयडीकडे (CID) सोपवण्यात आला असून, आता या प्रकरणातील सर्व सूत्रधारांवर कडक कारवाई होणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.



