Uncategorized

केजमधील तरुणांच्या जीवाशी खेळ खपवून घेणार नाही! विनापरवाना सप्लिमेंट्स विक्रीवर FDAचा घणाघात; कडक कारवाईची टांगती तलवार

केजमधील जिममध्ये विनापरवाना आहारपूरक पदार्थांची विक्री

केज (प्रतिनिधी):-सध्याच्या तरुणाईमध्ये जीमला जाण्याचे आणि शरीर कमावण्याचे मोठे वेड पाहायला मिळत आहे. झटपट बॉडी बनवण्यासाठी किंवा वजन कमी करण्यासाठी तरुणांकडून मोठ्या प्रमाणावर प्रोटीन पावडर, मल्टी-व्हिटॅमिन गोळ्या आणि विविध हेल्थ सप्लिमेंट्सचा वापर केला जातो. मात्र, बाजारात बनावट आणि आरोग्यास घातक सप्लिमेंट्सचा सुळसुळाट झाल्याचे समोर आले असून, केज शहरातील जीममध्येही कोणताही अधिकृत परवाना नसताना सर्रास सप्लिमेंट्सची विक्री सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. याची गंभीर दखल घेत राज्याचे अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अत्यंत कडक नियमावली लागू केली असून, नियम मोडणाऱ्यांना व दिशाभूल करणाऱ्यांना कडक इशारा दिला आहे.

केजमध्ये नियमांना हरताळ; परवान्याविना सप्लिमेंट्सची विक्री

राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाच्या नवीन नियमावलीनुसार जीम आणि हेल्थ सेंटर्सना सप्लिमेंट्स विक्रीसाठी एफडीएचा अधिकृत परवाना घेणे बंधनकारक आहे. मात्र, केज शहरातील कोणत्याही जीम चालकांनी अद्याप एफडीएचा परवाना घेतलेला नाही. असे असतानाही या जीम चालकांकडून तरुणांना मोठ्या प्रमाणावर प्रोटीन पावडर आणि हेल्थ सप्लिमेंट्सची विक्री केली जात आहे. कोणत्याही वैद्यकीय तपासणीविना किंवा अधिकृत परवान्याशिवाय सुरू असलेला हा प्रकार तरुणांच्या जीवाशी खेळणारा ठरत असून, याकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा आहे.

नेमकं प्रकरण काय?

नुकतेच १३ नोव्हेंबर रोजी अन्न व औषध प्रशासनाने राज्यभरात विशेष तपासणी मोहीम राबवली होती. या कारवाईत अनेक धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत. अनेक उत्पादनांच्या आवरणावर (लेबलवर) वेगळेच घटक लिहिलेले असतात आणि प्रत्यक्षात आतमध्ये भलताच पदार्थ असल्याचे आढळून आले आहे. नागरिकांच्या आरोग्याशी सुरू असलेला हा खेळ थांबवण्यासाठी तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषद घेऊन नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत.

नवीन नियमावलीतील महत्त्वाचे मुद्दे:

परवाना बंधनकारक: यापुढे हेल्थ सप्लिमेंट्सचे उत्पादक, वितरक, आयातदार, औषध विक्रेते (केमिस्ट), तसेच जीम आणि हेल्थ सेंटर्सना एफडीएचा अधिकृत परवाना घेणे बंधनकारक असेल. केजमधील विनापरवाना विक्री करणाऱ्या जीम चालकांवरही या नियमानुसार कारवाईची टांगती तलवार आहे.

सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सवर करडी नजर: सोशल मीडियावर अनेक इन्फ्लुएंसर्स ‘झटपट वजन घटवा’, ‘चेहऱ्यावर तेज आणा’ किंवा ‘लवकर बॉडी बनवा’ असे खोटे आणि अतिशयोक्तीपूर्ण दावे करून सप्लिमेंट्सची जाहिरात करतात. अशा दिशाभूल करणाऱ्या जाहिराती करणाऱ्या इन्फ्लुएंसर्सवरही आता थेट कायदेशीर कारवाई होणार आहे.

सप्लिमेंट्स म्हणजे औषध नव्हे: हेल्थ सप्लिमेंट्स हे केवळ दैनंदिन आहाराला पूरक असतात, त्यातून कोणताही आजार बरा होत नाही, असे एफडीएने स्पष्ट केले आहे. तसेच, प्री-बायोटिक, प्रो-बायोटिक किंवा इतर विशेष घटकांच्या उत्पादनासाठी एफडीएची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे.

नियम मोडल्यास होणार कठोर शिक्षा आणि दंड:

अन्न व औषध प्रशासनाच्या नवीन नियमावलीनुसार दोषी आढळणाऱ्यांवर खालीलप्रमाणे कठोर कारवाई केली जाईल:

परवान्याविना व्यवसाय किंवा विक्री केल्यास (उदा. विनापरवाना जीम चालक): १० लाख रुपयांपर्यंत दंड.

दिशाभूल करणारी जाहिरात व खोटी माहिती दिल्यास: १० लाख रुपयांपर्यंत दंड.

आरोग्यास अपायकारक पदार्थ बनवल्यास: १० लाख रुपयांपर्यंत दंड.

 नियमावलीचे उल्लंघन केल्यास: ५ लाख रुपयांपर्यंत दंड.

भेसळयुक्त पदार्थ बनवणे किंवा अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन न केल्यास: २ लाख रुपयांपर्यंत दंड.

अस्वच्छ वातावरणात उत्पादन केल्यास: १ लाख रुपयांपर्यंत दंड.

सप्लिमेंट्सच्या सेवनाने एखाद्याचा मृत्यू झाल्यास: दोषींना थेट जन्मठेपेची शिक्षा सुनावली जाईल.

तरुणांना व नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

केज शहरासह ग्रामीण भागातील तरुणांनी कोणत्याही जीम चालकांच्या किंवा आकर्षक जाहिरातींच्या आमिषाला बळी पडून डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सप्लिमेंट्स घेऊ नयेत. तसेच, केजमध्ये विनापरवाना सप्लिमेंट्स विकणाऱ्या जीम चालकांवर एफडीएने तात्काळ धाडी टाकून कारवाई करावी, अशी मागणी सुज्ञ नागरिकांमधून होत आहे.

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button