सामाजिक

पवनचक्की कंपनीने शेतीचे नुकसान करुन बेकायदेशीर रस्ते केले तयार

कंपनीवर कार्यवाही न केल्यास गावकरी आंदोलनाच्या मार्गावर

केज:-पवन ऊर्जा कंपनीने आपली यंत्रसामग्री घेऊन जाण्यासाठी अनेक शेतकऱ्यांची उभी पिकं उध्वस्त करून शेतकऱ्यांच्या जमिनीचीही वाट लावली आहे. तालुक्यातील विडा शिवारात पवन ऊर्जा क्षेत्रातील आवादा नामक कंपनीने ऐन सुगीच्या हंगामात धुमाकूळ घातला आहे.
पवन चक्क्यांची उभारणी करणाऱ्या आवादा कंपनीने स्थानिक प्रशासनाला हाताशी धरून तालुक्यात बस्तान मांडले आहे. सुरवातीला विडा शिवारात सहा वेगवेगळ्या ठिकाणी स्थळ निश्चिती करून कंपनीने संबंधित शेतमालकासोबत 30 वर्षांचे करार केले. असे करताना कंपनीने संबंधित ग्रामपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्रही घेतले नसल्याचे समोर आले. पवनचक्कीच्या उभारणीसाठी मोठमोठी यंत्रसामग्री अवजड वाहनातुन वाहून न्यावी लागते. त्यासाठी विस्तीर्ण रस्त्यांची आवश्यकता असते. कंपनीने स्थानिक पातळीवरील सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांना हाताशी धरून बेकायदेशीरपणे रस्ते तयार करायला सुरुवात केली आहे. तालुक्याची महसूल आणि पोलीस यंत्रणा मॅनेज करून कंपनीने स्वतःची एक समांतर यंत्रणा उभी केली आहे. या यंत्रणेने कंपनीला रस्ते तयार करून देण्यासाठी गोरगरीब शेतकऱ्यांची उभी पिकं उध्वस्त करायला सुरुवात केली आहे. पोकलेन आणि जेसीबी सारख्या मोठमोठ्या यंत्रणेने शेत खोदून निघालेली माती, मुरूम आणि झाडे निर्दयीपणे पुन्हा त्याच शेतात लोटून उरल्या सुरल्या पिकांचेही नुकसान केले जात आहे. विशेष म्हणजे कुठलीही शासकीय यंत्रणा सोबत नसताना, कुठलाही प्रशासकीय अथवा शासकीय आदेश नसताना खाजगी यंत्रणेद्वारे हा धुमाकूळ घातला जात आहे. शेतकऱ्यांनी तहसीलदारांची भेट घेऊन याबाबत गाऱ्हाणे मांडले असता, ‘सध्या कामाचा भरपूर लोड आहे चार पाच दिवसांनी मंडळ अधिकाऱ्यांना चोकशी करण्यासाठी पाठवतो असे मोघम उत्तर मिळाले. त्यामुळे स्वतःच्या मालकीची जमीन उघड्या डोळ्याने उध्वस्त होताना पाहण्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय उरलेला नाही. याबाबत पीडित शेतकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन कंपणीविरुद्ध कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button