तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या अपघाती मृत्यूची CID चौकशी करा; विभागीय आयुक्तांचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना आदेश
केजच्या तहसीलदाराचा बळी घेणारा 'तो' लातूर प्रवास कोणाच्या इशाऱ्यावर? संशयाची सुई मोठ्या अधिकाऱ्यांकडे? चौकशीचा फास आवळला!
छत्रपती संभाजीनगर:-केजचे दिवंगत तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या संशयास्पद अपघाती निधनाचे पडसाद आता प्रशासकीय पातळीवर उमटू लागले आहेत. या प्रकरणाची सीआयडी (CID) मार्फत सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत असतानाच, विभागीय आयुक्त कार्यालयाने बीडचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना याप्रकरणी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
काय आहे प्रकरण?
काही दिवसांपूर्वी केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. मात्र, हा केवळ अपघात नसून त्यामागे काही मोठे कारस्थान असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर ‘नॅशनल ह्युमन राईट्स अँड क्राईम कंट्रोल ऑर्गनायझेशन’ (वूमन अँड चाईल्ड सेक्युरिटी वेल्फेअर फाउंडेशन) च्या महाराष्ट्र कार्याध्यक्षा श्रीमती प्रिया परमेश्वर झांबरे यांनी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे दाद मागितली होती.
पत्रातील मुख्य मुद्दे आणि मागण्या:
विभागीय आयुक्त कार्यालयाने जिल्हा प्रशासनाला पाठवलेल्या पत्रात प्रामुख्याने खालील बाबींवर लक्ष वेधले आहे:
• सखोल चौकशीची मागणी: घटनेच्या दिवशी तहसीलदार गिड्डे साहेब नेमके कोणाच्या संपर्कात होते?
• मार्गातील संशय: ते केजवरून लातूर रोडला नेमके कोणत्या कारणासाठी गेले होते? यामागील ठोस कारण काय?
• तांत्रिक पुराव्यांची तपासणी: या प्रकरणातील मुख्य सूत्रधार शोधण्यासाठी गिड्डे यांचे Call Details (CDR) आणि Call Recordings यांची सखोल तपासणी करण्यात यावी.
• प्रशासकीय पाऊल: अप्पर आयुक्त (महसूल) रिता मैत्रेवार यांनी या निवेदनाची दखल घेत, नियमानुसार तातडीने कार्यवाही करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत
“दिवंगत तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या निधनाबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणाची पारदर्शक चौकशी होऊन सत्य समोर येणे गरजेचे आहे,” असे मत सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.
आता विभागीय आयुक्तांच्या या आदेशानंतर बीड जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभाग या प्रकरणाचा तपास कोणत्या दिशेने नेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे



