Uncategorized
पारंपरिक व्यवसाय नसतानाही मोठ्या कष्टाने शिकले ‘केस कर्तनालय’ व्यवसाय; जय भवानी चौकात सुरू केला ‘मोरया मेन्स पार्लर’
स्वतःच मालक व्हा! केजच्या नेहरकर बंधूंचा चौकटींना लाथाडत दणदणीत जिद्दीचा आदर्

केज (प्रतिनिधी):-आजच्या काळात उच्च शिक्षण घेऊनही नोकरीच्या शोधात तरुणांची भटकंती सुरू असताना, केज शहरातील दोन युवा भावांनी एक आदर्श पायंडा पाडला आहे. पारंपरिक व्यवसाय नसतानाही, केवळ जिद्द, कष्ट आणि स्वाभिमानाची जोड देत संतोष आणि अविनाश या नेहरकर बंधूंनी केज शहरात ‘मोरया मेन्स पार्लर’च्या माध्यमातून एक अभिनव उपक्रम सुरू केला असून, आज ते समाधानाने आपला व्यवसाय करत आहेत.
जिद्दीच्या जोरावर उभारले बस्तान
केज शहरातील जय भवानी चौकातील ग्यानदेव व्यापारी संकुलामध्ये या दोन्ही बंधूंनी आपले दुकान थाटले आहे. नेहरकर कुटुंब मूळचे वंजारी समाजातील असून, केस कर्तनालय (मेन्स पार्लर) हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय नव्हता. परंतु, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आणि बेरोजगारीवर मात करण्यासाठी त्यांनी हा व्यवसाय शिकण्याचे ठरवले. अतोनात कष्ट घेत त्यांनी या कलेत प्राविण्य मिळवले आणि आज ते स्वाभिमानाने आपला व्यवसाय यशस्वीपणे चालवत आहेत.
सद्यस्थितीवर आणि शेतीवरील संकटामुळे उचलले पाऊल
आजच्या काळात शेतीला अनिश्चित भविष्य उरले असून, ऊसतोडणीसाठी हार्वेस्टर आल्यामुळे ऊसतोड कामगारांच्या हाताला काम मिळणे कठीण झाले आहे. सरकारी नोकऱ्यांची वानवा आहे आणि राजकारणात जातीवादाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे सर्वसामान्य जनता महागाई व बेरोजगारीच्या वणव्यात होरपळत असल्याचे चित्र दिसून येते. अशा बिकट परिस्थितीत राजकारण्यांच्या अपेक्षेपेक्षा स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवत या दोन्ही भावांनी समाजाचा कोणताही संकोच न बाळगता हा व्यवसाय सुरू केला, ही संपूर्ण समाजासाठी एक अभिमानास्पद बाब ठरली आहे.
युवकांसाठी दिशादर्शक पाऊल
मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी नेहमीच युवकांना पारंपरिक विचारसरणी सोडून केसापासून ते बूट-चप्पल पॉलिश करण्यापर्यंतचे सर्व व्यवसाय आत्मसात करण्याचे आवाहन केले आहे. या प्रेरणेनुसार, इतर समाजातील युवकांनीही आपल्या पारंपरिक चौकटीबाहेर पडून कोणतेही छोटे-मोठे व्यवसाय सुरू केल्यास, त्यांना कधीही कोणाच्या दारात किंवा नोकरीसाठी वणवण भटकण्याची वेळ येणार नाही, असा संदेश यातून मिळत आहे.
नोकरीच्या मागे न लागता स्वावलंबनाचा मार्ग चोखाळणाऱ्या संतोष आणि अविनाश नेहरकर या बंधूंची ही यशोगाथा आजच्या तरुण पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरत आहे.



