Uncategorizedराजकारण

चाणक्य नितीची अखेरची फडफड!!!

 

राजकारणात किती कोलांट उड्या माराव्या? यालाही काही धरबंद असतो .
एकाच वेळी दोन्ही दरडीवर हात ठेवून लोकांच्या डोळ्यात माती घालायला लागला ….,
धर्मद्वेशाचे फुत्कार टाकायला लागला …..,
स्वतः ला अतिशहाणं समजायला लागला की त्याचा फडणवीस होतो …
मग स्वतः वरील कुकर्माचे बालंट टाळण्यासाठी
पदत्यागाचा बनाव रचायला लागतो ….
जनप्रक्षोभाच्या वनव्यात ” मी पुन्हा येणार…. मी पुन्हा येणार….’ ची घमेंड भस्म होऊन जाते …
मागं उरतं तो फक्त पश्चात्ताप अन् पश्चात्ताप !
हाच पश्चात्ताप आता स्वतः ला चाणक्य म्हणून मिरविणा-या रात्रीच्या खेळातील खलनायक आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपला होत असावा का? याबाबत साशंकता आहे .
एक तरूण हजरजबाबी नेतृत्व म्हणून महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर अवतरलेल्या देवेंद्र फडणवीस यांना इतकी गतीने उतरती कळा लागावी हे संस्कृतीरक्षणाच्या गप्पा ठोकणा- या भाजपसाठी काही भुषणावह नाही .
गेल्या दोन दशकातली महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणातील देवेंद्र फडणवीस यांची उपलब्धी तपासली तर सुसंस्कृत राजकारणाची अपेक्षा करणा-या कुणाही सभ्य मतदाराची मान शरमेने खाली जावी अशीच आहे . त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात खासदारकीला भाजपचा नामुष्कीजनक सफारामा झाला .आता वरकरणी भाजप त्याचे खापर निगेटिव्ह नॅरेटीव्ह वरती फोडत असला तरी आतुन RSS (भाजप) आणि संघ परिवार पुर्णपणे हाबकलाय .
विरोधी पक्षातील नासका माल आपल्या पदरात बांधून मताचे कटोरे घेऊन मतदारांच्या दारात जाणं भाजप आणि संघाच्या चांगलेच अंगलट आलंय . स्वतः च्या पक्षातली घाण झाकुन विरोधी पक्षात वाकुन बघण्याचा भाजपचा शिखंडी डाव खासदारकीच्या निवडणुकीत महाराष्ट्र आणि देशातील मतदारांनी उधळून लावल्यानंतर भाजपने तथाकथित चिंतन शिबीरांना उत आणलाय . त्याची प्राथमिक सुरवात म्हणजे फडणवीस यांनी मंत्रीमंडळातुन बाहेर पडण्याची फोडलेली पुडी . फडणवीस शहाजोगपणाचा बनाव करणार ,भाजपचे केंद्रीय नेतृत्व त्याला हवा देणार आणि पुन्हा माघार घेणार हे अपेक्षितच होतं पण इतक्यानं फडणवीसांचे पापक्षालन होण्याची सुतराम शक्यता नाही .
फडणवीसनी ज्या प्रकारे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला खेळवलं त्यामुळे मोदी,शहा हे निश्चितच अस्वस्थ असणार . महाराष्ट्रात मोदींनी जिथं म्हणून प्रचारसभा घेतल्या तिथं मतदारांनी भाजपच्या खासदारकीच्या उमेदवाराला पराभवाचे खडे चारलेत . आणि याला फडणवीसांची दिशाहीन राजकीय करणी कारणीभूत असल्याचे भाजप नेतृत्वाच्या लक्षात आलंय म्हणून तर परभवाचे खापर फडणविसांच्या वरती फोडण्याऐवजी संघ अजित पवार यांच्यावरती फोडतोय .
तसं फडणवीस संघाची सनातनी विचारधारा पेरायचेच काम करत होते . महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत फडणवीसांनी बजरंग बली की जय चा जयघोष करण्याऐवजी सनातन धर्म की जय ‘ चा विषारी फुत्कार टाकला होता तो महाराष्ट्रातील मतदारांना मानवला नाही .कारण देशाच्या इतिहासात कुस्तीच्या मैदानात हनुमान देवाला बाजुला सारुन सनातन धर्म घुसडण्याचं पाप यापूर्वी कधी घडलं नव्हतं . भाजपचे हे देवधर्माचं नकली कवच मतदारांनी चिरफाड करुन टाकलं .
शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडाफोडीचा खेळ हा फडणवीस यांनीच केला होता हे आता लपून राहिलेले नाही . फडणवीस यांनीच मोदी,शहा यांच्या गळी ही चाणक्यनिती (?)उतरवली असणार त्याशिवाय मोदी ,शहा ठाकरेंच्या शिवसेनेला आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला नकली ठरविण्याची घोडचूक करणार नाहीत . शरद पवार तर इतके खुष झालेत की मोदींनी असाच प्रचार करावा असं त्यांनीही उघडपणे बोलून दाखवलंय . महाराष्ट्राच्या वाट्याला आलेले हजारो कोटी रुपये फडणवीस यांनी केंद्राकडे परत पाठविले , महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातला पळवायला फडणवीस यांनी मदत केली अशी महाराष्ट्रातील मतदारांची पक्की खात्री झाली आणि त्याचा सर्वत्र वनवा पेटला . फडणवीस यांनी अजित पवार नांवाचा जळता निखारा खिषात घालण्याचा वेडाचार केलाय .आगामी विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वीच अजित पवार भाजपचं बाजलं करुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेतृत्व करायला लागले तरी कुणाला आश्चर्य वाटू नये . त्यावेळी फडणवीस हे नांव महाराष्ट्राच्या राजकारणातुन अस्तंगत झाल्याशिवाय राहणार नाही कारण अजित पवार यांची भाजपला गरज वाटत नसली तरी फडणवीसांचे उपरणे अजित पवार यांच्या बुडाखाली अडकलंय त्यामुळे फडणवीस त्यांच्या पोठोपाठ फरफटत जाणार आहेत . त्यात ते सोलुन निघाले तर कुणालाही आता त्याचे वैशम्य वाटणार नाही .
आंतरवाली सराटी येथील गोरगरीब मराठ्यांच्यावरती केलेल्या लाठीमाराची सुरवातीला फडणवीसांनी तरफदारी केली नंतर जनप्रक्षोभ वाढताच सपशेल माफी मागितली आणि पुन्हा लाठीमाराचे समर्थन केले एका दिवसात फडणवीस इतके रंग बदलल्यानंतर गोरगरीब मराठे भाजपला कसा थारा देणार ?
यातुन पोळून निघालेला भाजप आणि फडणवीस पुन्हा मराठा आरक्षणाचा प्रश्न चुकीच्या पध्दतीने हाताळताहेत त्याचा आगामी आमदारकीसाठी झाला तर फायदा महाविकास आघाडीलाच होणार आहे .
वारकरी दिंडीमध्ये फुट पाडण्याचं पापही फडणवीसांच्या खात्यामध्येच विरोधकांनी जमा केलंय . त्यामुळे फडणवीसांची प्रतिमा कमालीची मलिन झाल्या ‌.
मुस्लिम आरक्षणाला फडणवीस आणि भाजपने उघड विरोध केला . त्यामुळे एकगठ्ठा मुस्लिम मतदार महाविकास आघाडीकडे वळलेत इथं सुध्दा फडणवीसांची चाणक्य नीती सपशेल फसल्या .
महाराष्ट्रात आणि देशात भाजप हा शेतकरीविरोधी पक्ष आहे हे आता शेतकऱ्यांना कळून चुकलयं आणि ही चुक फडणवीसांच्या शेतकरी विरोधी धरसोड धोरणामुळे झाल्या . आगामी विधानसभा निवडणुकीत फडणवीस जितकं पुढं पुढं करतील तितकं भाजपची पिछेहाट होणार आहे .आता बघुया भाजप यातुन काही शहाणपणाचा बोध घेतंय का फडणवीसांच्या मार्गाने संपुष्टात येतंय ?

—— बाळासाहेब ल.पाटील

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button