केज (विशेष प्रतिनिधी):-शेजारील अंबाजोगाई नगर परिषदेच्या नवीन भव्य प्रशासकीय इमारतीसाठी शासनाकडून तब्बल ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांच्या पाठपुराव्याला मोठे यश आले आहे. एकीकडे अंबाजोगाईत विकासाच्या माध्यमातून प्रशासकीय कामांसाठी अत्याधुनिक इमारतीची सोय होत असताना, दुसरीकडे मात्र केज शहराची प्रशासकीय वास्तू आजही अत्यंत दयनीय स्थितीत आहे.
विशेष म्हणजे, केज ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये होऊन अनेक वर्षे लोटली, तरीही आजही तीच जुनी, जीर्ण आणि मोडकळीस आलेली ग्रामपंचायतीची वास्तू नगरपंचायतीचे कामकाज चालवण्यासाठी वापरली जात आहे. मात्र, या बातमीत नमूद केलेल्या सर्व सुविधा प्रत्यक्षात केवळ कागदावरच असल्याचे चित्र दिसत आहे.
दिग्गज नेत्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह आणि आमदार सौ. नमिताताई मुंदडा यांच्याकडून अपेक्षा
केज शहरात दोन खासदार (खा. बजरंग बप्पा सोनवणे, माजी खासदार सौ. रजनीताई पाटील) आणि एक माजी आमदार सौ. संगिताताई ठोंबरे आहेत. विशेष म्हणजे, ज्या पक्षात माजी आमदार सौ. संगिताताई ठोंबरे आहेत, त्याच पक्षात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व नगरविकासमंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी विशेष आग्रह धरून व नगरपंचायत इमारतीसाठी जोरदार पाठपुरावा करून शासनदरबारातून निधी खेचून आणणे अपेक्षित होते; परंतु तसे काहीही झाले नाही.
या पार्श्वभूमीवर, आता विद्यमान आमदार सौ. नमिताताई मुंदडा यांनी शासनाकडे व मंत्र्यांकडे तीव्र मागणी करून केज नगरपंचायतीच्या या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी मोठ्या प्रमाणात निधी आणण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी जोरदार मागणी जनतेमधून होत आहे.
कर भरूनही मूलभूत सुविधांपासून जनता वंचित
केज शहरामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर खाजगी व व्यावसायिक बांधकामे होत आहेत. येथील जनता नगरपंचायतीला भरभरून कर (टॅक्स) भरत असून, वाढत्या करांच्या ओझ्याखाली जनता अक्षरशः मेटाकुटीला आली आहे. मात्र, एवढा भरमसाठ कर भरूनही आजही केज शहरातील जनतेला पाणी, रस्ते, नाली आणि स्वच्छता यांसारख्या मूलभूत सेवा-सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे प्रशासकीय इमारत आणि मूलभूत सुविधांचा हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा, अशी संतप्त मागणी नागरिकांमधून केली जात आहे.